Details
केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
खोट्या ‘खेलो इंडिया’ जाहिरातींच्या माध्यमातून अनेक उदयोन्मुख खेळाडूंना फसविल्याच्या तक्रारींची दखल घेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून उत्तर प्रदेशात एफ.आय.आर. दाखल करण्यात आला आहे.
“भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (SAI) देशभरातील तळागाळातील तरूण खेळाडूंकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की, 2021 मध्ये हरियाणातील पंचकुला येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज मागवण्याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. या जाहिरातीत ‘खेलो इंडिया’ शिबिरात नाव नोंदवण्यासाठी खेळाडूंना 6000 रुपये जमा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच चाचणीनंतर ते ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. जाहिरातीत एक दूरध्वनी क्रमांकदेखील दिला आहे.”
“या तक्रारींची दखल घेत प्राधिकरणाने इच्छुक असल्याचे दाखवत आग्रा येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती मिळवली आहे. या जाहिरातीमध्ये युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या लोगोचा वापर केला आहे. त्यामुळे कित्येक खेळाडूंची ही सरकारी जाहिरात असल्याबाबतची दिशाभूल केली गेली.”
“यानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने उत्तर प्रदेश पोलिसांत प्रथम माहिती अहवाल (एफ.आय.आर.) दाखल केला आहे आणि या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास सांगितले आहे. खेलो इंडिया, ही एक सरकारी योजना आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना पैसे देण्याची गरज नाही. एसएआय / खेलो इंडियाकडून कोणतीही चाचणी घेतली जात नाही. एसजीएफआय / एआययूने आयोजित केलेल्या शालेय स्पर्धा / विद्यापीठ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरतात. त्यामुळे इच्छुकांनी फसवणूक टाळावी, असे आवाहनही सरकारने केले आहे.”