Details
अभिव्यक्ती आणि औचित्य!
01-Jul-2019
”
संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई
[email protected]
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्याविषयी टोकाचा द्वेष किंवा अतीव प्रेम व्यक्त करण्याचा प्रकार सुरू आहे. विशेषत: साहित्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी यात आघाडीवर आहेत. आपल्यातील कलागुणांमुळे समाजात आदराचे स्थान मिळवलेल्या या लोकांकडून अभिव्यक्तीचा अतिरेक होऊ लागला आहे. समाजात प्रत्येक अभिव्यक्तीसाठी वेगवेगळी व्यासपीठे आहेत. त्यावर व्यक्त होणे निश्चितच शिष्टसंमत असेल. परंतु, काही लोक कुठल्याही व्यासपीठावर कुठलीही मते व्यक्त करू लागली आहेत. अशा लोकांच्या अशिष्ट वागण्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनेला धक्का बसू लागला आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या कार्यक्रमातील ज्येष्ठ अभिनेते, अमोल पालेकर यांचे रोखण्यात आलेले भाषण खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे होते का, याचा यानिमित्ताने परामर्श घेणे आवश्यक वाटते.
राज्यघटनेने अनुच्छेद १९(१) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कायद्याने प्रत्येकाला आपल्या मनातील भावभावना, विचार जाहीरपणे व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला आहे. असे असले तरी ते शिष्टाचाराला सोडून नसावे, असे समाजाला अपेक्षित आहे, ही बाब येथे तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. समाजरचनेत कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशी अभिव्यक्तीची वेगळी व्यासपीठे निर्माण केली आहेत. त्या-त्या क्षेत्रातील मंडळींना येथे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे आणि ते असायलाच हवे. व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्याची गळचेपी केल्यास स्वातंत्र्य जखडून ठेवल्यासारखे होईल. तसा कोणी प्रयत्न केल्यास ते निश्चितच निषेधार्ह आहे. मात्र, अभिव्यक्तीचा गैरफायदा घेत कोणीही अविचार व्यक्त करत असेल अथवा त्यासाठी एखाद्या व्यासपीठाचा गैरवापर करत असेल तर ते शिष्टसंमत ठरणार नाही, याचाही सारासार विचार होणे तितकेच महत्त्वाचे ठरते. तथाकथित विचारवंतांकडून मागील काही वर्षांत याचा सातत्याने अनुभव येत आहे.
राष्ट्रीय कला अकादमीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग काहीसा याच प्रकारात मोडणारा दिसतो. आधुनिक कलेचे महामेरू प्रभाकर बर्वे यांच्या कलेचा गौरव करणारा हा कार्यक्रम होता. प्रभाकर बर्वे हे कलेच्या प्रांतातील महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपल्या कुंचल्यातून चित्रकलेला आधुनिकतेचा साज चढवला. सर्वदूर देशात त्यांच्या कलेचा गौरव झाला. चित्रकलेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या कलावंताची आजच्या पिढीला ओळख व्हावी, या उद्देशाने राष्ट्रीय कला अकादमीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे अमोल पालेकरांनी बर्वे यांच्याविषयी बोलायला हवे होते, अशी आयोजक अथवा उपस्थित श्रोत्यांची अपेक्षा असल्यास गैर काय? तरीही अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच थांबवणे किंवा त्यात अडथळा आणणे अथवा त्यांना बोलण्यापासून परावृत्त करणे हे समर्थनीय होते, असेही म्हणता येणार नाही. अमोल पालेकरांनी औचित्याचा भंग करून केलेल्या भाषणाविषयी किंवा व्यक्त केलेल्या मतांशी असहमती व्यक्त करण्याचा अथवा जाहीरपणे नाराजी नोंदवण्याचा आयोजकांना अधिकार होता. हा लोकशाहीचा मार्ग त्यांनी अवलंबणे अपेक्षित होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे आयोजकांची कृती निश्चितच अस्वीकृत होती. जशी आयोजकांची चूक होती तशी ती अमोल पालेकरांचीही होती, हेही येथे अधोरेखित होते.
अमोल पालेकर यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी त्यांना प्रतिबंध करणे कायद्याला धरून नसेल. त्यांनी एखादी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली असती तर संयुक्तिक ठरले असते. अथवा एखाद्या लेखाच्या माध्यमातून विचार व्यक्त केले असते तरीही ते त्यांच्या भूमिकेला धरून असते. सरकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध एखादा मंच उभा करून लोकांसमोर त्याविषयी आपली मते ठेवली असती तरी त्याला कोणाचाही आक्षेप नसता. परंतु, आपल्या मनातील संताप व्यक्त करण्यासाठी अमोल पालेकर यांनी व्यासपीठाचा गैरवापर केला. आयते व्यासपीठ, प्रेक्षक आणि माध्यमे उपलब्ध असल्याची संधी साधत त्यांनी आपले इप्सित साध्य केले, असा त्यातून अर्थ निघतो. त्यामुळे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली गेली, असा टाहो फोडणे कितपत योग्य वाटते? समाजरचना अलिखित शिष्टाचारावर बेतलेली आहे. एखाद्या धार्मिक सोहळ्यात धर्म प्रवचन अपेक्षित असते, तसे आनंदोत्सवात त्यानुरूपच बोलणे, वागणे शिष्टसंमत असते. एखाद्या दु:खद प्रसंगाला सामोरे जाताना सर्व बाबींचे भान ठेवावे लागते. या सर्व घटना-प्रसंगात त्या विपरीत म्हणजे औचित्याचा भंग करून कोणीही वागण्या-बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याला निश्चितच इतर घटकांकडून अटकाव होतो. असा अटकाव म्हणजे अभिव्यक्तीची गळचेपी म्हणायचे का?
अमोल पालेकरांसारख्या अनेक कलावंत, लेखक, साहित्यिक, क्रीडापटूंनी आपापल्या क्षेत्रात मिळवलेला लौकीक भारताच्या दृष्टीने गौरवास्पद आहे. आपल्यातील कलागुणांना मेहनतीची जोड देत त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान दुर्लक्षून चालणार नाही. अशा मंडळींचा आदर, मानसन्मान व्हायलाच हवा, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. विचारवंत अशी स्वत:ची ओळख प्रस्थापित करणाऱ्या या मंडळींच्या अभिव्यक्तीमधून वैचारिक प्रगल्भता दिसावी, अशी अपेक्षा ठेवण्यात मग गैर काय? परंतु मागील काही वर्षांत त्या विचारवंत मंडळींच्या अभिव्यक्तीतून द्वेषाची दुर्गंधीच जास्त येत आहे. लेखनातून संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडत आहे. कुठल्याही व्यक्ती वा व्यवस्थेला चांगले, वाईट कंगोरे असतात. त्याचे अवलोकन करण्याची क्षमता विचारवंताकडे असणे आवश्यक आहे. हे करत असताना त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र तटस्थ हवा.
चांगल्याला चांगले म्हणण्याचा मोठेपणा आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे धारिष्ट्य विचारवंतांच्या अंगी असणे अपेक्षित आहे. मात्र, समाजात वावरणाऱ्या आजकालच्या काही तथाकथित विचारवंतांनी याला हरताळ फासला आहे. एखाद्या व्यक्ती वा व्यवस्थेबाबत या विचारवंतांनी स्वत:ची ठाम मते बनवली आहेत. मग ती चांगली असोत वा वाईट. स्वत:ला त्या मतांच्या चाकोरीत त्यांनी बंदिस्त करून घेतले आहे. त्यामुळे अशा विचारवंतांची मते वा भाषणे किंवा लेखन पूर्वग्रहदूषित असेच वाटते. उदाहरण द्यायचं झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यवस्थेविषयी विचारवंतांमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येते. एक गट मोदींना पराकोटीचा विरोध करताना दिसत आहे. दुसरा गट मोदींचा अवास्तव उदो उदो करताना दिसत आहे. वास्तविक विचारवंत समाजासाठी दिशादर्शक म्हणून काम करत असतात. त्यामुळे चांगला आणि वाईट दोन्ही गुण न्यायतत्त्वाने मांडणे, हा त्यांचा धर्म आहे. परंतु, या विचारवंतांकडून उघडपणे धर्मद्रोह होताना दिसत आहे. राष्ट्रीय कला अकादमीतील अमोल पालेकर यांचे भाषण हा देखील त्याचाच भाग होता. प्रभाकर बर्वे यांच्याबद्दल एक शब्दही न बोलता थेट विचार स्वातंत्र्याच्या मुद्द्याला हात घालण्यामागे त्यांचा अप्रत्यक्षरीत्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला टीकेचे लक्ष्य करणे हाच पूर्वग्रहदूषित उद्देश होता, हे त्यातून स्पष्टपणे जाणवते.
मध्यंतरी दोन नामवंत विचारवंतांचे लेख वाचण्यात आले. त्यातील एक मोदीद्वेष्टे होते, तर हे दुसरे मोदीप्रेमी असल्याचे त्यांच्या लिखाणातून स्पष्टपणे जाणवत होते. वर्षभरातील त्यांच्या लेखनामध्ये एकही लेख मोदींच्या उल्लेखाशिवाय पूर्ण झाला नव्हता. लेखाचा विषय कुठलाही असो, पहिल्या विचारवंताच्या लेखनातून येनकेन मार्गे एक तरी मोदीद्वेषाचा परिच्छेद असायचाच. दुसऱ्या विचारवंताच्या लेखनातून मोदींच्या कौतुकाचा परिच्छेद हमखास वाचायला मिळायचा. त्यांच्या लेखनात कधीच तटस्थपणा दिसला नाही. असेच काहीसे राहुल गांधींच्या बाबतीतही काही विचारवंतांचे लेख वाचताना पाहयला मिळते. असे एककल्ली विचार लादणे, वाचकांवर अन्याय नाही का? एका ठराविक व्यक्ती वा विचारसरणीचा अत्यंत नियोजनपूर्वक सातत्याने आणि संधी मिळेल तिथे प्रसार व प्रचार किंवा द्वेष करणाऱ्याला विचारवंत कसे म्हणावे, असा प्रश्न उपस्थित झाल्यास त्यांच्या अभिव्यक्तीचा मुद्दा आपोआपच गौण ठरतो, हे येथे ध्यानात घ्यावे लागेल. अमोल पालेकरांनी त्यांच्या मनातील खदखद निश्चितच लोकांसमोर मांडावी, मात्र त्याचे औचित्य असावे. त्यावेळी त्यांची गळचेपी झाल्यास लोकशाहीवर विश्वास ठेवणारी जनता निश्चितच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.”
“संजय मलमे – संपादक, पुण्यनगरी, मुंबई