Details
पवारांमुळे मावळात भाजप-सेनेची दमछाक!
20-Mar-2019
| 0
”
विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षात उमेदवारांची चाचपणी त्याचबरोबर उमेदवार जाहीर करणे या घडामोडी मोठ्या वेगात होत असताना प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारांची देवाण-घेवाण सुरू आहे. ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टिकोनातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने मोठी प्रतिष्ठेची होणार आहे. कारण, गेली साडेचार वर्षे मोदी यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र त्याचा फायदा झाला नाही. हे भाजप नेत्यांच्या लक्षात आले आहे. नोटाबंदी, परदेशातून काळा पैसा भारतात आणणे, शेतकर्यांयची कर्जमाफी, वाढती महागाई, बेरोजगारी, दाऊद इब्राइमला भारतात आणणे आणि भ्रष्टाचार या सर्वच प्रश्नावर भाजप बॅकफुटला गेल्यामुळे विरोधी पक्षाने मोदी यांना धारेवर धरले. राजस्थान, मध्य प्रदेश अणि छत्तीसगड या तीन राज्यात काँग्रेसने आपला झेंडा रोवल्याने भाजपला मोठा हादरा बसला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी मायावती आाणि अखिलेश यादव एकत्र आल्याने भाजपला ही लोकसभा तशी सोपी जाणार नाही. एकदंरीतच देशातील वातावरण भाजपला अनुकूल नाही. मात्र, पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन मोदी यांनी एकप्रकारे राजकीय खेळी करून त्याचे भांडवल सुरू केले. त्याचा कितपत फायदा भाजपला होतोय, यावरही भाजपचे भवितव्य अवंलबून आहे. ही देश पातळीवरील परिस्थिती असली तरी महाराष्ट्रात भाजप शिवसेना या दोन्ही पक्षाबद्दल मोठी नाराजी आहे. शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. नोटाबंदीमुळे सामान्य वर्ग, शेतमजूर आजही यातून बाहेर न आल्यामुळे ती मोठी नाराजी आहे. शिवाय राज्यात वंचित बहुजन आघाडीने सर्वच्या सर्व जागा लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे कोणाच्या पथ्थ्यावर पडणार हेदेखील महत्त्वाचे आहे. मात्र, मावळ लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवारामुळे भाजप-शिवसेनेची दमछाक होणार हे निश्चित.
पुणे जिल्हा म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे वगळता तिन्ही खासदार भाजप व शिवसेनेचे निवडून आले. त्यावेळी मोदी यांची लाट असल्यामुळे या लाटेत ज्यांचे नाव माहित नाही, असेही निवडून आले. मात्र, मोदींची लाट ओसरली आहे. राष्ट्रवादीने बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, मावळ लोकसभा मतदारसंघातून पवारांचे नातू पार्थ पवार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. रविवारी चिंचवड येथील पार्थ यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचा मेळावा झाला. या मेळाव्याला लक्षणीय उपस्थिती असल्याने पार्थ निश्चितच समोरच्या उमेदवाराबरोबर लढत देणार हे निश्चित. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे प्रचार करत आहेत. मात्र, शिवसेनेने अधिकृत बारणे यांची उमेदवारी अद्यापही जाहीर न केल्यामुळे संभ्रम निर्माण केला आहे. कधी हा मतदारसंघ भाजपला सोडणार तर कधी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना शिवसेनेची उमेदवारी देणार असा राजकीय संभ्रम गेले काही दिवस सुरू असल्यामुळे पार्थ पवार यांच्यासमोर नेमका उमेदवार कोण, याबाबत मात्र, उलटसुलट चर्चा आहे. एकंदरीत मावळ मतदारसंघाची पार्श्वभूमी पक्षनिहाय बलाबल याचा अभ्यास करता भाजपचे पारडे जड आहे. मात्र, पवारांनी आपल्या नातूबद्दल घेतलेला निर्णय हा पूर्णतः विचार आणि अभ्यास करून घेतलेला आहे. शेकापचा पाठिंबा आहेच. मात्र, भाजपमधीलही अंतस्थ पाठिंबा मिळेल. हे त्यांचे राजकीय गणित असले तरी पार्थला निवडून आणण्यासाठी पवारांना आपले राजकीय अस्तित्त्व पणाला लावे लागणार आहे हे विसरता कामा नये.
पवार नेहमी राजकीय हुलकावण्या देत असतात. ते काही नवीन नाही. ते नेहमी बोलतात. त्याच्या उलट होते. हे महाराष्ट्रात अनेक वेळा राज्यकर्त्यांनी व जनतेनेही पाहिलेले आहे. मावळमधून पार्थ लढणार अशा बातम्या प्रथम आल्या. त्यादृष्टीने या मतदारसंघात पार्थ यांनी स्थानिक नेत्यांशी संपर्क साधून संवाद साधला. मध्येच शरद पवार यांनी कुटुंबातील सर्वजण निवडूक लढत असतील तर समाजामध्ये वेगळा संदेश जाईल. त्यामुळे पार्थ निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला. माढा लोकसभा मतदारसंघात पवारसाहेब लढणार अशी हवा पसरली. त्यामुळे तेथील स्थानिक खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामध्ये नाराजी पसरली. काही दिवसांत आपण माढामधून निवडणूक लढणार नाही, अशी भूमिका पवारांनी जाहीर केली. त्यामुळे पुन्हा माढा मतदारसंघातदेखील संभ्रमावस्था निर्माण झाली. माढामधून मोहिते यांना उमेदवारी देऊ नये, असा सूर तेथील स्थानिक आमदारांचा आहे. अशा परिस्थितीत पवार यांनी रणजित मोहिते-पाटील यांना तिकीट देण्याचे सूतोवाच केले. मात्र, अद्यापही मोहित्यांचे नाव जाहीर झाले नाही. अशा संभ्रमावस्थेत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन पवार यांना धक्का दिला. असे असतानादेखील पवार माढाबाबतीत निर्णयाला उशीर का घेत आहेत? मात्र, या निर्णयाचा फटका राष्ट्रवादीला बसला तर याची जबाबदारी कोण घेणार, हा खरा प्रश्न आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद या दोन जागांमध्येही काँग्रेस-राष्ट्रवादीचा घोळ मिटलेला नाही. त्यामुळे हा घोळात-घोळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीच्या युतीवर परिणाम तर होणार नाही ना? एकंदरीतच आज महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेवर नाराजी असताना या दोन्ही पक्षांनी समन्वयाने तातडीने निर्णय घेऊन जागावाटप जाहीर करून प्रचाराला सुरूवात करण्याची गरज आहे. मात्र, ही तू-तू मै-मै भाजपच्या पथ्यावर पडेल. याचा दोन्ही पक्षांचे नेते विचार करणार आहेत की नाही?
चिंचवड येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्याने आणि प्रचाराच्या आरंभाने जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. पार्थ याच्या प्रचारानिमित्त अजित पवार यांनी व्यक्तिगत काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडे गट या सर्व स्थानिक नेत्यांशी गाठीभेटी घेऊन प्रचारात आणि निवडणुकीत एकदिलाने काम करण्याची विनंती केली. त्यादृष्टीने हे सर्वच नेते या मेळाव्याला उपस्थित राहून त्यांनी पार्थला निवडून आणायचे आश्वासन दिले. खुद्द शरद पवार यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार प्रत्येक आघाडीवर कशा पध्दतीने नापास झाले आहे याची उदाहरणे दिली. पुलवामा येथील जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने 40 जवान शहीद झाले. याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागणारच. त्यानंतर हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला जशास-तसे उत्तर दिले. यामुळे सर्व भारतीयांची मान उंचावली आणि सैनिकांच्या धैर्याला देशभरातून पाठिंबा मिळाला. यातून सर्व भारतीय देश संकटात येतो, त्यावेळी एक असतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले. मात्र, पंतप्रधान मोदी याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे योग्य नाही. हे आपल्या देशवासियांना कळून चुकले आहे. हेदेखील पवार यांनी सांगण्याचा प्रयत्न करून देशातील जनतेने भाजपच्या या फसव्या प्रचाराला बळी पडू नये, असे सांगितले. दुसर्याे बाजूला अजित पवार म्हणाले, माझ्या मुलासाठी आज मला मते मागण्याची वेळ आली आहे. पवारसाहेबांची तब्येत साथ देत नाही. त्यामुळे ही निवडणूक साहेबांची आहे, असे समजून कामाला लागा. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार यांच्या या शब्दांना आक्षेप घेऊन मी अजून म्हातारा झालो नाही, आजूनही मनगटात रग आहे, असे पवारांनी बोलून दाखविल्यामुळे पवारांचा आजही मोठा आत्मविश्वास असल्याचे यावरून जाणवले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रथम माजी आमदार विलास लांडे यांना लोकसभेसाठी कामाला लागा असे सांगितले. त्यावर लांडे यांनी आपल्या समर्थकांसह कामे सुरू केली आणि अचानक चित्रपट अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना शिरूर लोकसभेमधून उमेदवारी देऊन त्यांनी प्रचाराचे काम सुरू केले. अशा परिस्थितीत लांडे यांचे समर्थक नाराज झाले. त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे गडबड होणार की काय? अशा परिस्थितीत खुद्द लांडे यांनी पवारांच्या उपस्थितीत पार्थ आणि कोल्हे यांना कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याची तुमची आणि माजी जबाबदारी आहे, असे स्पष्ट करून या गोंधळलेल्या वातावरणाला पूर्णविराम दिला.
पिंपरी-चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पिंपरी विधानसभा शिवसेनेकडे असून घाटाखाली कर्जत नगरपालिका शिवसेनेकडे आहे. गेल्या वेळेस बारणे भाजप-शिवसेनेची युती असल्यामुळे लाटेतमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मात्र, यावेळेस तशी अवस्था नसल्यामुळे शिवसेनेने त्यांना काम करण्याचे सांगितले असले तरी उमेदवारी जाहीर केली नाही. कारण, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र, जगताप यांनी नकार दिला. तर दुसर्यां बाजूला भाजपला हा मतदारसंघ सोडावा, अशीही मागणी भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेकडे करत होते. मात्र, अजूनही घोळ मिटलेला नाही. कारण, आमदार जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. म्हणूणच बारणे यांचे नाव अधिकृत जाहीर केले जात नाही, असे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात जगताप इच्छूक होते. मात्र, पक्षीय आघाडीमुळे त्यांना अडचणीचे झाले. खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात राजकीय हाडवैर असल्यामुळे ते बारणे यांचे काम करतील की नाही अशी शंका घेतली जाते. कोणत्याही परिस्थितीत भाजप-सेनेच्या अधिक जागा राज्यात आणून मोदींना पंतप्रधान करायचे असा निर्णय भाजप व शिवसेना नेत्यांनी घेतल्यामुळे जगताप यांना बारणे यांचे काम करावे लागेल. कारण, पुढील राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जगताप यांची समजूत काढल्याचे समजते. दुसर्याे बाजूला अजितदादा आणि पवारसाहेब यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून आपल्या नातवाला मदत करा, अशी विनंती केल्याचे समजते. एकंदरीतच या मावळ मतदारसंघातील हा राजकीय गोंधळ कोणाच्या पथ्यावर पडतो आणि मतदार कोणाच्या झोळीत मतदान टाकतील यावर त्यांचे भवितव्य अवंलबूनच आहे. मात्र, गेल्या साडेचार वर्षांतील केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने केलेली जनतेची फसवणूक जर मतदारांच्या डोक्यात बसली असेल तर मात्र अब की बार मोदी सरकार नसून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार, हे निश्चित.”

