HomeArchiveमुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांची...

मुंबईत आरोग्य कर्मचाऱ्यांची दैना!

Details

 
Kiranhegde17@gmail.com
 
“राज्यात कोरोनाचे संकट उग्र स्वरूप धारण करत असतानाच जीवावर उदार होऊन मुंबईतल्या विविध रूग्णालयांमध्ये रूग्णांना वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारने पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे. सरकारच्या अत्यंत नियोजनशून्य कारभारामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजी दिवसेंदिवस वाढत असून जसजशी रूग्णांची संख्या वाढेल तितकी ती अधिक प्रमाणात उफाळण्याची चिन्हे आहेत. प्रसंगी हे कर्मचारी आपल्या कामापासून हात झटकून टाकण्यासही मागेपुढे बघणार नाहीत, असे विविध रूग्णालयांत फेरफटका मारल्यावर दिसून येत आहे. बुधवारीच जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रूग्णालयांतील परिचारिकांनी काम बंद करून काही काळ सरकारविरोधी घोषणा दिल्या होत्या. कारण होते ते ८० परिचारकांसाठी सरकारकडून कोरोनापासूनच्या बचावासाठी फक्त पाच किट्स पाठवल्याचे. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे.”

“राज्याच्या ग्रामीण भागात रूग्णालयांमधून कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची होणारी परवड एकूण परिस्थितीच्या तुलनेत सुसह्य मानली जाते. परंतु, मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढते आहे आणि त्यांना हाताळणाऱ्या परिचारिका, वॉर्डबॉय, आया व डॉक्टर वगळता सर्व कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोनापासून बचाव करणारे किट्स उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. ज्यांना दिले आहेत ते दुय्यम दर्जाचे आहेत. या कर्मचाऱ्यांना त्यांचा नेहमीचा गणवेश घालून काम करावे लागते. त्यांना सुरक्षित मास्क नाहीत. हँडग्लोव्ह्ज नाहीत. सुरक्षिततेची हमी देणारा ड्रेस नाही. इतकेच कशाला तर त्यांना रूग्णालयात खाण्या-पिण्याची सोय नाही की घरापासून रूग्णालयांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि रूग्णालयांपासून पुन्हा घरी परतण्यासाठी वाहनांचीही सोय नाही. अनेक रूग्णालयांमध्ये कर्मचारी पदरमोड करून उपलब्ध सार्वजनिक वाहन मिळवतात किंवा अनेक परिचारिका गस्तीवर असलेल्या पोलिसांना विनंती करून त्यांच्या मोटरसायकलवर बसून रूग्णालय गाठत आहेत. अनेकांना रूग्णालयात पोहोचण्यासाठी तास, दीड तासाची पायपीट करावी लागते असे समजते.”
 
“रूग्णालयांमधल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणीही आपल्या कर्मचाऱ्यांची ही अवस्था सरकार दरबारी मांडण्यास फारसे उत्सुक नसल्याचे जाणवले. अशा तुटपुंज्या साधनसामुग्रीतही आपण आपल्या कर्मचारीवर्गाकडून कसे काम करवून घेतो हे दाखवून ते स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना योद्धे असल्याची उपमा देऊन त्यांना धन्यवाद दिले आहेत. त्यांच्या माध्यमातून कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकणारच, असा विश्वास मुख्यमंत्री दरदिवसाआड व्यक्त करत आहेत. परंतु नुसते योद्धा म्हटल्याने आरोग्य कर्मचारी आपले कर्तव्य बजावू शकत नाहीत हे त्यांना कोणीतरी समजावून सांगण्याची गरज आहे, असे काही कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले.”

 
 
“अनेक रूग्णालयांमधले कर्मचारी मुंबईबाहेर नवी मुंबईत, पनवेलपर्यंत राहतात. काही पालघर, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, बदलापूरसारख्या दूरदूरच्या अंतरावरून येतात. या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने एस.टी. व बेस्ट बसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु यातल्या कोणत्या एसटी थेट रूग्णालयापर्यंत जातात? त्या त्यांच्या नियोजित मार्गावरच चालतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्यातल्या त्यात जवळच्या ठिकाणी उतरावे लागते व लॉकडाऊन असल्यामुळे त्यानंतरचा प्रवास पायी करावा लागतो. अनेक परिचारिकांची ड्युटी पहाटे सहा वाजताची आहे. त्यामुळे पहाटे पाच, सव्वा पाच वाजता भररस्त्यात उतरून एकट्याने चालत जायचे म्हणजे किती जोखीम या महिला उचलतात याची कोणाला कल्पनाही नसावी. अनेक ठिकाणी या परिचारिकांना तास, दीड तास पायपीट करावी लागते. त्यामुळे काही परिचारिका दीड-दोन तास उशिरा आपापल्या रूग्णालयांमध्ये पोहोचतात. या बसची संख्याही इतकी कमी आहे की बऱ्याच बसमधून या कर्मचारी प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे सामाजिक विलगीकरणचा (सोशल डिस्टेसिंग) मूळ हेतूच संपुष्टात येतो. मुंबईत बेस्टच्या अनेक बसगाड्या अनेक मार्गांवर चालू आहेत. यातल्या अनेक बसगाड्या अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी नसल्याने रिकाम्या धावतात. परंतु जेथे गरज आहे तेथे बसगाड्याच नाहीत, असे सरकारचे नियोजन आहे. आम्ही बसच्या इतक्या फेऱ्या मारल्या याची कागदोपत्री नोंद झाली की यांचे कर्तव्य संपते, अशी सारी परिस्थिती असल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.”
 
“बहुतांशी रूग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. परंतु येणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आणि सर्वसामान्य रूग्णांसाठी अनेक रूग्णालयांमध्ये एकच प्रवेशद्वार आहे. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी व इतर रूग्णांसाठी असलेला बाह्य रूग्ण कक्ष (ओपीडी) बाजूबाजूला आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांचे एक्स रे व इतर चाचण्या सर्वसाधारण रूग्णांच्या जेथे केल्या जातात तेथेच होतात. जोपर्यंत हा रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होत नाही तोपर्यंत त्याच्या तपासण्या त्याला सर्वसाधारण रूग्ण असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरवतच केल्या जातात. यामुळे त्याच्याकडून इतर रूग्णांना तसेच रूग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु आम्ही विलगीकरणाचे इतके वॉर्ड तयार केले हे सांगण्याचा अट्टाहास करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जाऊन परिस्थितीचा अंदाज घ्यावा म्हणजे सध्या कोणत्या परिस्थितीत रूग्णालयांतील कर्मचारी काम करत आहेत ते समजू शकेल, असेही अनेकांनी सांगितले.”
 

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content