HomeArchiveमुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये कलगीतुरा रंगणार?

मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये कलगीतुरा रंगणार?

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“राज्यात मदिरालये चालू करणाऱ्या सरकारला मंदिर आणि देवालये केव्हा सुरू करणार म्हणून विचारणा करणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून मंदिरे सुरू करण्याची विनंती करणाऱ्या राज्यपालांचा, माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हणत कथित उपमर्द करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृतीमुळे राज्यात राज्यपाल विरूद्ध मुख्यमंत्री यांच्यात नव्याने कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.”
 
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून राज्यातली सर्व प्रार्थनास्थळे कोविड-१९ बाबतची पूर्ण खबरदारी घेऊन सुरू करण्याची विनंती केली होती. या पत्रात राज्यपालांनी राज्यातल्या अनलॉकबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या एकूणच भूमिकेचा आवर्जून उल्लेख केला. हा उल्लेख करताना राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अचानक, ते तिरस्कार करत असलेले `धर्मनिरपेक्ष’ झाल्याबद्दलही विचारणा केली. त्याचप्रमाणे, मंदिरे न उघडण्याबद्दल त्यांना साक्षात्कार झाला का, असा सवालही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्रात केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालपदाला कस्पटासमान लेखण्याच्या धर्तीवर उत्तर दिल्याचे दिसून येत असल्याचे जाणकार सांगतात.”
 
मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले राज्यपाल?
 
“आपण १ जूनला दूरचित्रवाणीवरून केलेल्या संबोधनात मिशन बिगिन अगेनची घोषणा देत पुनश्च हरिओमचा नारा दिला. लॉकडाऊन, हा शब्द आपण कचऱ्याच्या पेटीत फेकून दिला आहे, असे प्रसिद्ध वाक्यही आपण जनतेसमोर फेकले. परंतु दुर्दैवाने आता ११ ऑक्टोबरच्या संबोधनातही आपण, चार महिन्यांनंतरही प्रार्थनास्थळे उघडण्याची घोषणा केलेली नाही. राज्य सरकारने बार, रेस्टॉरंट, समुद्रकिनारे खुले केले. परंतु आमच्या देवदेवतांना अजूनही लॉकडाऊनमध्येच राहवे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांत अनेक शिष्टमंडळे आपल्याला भेटली आणि त्यांनी प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली.”
 
“आपण कडवे हिंदुत्ववादी आहात. भगवान रामाबद्दलची आपली भक्ती दाखवताना आपण मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येलाही गेला होता. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिराला भेट देऊन आपण पूजाही केली होती. आता प्रार्थनास्थळे न उघडण्याची आपली भूमिका पाहून आपल्याला दैवी साक्षात्कार झाला की काय? की, आपण आपल्याला न आवडणारा धर्मनिरपेक्ष शब्द स्वीकारला? दिल्ली तसेच इतर अनेक भागात ८ जूनलाच प्रार्थनास्थळे खुली झाली. परंतु तेथे कोविड-१९ बोकाळल्याचे चित्र दिसले नाही. तरी राज्यातली सर्व प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांनी या पत्राद्वारे केली होती.”
  

 
मुख्यमंत्री ठाकरे यांचे उत्तर
 
“राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महोदय आपले दि. १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत, याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल.”
 
“महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे. मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसतखेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्त्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का, असा सवाल ठाकरे यांनी राज्यपालांना केला आहे.”
 
“मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणास पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही. इतर राज्यांत, देशात बरेवाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणता गेल्या ३ महिन्यांत काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली. त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. ही तीनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो. आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल, ही खात्री मी आपल्याला देतो, असे ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.”
 
मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात राज्यपालांनी इंग्रजीत पत्र लिहिल्याचा आवर्जून उल्लेखही केला. त्याचप्रमाणे राज्यपाल भारतीय जनता पार्टीचीच मागणी पुढे रेटत असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितल्याकडेही माहितगार लक्ष वेधतात.

Continue reading

नितंब, मनगट, कण्यातले फ्रॅक्चर हे ठिसूळ हाडांचे लक्षण

जगभरात जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन साजरा होत असताना, आयुष मंत्रालयाने लाखो लोकांना त्रासदायक ठरणाऱ्या ऑस्टिओपोरोसिसच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सुरुवातीपासूनच घ्यायची प्रतिबंधात्मक काळजी आणि जीवनशैलीच्या गंभीर गरजेवर भर दिला आहे. हाडांच्या आरोग्याबद्दल आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराला तोंड देण्यासाठी आयुर्वेद कसे उपयोगी ठरू शकते हे...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण...

तुतीकोरिन बंदरात 5 कोटींचे चिनी फटाके जप्त!

दीपावलीपूर्वी फटाक्यांची बेकायदेशीर आयात रोखण्याच्या प्रयत्नात करण्यात आलेल्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 'ऑपरेशन फायर ट्रेल' या मोहिमेत, तुतीकोरिन बंदरात चाळीस फुटाचे दोन कंटेनर पकडले. या कंटेनरमध्ये 83,520 चिनी फटाके असल्याचे आढळून आले. अभियांत्रिकी वस्तू म्हणून ते पाठवण्यात येत होते. जप्त करण्यात आलेल्या मालाची...
Skip to content