Details
hegdekiran17@gmail.com
संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे. अशा संकटाच्या काळामध्ये भारतीय रेल्वेच्यावतीने कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये सर्वतोपरी मदत केली जात आहे. कोरोना रूग्णांच्या देखभालीसाठी आता रूग्णालयांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे अनेक रूग्णांवर उपचार करणे अवघड झाले आहे. ही समस्या लक्षात घेऊन विविध राज्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या असंख्य बोगींचे रूपांतर कोविड दक्षता केंद्रामध्ये करण्यात आले आहे. या बोगींमध्ये कोरोना रूग्णांना ठेवण्यात येत आहे. 20 जून 2020 रोजी रेल्वेच्या वाराणसी विभागाच्या मऊ स्थानकामध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड दक्षता बोगींमध्ये कोरोनाचे 42 संशयित रूग्ण दाखल झाले तर 21 जून रोजी 17 रूग्णांना दाखल करण्यात आले. त्यातील 8 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
“राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रूग्णांची काळजी घेतली जात आहे. त्याला भारतीय रेल्वेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जात आहे. भारतीय रेल्वेने विविध राज्यांमध्ये आपल्या 5,231 बोगींचे रूपांतर कोविड दक्षता केंद्रांमध्ये करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. क्षेत्रीय रेल्वे कार्यालयाच्या वतीने बोगींच्या रूपांतराचे काम करण्यात येत आहे. या बोगींमध्ये कोरोनाची प्रारंभिक लक्षण आढळून आलेल्या, परंतु गंभीर परिस्थिती नसलेल्या रूग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे.”
“दिल्लीमध्ये एकूण 9 ठिकाणी 503 कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी शकूरबस्तीमध्ये 50, आनंद विहारमध्ये 267, सफदरजंगमध्ये 21, दिल्ली सराय रोहिल्लामध्ये 50, दिल्ली कँटमध्ये 33, आदर्श नगरमध्ये 30, शाहदरामध्ये 13, तुगलकाबादमध्ये 13 आणि पटेल नगरमध्ये 26 कोविड दक्षता बोगी तैनात करण्यात आल्या आहेत.”
“उत्तर प्रदेशमध्ये एकूण 372 कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या असून वेगवेगळ्या 23 ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये दीनदयाळ उपाध्याय स्थानक, लखनऊ, वाराणसी, भदोही, फैजाबाद, सहारनपूर, मिर्जापूर, सुबेदारगंज, कानपूर, झांसी, झांसी वर्कशॉप, आग्रा, नकहा जंगल, गोंडा, नौतनवा, बहराईच, वाराणसी-सिटी, मंडुआडीह, मऊ, भटणी, बरेली-सिटी, फर्रुखाबाद आणि कासगंज या रेल्वेस्थानकांवर कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या आहेत.”
“मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे सर्व पाच कोविड दक्षता बोगी तैनात करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा येथे एकूण 20 कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या आहेत. तर तेलंगणामध्ये एकूण 60 कोविड दक्षता बोगी तीन वेगवेगळ्या स्थानी तैनात आहेत. यामध्ये सिकंदराबाद, काचीगुडा आणि आदिलाबाद येथे या बोगी आहेत.”
“केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे, तसेच त्या-त्या राज्यांच्या व केंद्रशासित सरकारच्या वतीने भारतीय रेल्वेकडे केलेल्या मागणीपत्रानुसार बोगींचे रूपांतर करण्यासाठी देण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या वतीने कोविडविरोधातल्या लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी बोगींच्या रूपांतरणाचे काम राष्ट्रीय अभियान म्हणून केले जात आहे. रेल्वेकडून केली जाणारे हे काम उल्लेखनीय आहे. या बोगींमध्ये कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी त्या-त्या राज्य सरकारांना डॉक्टर व निमवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. बोगींच्या रूपांतरणाचे काम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 6 मे, 2020 रोजी जारी केलेल्या मानकांप्रमाणे केले जात आहे.”
कोविड दक्षता बोगी केंद्रामध्ये राज्य सरकारच्या मदतीसाठी रेल्वेचे दोन संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. तसेच हवामानाचा विचार करून बोगींच्या आतले तापमान रूग्णांना आरामदायक राहवे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड रूग्णांच्या देखभालीसाठी रेल्वेच्यावतीने राज्य सरकारांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.

