Details
“शरदरावांचे घडविणे, गटविणे आणि घटविणे..”
02-Feb-2019
| 0
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
jayant.s.karanjavkar@gmail.com
महाराष्ट्राचे जाणता राजा शरदचन्द्र पवार, त्यांना शरद पवार नावाने सर्वजण ओळखतात. ते आता ८० वर्षं वयाकडे झुकत आहेत. तरीही राज्यात, देशात एखाद्या तरुणाला लाजवतील असे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. २०१९ ची लोकसभा निवडणूक समोर दिसतेय. प्रफुल पटेल, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, गणेश नाईक, सुनील तटकरे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड या नामांकित सरदारांना मोठ्या साहेबांनी घडविले आणि राजकारणातून त्यांचे वजन घटविलेही..
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजूभाई असल्याने प्रफुल्ल पटेल यांच्या चेहऱ्यावर थोडंसं उसनं हास्य असते. केंद्रीय हवाई विभागाचे ते मंत्री होते, तेव्हा ‘हवाई, हवाई’ करत हवेत होते आणि सरकार पडल्यावर मोठ्या साहेबांचा ‘भोज्या’ म्हणून त्यांनी वापर केला, तर नरेंद्र मोदींना प्रांतवादाचे महत्त्व सांगून साहेबांची ही शिकवण कायम अंगिकारली. ती खेळी यशस्वी झाली. आज ते मोठ्या साहेबांच्या ‘घटविणे’ नाट्यप्रयोगापासून सावध राहिले व स्वतःपुरते स्थिरस्थावर झाले.
अजित पवारांना पुतण्यापेक्षा मुलाससारखे प्रेम केले साहेबांनी.. त्यांना चांगले घडविले. उत्तम प्रशासक आणि उत्तम वक्ता म्हणून त्यांची ख्याती राज्यभर झाली. साहेबांचा वारसदार म्हणून लोक त्यांच्याकडे पाहू लागले. परंतु मुख्यमंत्रीपदाची संधी असतानाही कमांडर अजितदादांना, दादा फक्त ‘खुर्ची बघ’ असे सांगून छोट्या भावाला म्हणजे काँग्रेसला मुख्यमंत्रीपदी बसविले. म्हणजे दादांना घडविले आणि त्यांचे गणित बिघडविले. काँग्रेसकडून अर्थ, गृह, सार्वजनिक बांधकाम राष्ट्रवादीकडे ठेवून काँग्रेसला गटविले! आता साहेबांचं लक्ष सुप्रियांना घडविण्याकडे आहे. त्यांना गटविणे शक्य नाही, पोटचा गोळा आहे तो!
आमदार दिलीप वळसे-पाटील साहेबांकडे पीए होते. त्यांची हुश्शारी पाहून त्यांना घडविले. त्यांना घडविताना दिलीपरावांचं वजन इतके वाढले की त्यांना घरातल्याघरात फेऱ्या मारणं मुश्किल झालं आहे. लोकसभा निवडणुकीला साहेब उभे राहण्यास सांगतात की काय या चिंतेने त्यांचं वजन आता आपोआप घटतंय.. थोडक्यात साहेबांनी दिलीपरावांना घडविले आणि आता घटविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
लक्षभोजनकार पुत्र सरदार विजयसिंह मोहिते-पाटील हे कोणाच्या अध्यात नाहीत वा मध्यातही.. बरं त्यांचं दुखणं काय आहे तर विचारावं तर तोंडातल्या तोंडात काय बोलतात हेच कोणाला कळत नाही. मात्र, मोठ्या साहेबांना या मुक्या सरदाराची भाषा कळते. त्यांना क्रिकेट खेळातील नाईट वॉचमनसारखं पवारांनी राखीव गडी म्हणून ठेवलं आहे..
छगन भुजबळ यांना शिवसेनेतून गटविले आणि गडी ढाण्या वाघासारखा आहे म्हणून मित्र बाळासाहेब ठाकरे यांना जाणता राजा वाकुल्या दाखवू लागला. अडचणीच्या वेळी मोतोश्रीवर जाऊन सोनिया गांधींना घाबरवू लागला. आपण कसे स्थिर राहू याची काळजी ते घेत. भुजबळांना उपमुख्यमंत्रीपद देऊन गृह खातं दिलं. त्यांनी खात्याचा अर्थ खाण्यासारखा केला आणि मीडियाचे कार्यालय तोडल्याचे निमित्त करून त्यांना बाजूलाही केले. ती एक हातचलाखी होती म्हणे. नंतर छगनरावांना सार्वजनिक बांधकाम खाते दिले. टोल नाक्यावरील टोलवाटोलवीत लक्ष्मी घरात व पक्षात पाणी भरू लागली. साहेबांचीही चिंता मिटली. सर्वकाही ठिक चाललं असताना काही खेकडे पाय खेचू लागले. सरकार गेलं आणि भाजपाने त्यांना जेलमध्ये टाकून भुजबळांचं ‘भजं’ केलं. बरं ते जेलमध्ये असताना पवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड आमचे ओबीसी नेते आहेत, त्यांना संरक्षण द्या असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन यापुढील ओबीसी नेते आमदार आव्हाड असतील असे संकेत दिले. त्यामुळे भुजबळांचं वजन घटत गेलं. आज ते वरून दिसायला बरे दिसतात, पण या ओबीसी नेत्याला आतून पूर्णतः पोखरले आहे.. साहेबांनी हे घटविण्याचे काम व्यवस्थित पार पाडले आणि स्वतः चिंतामुक्त झाले.
गणेश नाईक हे शिवसेनेचेच अपत्य.. खिशात खुळखुळ्याचा आवाज येऊ लागल्यानंतर ते एकदम खुळे झालेत. पवारांच्या सावलीत गेले आणि त्यांची वाढच खुंटली. मग त्यांनी सुप्रियाताईंना ३०० जिप्स दिल्या, असे म्हणतात. त्याचे काय झाले ते बोलायचे नाही, त्यावर कोणी बोललं तर त्यांचा ‘व्हाईट हाऊस’ होतो म्हणे.. आता तर नवी मुंबईतल्या भूखंड हडप केलेल्या देवीचं मंदिर वाचवण्यासाठी दस्तुरखुद्द त्यांची देवीसुद्धा धावून आली नाही. मग मोठ्या साहेबांकडून नाईक सरदाराची अपेक्षा कशी करणार? त्यांना कळून चुकलं साहेब घडवितात तसे ते बिघडवितातही!
सुनील तटकरे, साधा माणूस. गाईचा भक्त. मुलाला हजार गाई देऊन तो पारशी डेरीला दूध देण्याचं काम करतो. पारश्याकडे दूध टाकता टाकता त्याला आमदार केलं. कन्येला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान केलं. भाऊ आमदार, पुतण्या आमदार अशी त्यांची दमदार वाटचाल सुरू झाली. कोणी दगाफटका देऊ नये म्हणून त्यांनी संघाचे गीत गुणगुणायला सुरूवात केली होती. गडी लय पुढेपुढे करतोय, हे लक्षात येताच मोठ्या साहेबांनी सिंचनाची नस्ती दाखवून नस्ती उठाठेव करू नका असा दम भरला म्हणतात.. घडवू शकतो तर गटवूही शकतो, असे मोठाले डोळे करून सांगितले म्हणतात..
भास्कर जाधव, मूळचे शिवसेनेचे. साधे क्लिनर होते.. पण क्लिनरपासून क्लीन होण्यासाठी उद्धव ठाकरेंवर राग काढत मोठ्या साहेबांकडे गेले. साहेबांनी त्यांना मंत्री केले. मग काय? दहाही बोटं साजूक तुपात! मोठे साहेब भास्कररावांच्या मुलाच्या लग्नाला गेले आणि क्लिनरचा तो थाटमाट पाहून त्यांची झोप उडाली. झोपेच्या गोळ्या घेऊनही साहेबांना झोप येत नव्हती. शरद पवार यांनी त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद देऊन अडगळीत टाकले आणि तेही वजन घटविण्यासाठीच.. सध्या सत्तेत नसल्याने ते वॉकरवर धावण्याचा सराव करत असतात.. त्यांच्या पायाला अपघात झाला म्हणून.. पवारसाहेबांनी राजकीय वजन कमी केल्याने ते अडगळीत पडले आहेत. वजन कमी करण्याची ते नक्कल करतात. पण त्यांना ठाऊक नाही की ते नेहमी किती कॅलरीज घटवितात त्याचा तंतोतंत रिपोर्ट मोठ्या साहेबांकडे जात असतो. कसे, हे विचारायचं नाही. ते फक्त मोठ्या साहेबांनाच माहीत..
आमदार जितेंद्र आव्हाड, पवारसाहेबांचे आवडते.. ब्ल्यू आय बेबी म्हणतात त्यांना.. अतिशय हालाखीतून दिवस काढले. रेल्वे स्टेशनवरही दिवस काढल्याची त्यांची कहाणी आहे. आव्हाड म्हणजे संघर्षावर ‘जितेंद्र’ मोहर उमटविणारा उमदा नेता.. सतत कामात. दांडगा जनसंपर्क, भरपूर वाचन, कोणत्याही विषयावर बोलण्याची तयारी.. महाराष्ट्राचा गोविंदा जागतिक स्तरावर नेण्याचा मान त्यांनी मिळविला. पण स्वतःच्या गरिबीची जाण असलेल्या या नेत्याने राज्यात शेतकरी आत्महत्त्या करतात, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी गोविंदाचा म्हणजे दहीहंडीचा नाद सोडला. वसंत डावखरे यांचं निधन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल असं वाटलं. पण त्यांचा जिवलग मित्र नजीब मुल्ला याने जितेंद्रभाऊंना सळो की पळो केलंय. परंतु आपल्या या लाडक्या नेत्याची होणारी घालमेल पाहयला पवारांना वेळ नाही. ‘उग्रलेख’ पुस्तकाचं प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करण्याचे कारण पुढे करून त्यांना नाईलाजाने मातोश्रीच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. त्यात काही विशेष नाही. पवारसाहेबही काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी शिवसेनाप्रमुखांना भेटायला जायचे. असो. तोच कित्ता जितेंद्रभाऊंनी गिरवला. या सर्व ओढाताणीत त्यांची होणारी ससेहोलपट पवारांच्या अजून लक्षात आली नाही की, जाणूनबुजून सर्वकाही चालले आहे? राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचं वजन वाढवायचं आणि नंतर त्यांच्या कॅलरीज कमी करण्यासाठी वाटेला लावायचं, हा नियम त्यांनी कायम ठेवला.
आज पवारसाहेब लोकसभा निवडणूक आणि देवेगौडासारखी संधी मिळू शकते या उद्देशाने देशभरात दौरा करण्यासाठी शारीरिक वजन कमी करीत आहेत.. तेही राजकीय वजन वाढविण्यासाठी.. असं आहे त्यांचं व्हिजन.. पक्षात त्यांनी स्वतःला केंद्रबिंदू म्हणून कायम ठेवून सहकाऱ्यांना पुढे येऊ दिले नाही. महाराष्ट्राचा पहिला पंतप्रधान होण्यासाठी त्यांची धडपड कौतुकास्पद आहे. मासेखाऊ पवारसाहेब शाकाहारी झालेत. पाण्यातील मासे खुश झाले. पण राजकीय जलाशयातील मासे त्यांना पंतप्रधानपद सहज मिळवून देतील का? नाही मिळालं तर नेहमीचे पाय ओढण्याचे काम त्यांच्या नशीबी येईल. तेव्हा मात्र स्वपक्षातील नेते काय बोलतील? जशी करणी, तशी भरणी!!”

