HomeArchiveचौकीदार कुणीही व्हा...

चौकीदार कुणीही व्हा पण देश राखा!

Details
चौकीदार कुणीही व्हा पण देश राखा!

    19-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
shail.dinman@gmail.com
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदारालाच चोर ठरवल्यामुळे आणि आरोपांचा सपाटा लावल्यामुळे चौकीदार खूपच दुखावले गेले आहेत. खरे तर मी देशाचा चौकीदार आहे म्हणत सुरूवात माननीय प्रधानसेवकांनीच केली होती. पण ती चौकीदारी महागात पडतेय, हे राहुल गांधी आणि विरोधी पक्षांतील जाणत्या नेत्यांनी दाखवायला सुरूवात केल्यावर चौकीदार अस्वस्थ झाले. त्यांचा पक्षही अस्वस्थ झाला. आपल्याकडे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही चौकीदार चोर आहे, असे काही काळ म्हणायला लागले होते. त्यांना दटावूनही चालणार नव्हते. कारण महाराष्ट्रातील ४८ जागांचा प्रश्न होता आणि लोकसभेपुरती का होईना युती, मैत्रीचे नाटक करणे गरजेचे होते. तसे ते साग्रसंगीत पार पाडून अमितभाईंनी आपल्याकडे शिवसेनेला निवडणुकीपुरते गप्प बसवले तरी देशभर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षनेत्यांनी गदारोळ सुरूच ठेवला होता. यामुळे चौकीदाराच्या बाजूने जो काही युक्तीवाद सुरू होता तोही लंगडा वाटू लागला. काहीजण तर आता चौकीदाराची बोलती बंद झाली बघा, असे हिणवू लागले. ज्याच्यावर देशाची जबाबदारी टाकून जनता निर्धास्त झाली होती त्याची चौकीदारीच खात्रीची नसल्याचे एकामागून एक घटनांमधून आणि विविध आरोपांमधून राहुल गांधी आणि इतरांनी चव्हाट्यावर मांडायला सुरूवात केल्यावर तर खूपच गडबड झाली. कुणालाच उपाय सुचेना. चौकीदार झोपलेला नाही, तो जागा आहे, असे घशाला कोरड पडेपर्यंत सांगूनही जनतेला खात्री वाटेना.

निवडणुका जवळ येत असताना जनता चौकीदाराबद्दलच अशी साशंक, संभ्रमित होऊन चालणार नव्हते आणि उपायही सुचत नव्हता. अखेर चौकीदारानेच रात्रभर जागरण करून उपाय शोधला. मी देशाचा चौकीदार.. ही जुनी रेकॉर्ड पुन्हा उगाळत आपल्या नावाआधी चौकीदार नाव लावून घेतले. मै भी चौकीदार… या नव्या चमकदार डायलॉगमुळे चौकीदार चोर है.. या जनतेत हीट झालेल्या डायलॉगचा विसर पडेल अशी आशा आता चौकीदार आणि त्यांच्या पक्षाला लागली आहे. ‘तुमचा चौकीदार खंबीरपणे उभा आहे आणि देशाची सेवा करत आहे. पण मी एकटा नाही. भ्रष्टाचार, सामाजिक असमानतेविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदारच आहे.. भारताच्या प्रगतीसाठी झटणारा प्रत्येकजण चौकीदार आहे, अशी भलामण करत चौकीदाराने नाव बदलले. त्यापाठोपाठ त्याच्या पक्षातील सर्वच नेत्यांनी आपापल्या नावात अनधिकृत बदल घडवून आणला आहे. एकजात सर्वच चौकीदार झाले आहेत. जणू काही मोठ्या प्रमाणावर चौकीदाराचे रोजगार निर्माण झाले आहेत. पण यामुळे चौकीदार चोर है.. हे काही लोकांच्या मनातून पुसले जाणार नाही.

कारण या वाक्याशी अनेक घडामोडी, प्रकरणे, संशयास्पद तपशील निगडीत आहेत वा राहुल गांधी आणि त्यांच्या आघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी जोडून तरी दाखवले आहेत. आणि त्याचा समर्थ प्रतिवाद वा हे आरोप ठामपणे खोडून काढणे अद्याप चौकीदार वा त्याच्या टीममधील कुणालाच जमलेले नाही. उलट आरोप खोडायला गेलेल्यांनी आणखी भलभलते तपशील उजेडात आणून सत्ताधारी पक्षाची गोची करून ठेवली आहे. त्यात द हिंदू ने पत्रकारितेचा धर्म पाळत लपवलेल्या गोष्टीही चव्हाट्यावर मांडल्या आहेत. अटर्नी जनरल वेणूगोपाल यांनीही त्यांच्या परीने सरकारला अडचणीत आणले आहे. यामुळे रडकुंडीला आलेल्या सरकारने थेट आमची कागदपत्रे चोरली म्हणून आम्ही आता खटला भरणार, असा रडीचा डावही वेणूगोपाल यांच्या माध्यमातून खेळून पाहिला होता. हे जे काही सुरू आहे ते लोकांच्या नजरेसमोरच सुरू आहे. यातील काहीही लपून राहिलेले नाही.

निवडणुका आल्या की आपल्या देशातील सर्वसामान्य जनता एकदम मतदारराजा वगैरे होते आणि या मतदारराजाला कसे फशिवलं म्हणत जे राज्य करत असतात त्यांची बुडे निकालाच्या दिवशी दाणकन जमिनीवर आदळलेली असतात. आताही आम्ही देशाचे चौकीदार म्हणत जी मंडळी पुढे सरसावली आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण अविश्वासाचे नसले तरी संशयाचे वातावरण तयार झाले आहे. या संशयाच्या वलयातून चौकीदाराला नामबदलाने बाहेर काढलेले नाही. उलट चौकीदार याच नामाभिधानाचा वारंवार उल्लेख होत असल्याने मतदारांना विरोधी पक्षांनी फार काही न करताही चौकीदार चोर है.. याचीच आठवण प्रकर्षाने होणार आहे. या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी चौकीदार या शब्दाबाबत आता अधिक शब्दच्छल वा बचाव करणे सत्ताधारी पक्षाला, नेत्यांना थांबवावे लागणार आहे. देशाचा चौकीदार कोण आहे यापेक्षा देशाची सूत्रे ज्या चौकीदाराकडे सोपवली जातात, ज्याच्यावर पाच वर्षांसाठी विश्वास दाखवला जातो, त्याने या विश्वासाला जपायला हवे, देशाला सुरक्षित, अखंड ठेवायला हवे, देशाला आर्थिकदृष्ट्या खंबीर बनवून प्रगतीपथावर न्यायला हवे, हीच मतदारांची अपेक्षा असते. चौकीदार कुणीही व्हा पण देश राखा, देशहिताला प्राधान्य द्या, ही अपेक्षा प्रत्यक्षात आणतील असा भरवसा ज्यांच्याबद्दल वाटतो, त्यांनाच मतदारराजा देशाचा चौकीदार बनवतो.. नाहीतर चौकीदार बदलतो, दुसऱ्या चौकीदाराकडे देशाची सूत्रे सोपवली जातात हे वेगळे सांगायची गरज नाही!”
 

Continue reading

‘बीएमसी’त इतिहास घडविणाऱ्या ‘मेट्रो वुमन’!

बीएमसीच्या म्हणजेच मुंबई महापालिकेच्या १३८ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजपर्यंत आयुक्तपदावर कधीही महिला बसली नव्हती. मात्र, ३१ मार्च २०२६ हा दिवस त्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला. महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बीएमसी आयुक्तपदी नियुक्ती जाहीर केली. या...

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....
Skip to content