Details
“थापा, सवलती आणि निवडणुका”
08-Dec-2018
| 0
”
शैलेंद्रशिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
राज्य करायचं म्हटलं तर थापा मारणं म्हणजे नगाऱ्यावर थापा मारणं जमलं पाहिजे.. आज एक थाप.. उद्या दुसरी थाप.. आज स्वबळाची भाषा तर उद्या युतीची साखरपेरणी. परस्परांकडे पाहायचं, गोड हसायचं, एकाच गाडीतून फिरायचं आणि समोर जमलेल्या जनताजनार्दनाच्या साक्षीने थापा मारायच्या नगाऱ्यांवर. हे ज्याला जमलं त्याला राजकारण कळलं आणि निवडणुकांपर्यंत घोळ कसा वाढवत ठेवायचा हेही कळलं म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही ही निपुणता आहे हे वाशीमच्या कार्यक्रमात दिसून आलेच. परस्पर स्तुतीचे पाठ कार्यक्रमात ओवाळल्यावर या दोघांनी पुन्हा एकमेकांकडे पाठ फिरवली. यामुळे कार्यकर्ते मात्र जबरदस्त गोंधळले असणार. फडणवीस यांनी उद्धव यांना मार्गदर्शक म्हणून गौरवले. तेच उद्धव कार्यक्रमात फडणवीसांसोबत थापा मारून नगारा वाजवून संध्याकाळी मुंबईत स्वबळाची भाषा बोलत होते.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिक आक्रमक होण्याचे आदेश देत बाह्या सरसावल्या. आता जर हेच उद्धव यांचे मार्गदर्शन असेल तर फडणवीस कशाला मागे राहतील? त्यांनी उद्धव यांचाच कित्ता गिरवला तर ते चुकीचे आहे असेही म्हणता येणार नाही. कारण उद्धव त्यांचे मार्गदर्शक आहेत ना. मजा अशी आहे की, ज्या निवडणुकांकडे शिवसेनेचे डोळे लागले आहेत त्याच निवडणुकांचे मैदान स्वबळावर मारण्याची भाजपाची तयारी कधीच पूर्ण झाली आहे. अगदी बूथनिहाय आखणीही झाली आहे. शिवसेना तयारीला लागली असली तरी त्यांचे अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे. एकला चलो रे म्हणत स्वबळावर धनुष्याला बाण लावायचा की बाणांचा भाता भाजपाकडे सोपवायचा हा कार्यक्रम आजही उद्धव यांच्या मनात निश्चित झालेला नाही. अर्थात दोन्ही पक्षांनी निवडणुकांचीही तयारी सुरू केली आहेच.
वाशिममध्ये या दोन्ही पक्षांच्या धुरीणांनी नगाऱ्यावर थापा मारल्या त्याच्याही कितीतरी आधी निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. ज्यांचे कान राजकारणातील अंतर्प्रवाहाना सरावलेले असतात त्यांना ते ऐकू आले आहेतच. सर्वसामान्यांनाही निवडणुका जवळ आल्याचे अनेक संकेत मिळत असतात. अनेक गोष्टी घडू लागतात. ज्या घडत नसतात त्या वेगाने मार्गी लागतात. मागण्या अचानक मान्य होतात. वेतन आयोगाची घोषणा होते. प्रकल्पांची पायाभरणी होते. वादग्रस्त प्रकल्प हळूच कोपऱ्यात ढकलले जातात, स्थगिती मिळते. घोषणा, कार्यक्रम, आरंभ, शुभारंभ, प्रकल्प, निधीवाटप कितीतरी संकेत मिळू लागतात. आरक्षणासारखी किचकट आणि जटील भिजत घोंगडे पडलेली मागणी एकदम सुतासारखी सरळ होऊन मान्य केली जाते. जाऊ तिथे निधीवाटपाच्या घोषणा सुरू होतात. आणखी एक गोष्ट घडते. निवडणूक लढवायला गरज असते बंद्या रूपयांची. निधीची. मग ज्यांच्याकडून निवडणूक निधी मिळणार त्यांच्यासाठी खास सवलतींचा मारा सुरू होतो. काही सवलती थेट तर काही हळूच मागल्या दाराने जाहीर होतात. पण देणगीदारांच्या समुहाला फायदेशीर अशाच घडामोडी अचानक घडू लागतात. प्रशासन नामक यंत्रणेची अनेक चाके वेग घेतात. हे जेव्हा दिसू लागते तेव्हा जनता समजून जाते की आले निवडणुकांचे दिवस परतुनी आले.
अशीच एक गोष्ट सध्या घडते आहे. या युतीच्या आणि स्वबळाच्या नाटकात आणि राम मंदिर व हिंदुत्व अशा उभ्या केलेल्या भुलभुलय्यात लोकांच्या लक्षात येणार नाही अशा खुबीने मुंबई बकाल करण्यासाठी बिल्डरांना आंदण देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकात्मिक नगरे वसवण्यासाठी आदिवासी जमीनी, पूरनियंत्रण भूभाग, जंगलांभोवतीचा बफर झोन असं सारं काही विकासाच्या नावाखाली खुले करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे मुंबई आणि राज्यातील उरलासुरला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर सरळसरळ बांधकाम उद्योजक, कारखानदार यांना लचके तोडण्यासाठी आंदण दिला जाणार आहे. संबंधित विभागांच्या निर्णयक्षमतेवर या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागांचा श्वास आता अवलंबून असेल. म्हणजेच या वनसमृद्ध परिसरांत सिमेंटची जंगले उभारण्याचा निर्णय संबंधित अधिकारी, मंत्री यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर अवलंबून असेल. निवडणुका जवळ आल्यावर अशा बुद्धीला गंज चढतो हे सर्वज्ञात आहे. हरित जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतल्यावर येथे विकास घडून येईल की विनाश हे वेगळे सांगायची गरज नाही. पर्यावरण तज्ज्ञांनी असे काही घडल्यास भीषण पर्यावरणीय संकटाचा इशारा दिला आहे. २२ नोव्हेंबर रोजी हे सुधारित धोरण सरकारने वेबसाईटवर टाकले आहे. नवी मुंबई सेझ प्रकल्प आणि दिंडोशीचा रहेजा प्रकल्प, राज्यभरातील एकूण ३३ एकात्मिक वसाहत प्रकल्पांना याचा लाभ होईल. यातील २० पुणे आणि परिसरातील तर ८ बृहन्मुंबई क्षेत्रात व ५ नागपूर परिसरात आहेत. पर्यावरणीय निकषांचे पालन करूनच परवडणाऱ्या घरांसाठी हे नवे धोरण आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत याचे आणखी वेगळे संकेत काय असणार?”

