Details
इंडियन जुगाड ते जैवकृत्रिम स्वादुपिंड!
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
भारतीयांची आयडियाची कल्पना फार विलक्षण आहे. प्रचंड डोकॅलिटी लाभलेला आपला समाज आहे. खेडोपाड्यांत वेगवेगळ्या समस्यांवर, प्रश्नांवर तिथल्या तिथे उत्तरे शोधून मार्ग काढल्याची उदाहणे हजारोंनी आपल्याला पाहयला मिळतील. कुशाग्र तैलबुद्धी, संशोधनक्षमता, अडचणींवर मात करण्याची चिकाटी, या ना त्याप्रकारे साध्यासाध्या वस्तूंमधून उपकरणांची निर्मिती करून समस्यापूर्ती करणारे भारतीय जगप्रसिद्ध आहेत. आयटी क्षेत्रापासून संशोधन क्षेत्रापर्यंत आपला जगभर जो दबदबा आहे तो यामुळेच आहे. गेल्या काही पिढ्यांनी सातासमुद्रापार आपल्या कर्तृत्त्वाचे झेंडे रोवले असतानाच भारतातील आपला समाजही विलक्षण उपकरणे, सुविधा यांची होममेड निर्मिती करत आहे. याला भारतीयांची जगण्याची इंडियन जुगाड पद्धती असे गौरवपर नामाभिधानही सोशल मीडियावर प्राप्त झाले आहे. या इंडियन जुगाडची कितीतरी उदाहरणे समाजमाध्यमांवर अनेकदा चित्रफितींच्या स्वरूपात फिरत असतात.
परवाच एक चित्रफित फिरत होती. फिरत्या टेबलफॅनच्या जाळीत अडकवेल्या काठीला बांधलेला द्राक्षांचा घड पलंगावर झोपलेल्या एका मुलीच्या तोंडाशी पंखा फिरेल तसा ठराविक वेळाने येत असल्याची ही चित्रफित होती. मागे अशीच एक चित्रफित आली होती. त्यात खोलीत अभ्यास करणाऱ्या मुलाने दरवाजालाच दोरी बांधल्यामुळे दार उघडले की आपोआप दोरी खेचली जाऊन त्याच्यासमोर अभ्यासाची पुस्तके उघडली जाऊन मोबाईल लपवला जातोय, असे दिसत होते. हे शोध विनोदी वाटले तरी त्यामागे भारतीय डोकॅलिटी आहे, इंडियन जुगाड आहे. असाच घरगुती शॉवर, शिवणयंत्र, कपडे धुण्याचे यंत्र, सायकलाला चार्जींग, शेतातील कापणी यंत्र असे कितीतरी शोध इंडियन जुगाड पद्धतीने आपल्या देशवासियांनी लावले आहेत. या इंडियन जुगाड प्रकारच्या शोधांसाठी काही स्पर्धाही सुरू असतात. त्यात एकदम भारी ठरणाऱ्या शोधांसाठी पुरस्कार देण्यात येतात आणि या उपकरणांची व्यावसायिक प्रकारे उत्पादन करण्यासाठी वित्तपुरवठाही केला जातो.
लफडा असा आहे की या संशोधन क्षेत्रातील कोणतेही उच्च वा यथायोग्य शिक्षण घेतले नसताना ही जुगाडू मंडळी ही अफलातून कामगिरी करत असतात. वास्तविक जुगाड म्हणजे वेळ मारून नेणे नाही.. तर अडचणींवर स्वबळाने मात करणे, त्यासाठीही अंगीभूत हुशारी लागतेच.. ती उधार, उसनवारी करून मिळत नाही.. या जुगाडांचे तथा संशोधनांचेही खरेतर बौद्धिक संपदा हक्कानुसार पेटंट घ्यायला हवे. ते फार प्रमाणात होत नाही. ती जागरूकता निर्माण करायला हवी. मध्यंतरी ठाण्यात महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या प्रोत्साहनाने चव महाराष्ट्राची या खाद्य महोत्सवाचे आयोजन कऱण्यात आले होते. तिथे मातीचा फ्रिज पाहिला होता. गावांमध्ये महागडा, वीज खाणारा फ्रिज काय कामाचा आणि तो परवडणार तरी कितीजणांना? तिथे हे मिट्टीकूल शीतकपाट खरोखरीच एका चमकदार कल्पनेचे प्रात्यक्षिक होते. त्यात पाणीही माठासारखे थंडगार आणि खाद्यवस्तूही फ्रिजसारख्याच ताज्या, थंड राहतात.
ज्येष्ठ पत्रकार दिलिप पाडगांवकर यांनी सांगितलेल्या जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या काही आठवणी मनस्पंदने या ब्लॉगवर वाचनात आल्या होत्या. त्यात पाडगांवकर सांगतात– एका भटकंतीत त्यांची गाडी बंद पडली. तेव्हा एका पंजाबी ट्रकचालकाने गाडीखाली जाऊन पाच मिनिटे काहीतरी केले आणि गाडी सुरू झाली. पण ती पुढे जाईना. तेव्हा ड्रायव्हरनं चिडून एक लाथ मारली आणि इंजिन व्यवस्थित सुरू झालं. ते पाहून लक्ष्मण म्हणाले, ‘असं जुगाड करणं, हे भारतीयांच्या रक्तातच आहे. ही जी जीवन जगण्याची धडपड आहे, त्यामुळे प्रत्येक माणूस एक्स्पर्ट होतो.’ लक्ष्मण यांचे हे निरीक्षण मोलाचे आहे. प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्याची, जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याची विजिगिषु वृत्ती बाळगून भारतीयांच्या पिढ्या आजवर वाटचाल करत आल्या आहेत.
अवकाश संशोधनात आपल्यावर निर्बंध घातले गेल्यावर आपल्या भारतीय तंत्रज्ञांनी क्रायोजेनिक इंजिन भारतातच बनवून दाखवले होते. आता तर भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीच्या देशांनाही मागे टाकले आहे. जी गोष्ट अवकाश संशोधनाची तीच इतर क्षेत्रांतील संशोधनांची. मंगळवारी प्रसिद्ध झालेली एक बातमीही अशीच अभिमानाने मान उंचावणारी आहे. आपल्या मुंबई आयआयटीतील तरूण संशोधक जयेश बेल्लारे यांनी इन्सुलीन तयार करणाऱ्या जैवकृत्रिम स्वादुपिंडाची निर्मिती केली आहे. या कृत्रिम स्वादुपिंडाचे उंदरामधील प्रत्यारोपणही यशस्वी झाले असून माणसांमध्ये हे स्वादुपिंड स्वीकारले गेल्यास लाखो मधुमेहींची मधुमेहाच्या सापळ्यातून सुटका होऊ शकते. दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेण्याची कसरत थांबणार आहे.
कृत्रिम स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण अनेकदा शरीर स्वीकारत नाही. पण, बेल्लारे यांनी बहुलकाच्या तंतूंचे (पॉलिमर) पटल वापरून जैवकृत्रिम स्वादुपिंड विकसित केले आहे. या स्वादुपिंडाला शरीराने स्वीकारल्यास भारतीय संशोधकांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. बाळाच्या नाळेतून घेतलेल्या मानवी स्टेम पेशी आणि डुकराच्या स्वादुपिंडातून घेतलेल्या आयलेट पेशी वापरून हे स्वादुपिंड तयार करण्यात आले. उंदराच्या शरीरात त्याचे प्रत्यारोपण केल्यानंतर उंदराच्या इतर अवयवांना त्याचा काहीच त्रास झाला नाही. उलट या पेशींना स्वीकारून उंदराच्या शरीरात इन्सुलिन निर्मितीही सुरू झाली. मनुष्यासाठी हे जैवकृत्रिम स्वादुपिंड वापरात येण्याआधी आणखी पुष्कळ काम, चाचण्या, निरीक्षणे बेल्लारे आणि त्यांच्या चमूला करावी लागतील. तरीही हे संशोधन क्रांतीकारक ठरणार आहे हे आताच लिहून ठेवा. कदाचित यंदाचे जैव-वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलही बेल्लारे यांच्या नावावर जमा करणारे हे संशोधन आहे. भारतीय संशोधकांच्या अफाट बुद्धिमत्तेचा हा आणखी एक अचंबित करणारा आविष्कार म्हणावा लागेल.”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान