Details
धुळ्यात कोणाची धूळ उडणार?
26-Apr-2019
| 0
”
अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार
atulm2001@gmail.com
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर होत आहे. भाजपने विद्यमान खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर, काँगेसने त्यांच्यासमोर कुणाल पाटील यांच्या रूपाने कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे आमदार अनिल गोटे भामरे यांचा बदला घेण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक रिगणात आहेत तर वंचितचा उमेदवारसुद्धा आपले अस्तित्व दाखवत आहे.
सद्यस्थितीत धुळे शहर आणि ग्रामीण तसेच मालेगाव, मालेगाव बाह्य, सिंदखेडा, बागलाण आणि मालेगाव मध्य या सहा विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. धुळे शहर आणि सिंदखेडामध्ये भाजप तर धुळे ग्रामीण आणि मालेगावमध्ये काँग्रेस, मालेगावबाह्यमध्ये शिवसेना आणि बागलाणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात वेगळी राजकीय गणिते मांडली जाऊ शकतात. मुळातच हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2009 आणि त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेत तो ढासळला. त्यावेळी सुभाष भामरे यांनी काँग्रेसचे रोहिदास पाटील यांचा मोठा पराभव केला. तेव्हापासून संघटनात्मक पातळीवर काँग्रेसमध्ये फारसे सकारात्मक वातावरण नव्हते. पण लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी येथे झालेल्या महापालिका निवडणुकीत राजकीय डावपेच आखले गेले. भाजपचे कट्टर समर्थक आमदार अनिल गोटे यांनी उभा डाव मांडून थेट आव्हान दिले. गोटे यांना अपेक्षित यश पदरात पडले नसले तरी त्यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत नाराजी समोर आली. यावेळीही गोटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. परिणामी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
सुमारे 18 लाख 74 हजार इतकी मतदारसंख्या असलेला हा भाग मुस्लिमबहुल तसेच मराठा पाटील समाजाचे वर्चस्व असलेला आहे. सध्याचे भाजपचे विद्यमान खासदार सुभाष भामरे हे केंद्रात मंत्री असल्याने त्यांचा मतदारसंघाशी सम्पर्क राहिलेला नाही असा प्रचार काँग्रेसकडून सातत्यानं करण्यात येत आहे आणि त्याचे दर्शन जाहीर सभांमध्ये दिसते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भक्कम आघाडी आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून मराठा पाटील चेहरा देण्यात आला असल्याने त्याचा आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे सुरूवातीला रोहिदास पाटील यांचे नाव चर्चेत होते. पण नंतर विरोधामुळे हे नाव मागे पडले. कुणाल पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादीनेसुद्धा एकमताने संमती दिली असल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र काम करताना दिसत आहेत. रोहिदासदाजीही कामाला लागले आहेत. मुस्लिमबहुल भागात भाजपला मते मिळू नयेत यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात मालेगाव बॉम्बस्फोटांत नाव आलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहला भाजपाने उमेदवारी दिल्याचाही मुद्दा आघाडीने प्रचारात आणला आहे. कारण धुळे मतदारसंघात सुमारे ५० टक्के मुस्लिम मतदार आहेत.
भाजप आणि शिवसेना यांची युती झाली असली तरी या युतीमध्ये सगळे आलबेल नाही ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते किती मनापासून भामरे यांना साथ देतात त्यावरच सगळे अवलंबून आहे. त्यातच अनिल गोटे यांचे उभे आव्हान आहेच. याचा परिणाम धुळे शहरामध्ये जाणवू शकतो. वंचितचा उमेदवार दलित आणि मुस्लिम मते किती खेचतो हे येथे महत्त्वाचे आहे. कारण त्याचा थेट फटका काँग्रेसच्या कुणाल पाटील यांना बसू शकतो. पण हे सर्व मतदान एकूण किती टक्के आणि कोणत्या भागात किती होते यावर अवलंबून आहे. भामरे यांच्याविषयी असलेली नाराजी तसेच भाजपांतर्गत असलेला वाद बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, रखडलेली विकासकामे अशा अनेक प्रश्नांभोवती ही निवडणूक फिरत आहे. त्यातच जातीय मताचे ध्रुवीकरणसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामुळे या निवडणुकीत भामरे पुन्हा निवडून येणार की भाजपची धुळ्यात धूळ उडणार हे 23 मे रोजीच समजेल.”

