Details
“महाराष्ट्रात माणूस मरतोय किडी, मुंगीसारखा!”
30-Nov-2018
| 3
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
vinodsalvi1@gmail.com
अरुंद महामार्ग, खड्ड्याखुड्ड्यांची बिकट वाट, घाटवळणावर साईडपट्टी नाही, नावाला महामार्ग असले तरी लेनची कोणतीही शिस्त नाही, मिसरूडही न फुटलेल्या हातात स्टेअरिंगचं चाक आणि कुणाकडेही घटकाभर थांबण्यासाठी वेळ नसल्याने आपणच आपल्याला मृत्यूच्या मार्गाकडे ओढत नेत आहोत. महाराष्ट्रातील हे अपघाती मृत्यूचे तांडव थांबेल तरी कधी? कुटुंबीयांसह, मित्रमंडळींसह प्रवासाला निघालेल्या माणसांचं भीषण अपघातात एका क्षणात होत्याचं नव्हतं होणं. हा धक्का पचवणं कुठल्याही माणसासाठी कठीणचं. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना 2015 मध्ये महाराष्ट्रात रस्ते अपघातांत 48 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. राज्यात दररोज रस्ते अपघातात सरासरी 35 जणांचा मृत्यू होतो. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत ही माहिती देताना रस्त्यांवर घडणार्या अपघातांची लांबलचक यादीच मांडली. इतकेच नाहीतर यंदा 2018च्या सप्टेंबर अखेरर्पंत रस्ते अपघातांत 9,683 जण अपघातात दगावल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उत्तर प्रदेश, तामिळनाडूनंतर महाराष्ट्रात रस्ते अपघातांत किडी-मुग्यांप्रमाणे मरणार्या माणसांची संख्या प्रचंड आहे. हे रस्ते अपघात रोखणे
सर्वस्वी राज्य सरकारच्या हाती नसले तरी वाहनचालक म्हणून रस्ते कर भरणार्या चालकाला चांगल्या सुविधा पुरवणे सरकारच्या हाती आहे. कुठेही खड्डे नसलेले, प्रशस्त महामार्गाचे, गाव खेड्यांकडे गुळगुळीत वाटेवरून नेणारे रस्ते आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे का?
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाच्या वार्षिक अहवालात तर महाराष्ट्राचा रस्ते अपघाती मृत्यू होणार्या राज्यांत तिसरा क्रमांक लागला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 2017 मध्ये 3,160 रस्ते अपघात घडले होते. यामध्ये 480 माणसे दगावली तर 3,287 जणांना गंभीर दुखापत झाली होती. 2016 मध्ये 3,379 अपघात झाले होते. हा अपघाती मृत्यूंचा चढ-उतार दरसाल सुरूच आहे. कुटुंबेच्या कुटुंबे, मित्र, सगेसोयरे, आप्तगण, शेजारी-पाजारी अपघाती मृत्यूमुळे काही क्षणात नजरेआड होत आहेत. अपघाती मृत्यूंचा हा सर्व लेखाजोखा मांडण्यामागे माणूस देवावर विश्वास ठेवून प्रवासासाठी घराबाहेर पडतो आहे. मानवी बेशिस्तीमुळे गाडीवर गाडी धडकून माणसे दगावली, यात देव आणि दैवाला दोषी कसा? मृत्यू आणि वेळ सांगून येत नसली तरी मृत्यूच्या वाटेवरून मार्गक्रमण करताना तुमची-आमची काळजी देव कसा घेईल, तो हाडामांसाचा माणूसचं घेईल ना?
गेल्या काही वर्षांत माणसांप्रमाणे वाढलेली वाहनांची संख्या, कुणालाही सहज मिळणारा परवाना, प्रशिक्षणाच्या नावाने बोंब आणि बेदरकारपणे कशाही पद्धतीने गाडी हाकणारी माणसेच माणसांच्या मृत्यूला कारण नाही ठरत का? आपल्या काळजीवाहू सरकारला माणूस मेल्याचही जराही दु:ख असेल तर महामार्ग रूंदीकरण, चांगले रस्ते, बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी कार्यक्रम राबवण्याचे औदार्य दाखवेल. आपले सरकार रस्ते सुरक्षा आणि अपघाती मृत्यू रोखण्यासाठी काय उपाययोजना करते? हा साधा प्रश्न अनेकदा विचारला जातो. परंतु एक वाहनचालक, नागरिक म्हणून आपणही वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात काही प्रमाणात घटण्यास मदत होईल ना? वाहनधारकांकडून कररूपात गोळा होणारा कोट्यवधी रुपयांचा निधी सुरक्षा सप्ताह, जनजागृती आणि वाहतूक प्रशिक्षणावर सरकार खर्च करते. त्यानंतरही महाराष्ट्रातील अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. याला सरकार जबाबदार की आणखी कोण? याचा शोध आता घ्यायलाच हवा.
मुंबई शहर, उपनगर व मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गावर एकही दैनंदिन अपघात घडला नाही, हा (मानवी चमत्कार) ज्या दिवशी घडेल तो दिवस सरकारदरबारी सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल. वाहतूक तज्ज्ञ ए. व्ही, शेणॉय यांच्या मते अपघातांना मुख्य कारण बेशिस्त वाहनचालक, भरधाव वेगात गाडी हाकणे, ओव्हरटेक करणे, गाडी चालवताना डुलकी लागणे, तांत्रिक कारणांमुळे गाडीचा ब्रेक न लागणे आहे. या सर्व कारणांचा अभ्यास केल्यास या अपघातांना खरचं जबाबदार कोण, याचे उत्तर आपोआप मिळते. आपल्या चुकीमुळे दुसर्याचा मृत्यू ओढवला ही घोड नव्हे तर गाढवचूक आहे, हे ज्याविदशी माणसाला कळेल त्यादिवशी काही फरक निश्चित पडेल? आपण परदेशाची पायरी चढलो नसलो तरी ऐकिवात गोष्टीनेही आपल्याला त्या देशांप्रती भलतेच आकर्षण वाटते. आपण कधी चुकून-मागून परदेशात गेलो तर अगदी आक्रसून गेल्याप्रमाणे तिथल्या लोकाचं चालणं, वागणं, बोलणं सर्व काही शिस्त म्हणून अनुसरू.
मग, आपल्या देशाची, राज्याची, भागाची शिस्तही कुणी तरी परक्या व्यक्तीने पाळावी, हे आपल्यासाठी भूषणावह केव्हा वाटेल? वाहतूकतज्ज्ञ सांगतात, ‘लंडनसारख्या देशात 100 किमी वार्याच्या वेगाने ट्रक चालवला जातो. असे असले तरी एकच लेन असल्याने येथे अपघात होत नाहीत. न्यूझीलंडमध्ये तर दोन लेनवरून गाड्या चालत असल्याने येथे अपघातांचे प्रमाण नगण्य आहे’. हे सर्व खरे असले तरी चांगले दूर सुस्थितीतील रस्ते देऊ न शकणारे आपले सरकार वाहतूक कधी तरी शिस्तीच्या लेनवर आणेल का? कल्याण आरटीओचे प्रमुख संजय ससाणे यांच्या मते ताणतणाव, लेन कटिंग, सिग्नल जम्पिंग आणि दारू प्राशन करून वाहन चालवणे आदी कारणांमुळे अपघात वाढत आहेत. वारंवार हीच कारणे व सरकारचे ‘वाट’ लागलेले रस्ता धोरण आपल्या पथ्यावर पडत आहे. अपघातात माणसे मेल्यावर एकदिवसाची हळहळ व दु:ख व्यक्त करून हे मृत्यूचे तांडव पाहण्यापलीकडे आपण काय करणार? अपघातांच्या बातम्यांनी भरलेले वर्तमानपत्रांचे रकाने कधी रिकामे होणार?
महाराष्ट्रात दररोज रस्ते अपघातांत मृत्यूमुखी पडणार्या माणसांच्या मृत्यूला कारण माणूसच ठरतो आहे. चांगले रस्ते फक्त स्वप्नरंजन, रस्ते कामातून भ्रष्टाचाराची मलई ओरपणे व माणूस मेल्यानंतर त्याला श्रद्धांजली, आदरांजली वाहणे हा आपला वर्षानुवर्षे चालत आलेला सार्वत्रिक कार्यक्रम. त्यात कुठे तरी खंड पाडून पालकत्वाची जबाबदारी असलेलं सरकार, व्यवस्था कधी तरी शहाण्यासुरत्यासारखी वागेल, अशी वर्षानुवर्षे अपेक्षा करण्यापलीकडे तरी आपण काय करू शकतो?”

