Details
गुंतवणूक म्हणजे नेमके काय ?
28-Nov-2018
| 3
”
विनायक कुळकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेशक
मोठ्या कष्टाने जमा केलेली बचत बँकेच्या –पोस्टल योजनांत, म्युच्युअल फंड, शेअर्स, डिबेंचर्स-बोंण्ड्स सारख्या विविध गुंतवणूक साधंनांमध्ये गुंतवत असतो.पण ही गुंतवणूक म्हणजे नेमके काय? असा प्रश्न कधी न कधी मनात येतच असतो. जादा उत्पन्न मिळवण्यासाठी किंवा भांडवल वृद्धीसाठी आपल्याकडील निधीचा केलेला योग्य विनियोग म्हणजे गुंतवणूक. उत्पन्नाच्या म्हणजेच पैशाच्या स्रोतांची अशा तर्हेने नियोजन करणं की त्यामुळे निश्चित केलेल्या अवधीत निश्चित लाभ किंवा उत्पन्न उपलब्ध होईल. यालाच अर्थशास्त्रीय भाषेत वित्तीय गुंतवणूक म्हणतात. या गुंतवणुकीत गुंतवणूकदार हाच एकीकडे निधीचा ‘पुरवठा’ करतो तर दुसरीकडे तोच गुंतवणूकदार ‘उपभोक्ता’ही असतो.
गुंतवणूकदाराने गुंतवलेल्या निधीवर त्याला व्याज [Interest], लाभांश [Dividend] , वर्षासन [Annuity], निवृत्तीवेतन[Pension], आणि भांडवली वृद्धी [Capital Appreciation] इत्यादी प्रकारे लाभ प्राप्त होत असतो. विचारपूर्वक आणि निवडक गुंतवणूक योग्य माध्यमांत केलेली गुंतवणूक मूळ भांडवल सुरक्षित ठेवतेच, नियमित वाढीव उत्पन्नासह प्रदीर्घ मुदतीत उत्पन्न प्राप्त होण्याची प्रसंगी हमीसुद्धा मिळते.
आपल्याला गुंतवणुकीस भाग पाडणारे बरेच घटक आहेत. सेवानिवृत्तीपश्चात काळासाठी भविष्य निर्वाह निधीची घेतलेली सुविधा असो किंवा म्युच्युअल फंडांच्या पेन्शन फंडात किंवा सरकारच्या नवीन पेन्शन योजनेत दिलेले आर्थिक योगदान असो. भविष्यातील उत्पन्नाच्या तरतूदीसाठी केलेली एक कृती आहे. आकर्षक व्याजाचे दर बघून अधिक उत्पन्नाच्या आशेने सुरक्षित योजनांना दूर ठेऊन आततायी कृती करणारे गुंतवणूकदार भरपूर आहेत. आयकर वाचविण्यासाठी गुंतवणुकीला पर्याय नसल्याचे कळल्यावर प्रसंगी कर्ज घेऊन कर बचत योजना घेणारे गुंतवणूकदार आजही कमी नाहीत. खरं म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नपूर्वक नेटाने गुंतवणूक करणार्यांची संख्या आता वाढू लागली आहे.
आज आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक मार्ग किंवा साधने पुढ्यात आहेत. काही ठराविक मार्ग सर्वसामान्यांना परिचित असतात. पण गुंतवणुकीचे मुख्य दोनच प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष गुंतवणुकीचा, तर दूसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा.
प्रत्यक्ष गुंतवणुकीत स्वत: गुंतवणूकदारानेच गुंतवणुकीचं माध्यम शोधून त्यातील कोणती योजना त्याच्या आर्थिक उद्दीष्ट पूर्तीसाठी उपयुक्त ठरू शकेल हे निश्चित करावयाचे असते. एवढेच नव्हे तर त्या योजनेचीची मुदत, त्या योजनेत केली जाणारी गुंतवणुकीची रक्कम तसेच त्या गुंतवणुकीची सातत्यता[Frequency] ठरविण्याची जबाबदारी सर्वस्वी गुंतवणूकदाराचीच असते. प्रत्यक्ष गुंतवणुकीत बँक-पोस्ट खाती-ठेव योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, जमीनजुमला, स्थावर मालमत्ता इत्यादी मार्ग सर्वसामान्य गुंतवणूकदारांना माहिती आहेत. परंतु शेअर्स, कर्जरोखे, चिट फण्ड्स, सरकारी रोखे-बोंण्ड्स, दुर्मिळ वस्तु-नाणी-चित्रे इत्यादी माध्यमेसुद्धा प्रत्यक्ष गुंतवणूक ठरतात. या माध्यमांत गुंतवणूकदारालाच नेमकी निवड करण्याचे किंवा दिशा ठरविण्याचे काम करावे लागते. प्रत्यक्ष गुंतवणूक योजनांची यासाठीच प्रत्येक गुंतवणूकदाराने किमान माहिती घेऊन त्या गुंतवणूक योजनांतील जोखीम-उत्पन्न प्रमाणाची दखल घेऊन नंतरच गुंतवणूक निर्णय घेणे त्याच्याच हिताचे ठरते.प्रत्यक्ष गुंतवणुकीत बँक-पोस्टल योजना वगळल्यास इतर सर्व माध्यमांत आर्थिक निरक्षरतेमुळे किंवा माहितीअभावी फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
गुंतवणुकीचा दूसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा. या प्रकारात गुंतवणूकदाराचा फक्त निधी असतो. परंतु या निधीचा विनियोग करण्याचे किंवा नियंत्रण ठेवण्याचे काम सरकारी किंवा निमसरकारी किंवा सेबी सारख्या नियामकांकडे नोंदणीकृत खाजगी वित्त संस्था करीत असतात. निवृत्तीवेतन निधी, आयुर्विमा, भविष्य निर्वाह निधी, म्युच्युअल फण्ड्स इत्यादींच्या योजना अप्रत्यक्ष गुंतवणूक ठरतात.”

