“.. आजही रस्तोरस्ती, वस्तोवस्ती, जागोजागी तसेच मुडदे पडताहेत. सावल्या हलताहेत. येताहेत ओळखीचे आवाज. सगळ्यांनाच बहुतेक मरणारे कोण आणि मारणारे कोण हे कळलंय मनोमन.. पण, त्यांना ओळखत मात्र कुणीच नाही.” अशीच काहीशी परिस्थिती प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सोडून देण्यात आलेली गाडी आणि नंतर झालेली मनसुख हिरण यांच्या हत्त्येबाबत वाटायला लागले आहे. गेले तीन दिवस विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरण यांच्या हत्त्येचा प्रश्न लावून धरल्याने सत्तारूढ महाविकास आघाडीची काहीशी कोंडी झाली होती, हे मान्यच केले पाहिजे. देवेंद्रजी आणि भाजपचा सर्व रोख सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध होता. साहजिकच आहे. एकतर वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतलेले भाजपला आवडले नव्हते, दुसरे वाझे यांनी भाजपसमर्थक ज्येष्ठ पत्रकाराला अटक केलेली होती. त्यातच दुर्दैव असे की, वाझे हत्त्या झालेल्या हिरणचे जवळचे मित्र आहेत. याबाबत न्यायालयात युक्तिवाद होईलच. त्यात आता जाणे योग्य नव्हे. परंतु मित्र वा नातेवाईक असणे हा गुन्हा नाही. गुन्हा सिद्ध होण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. तसेच कोणाच्या कॉल रेकॉर्डमध्येही एकमेकांचे कितीही फोन झालेले असले तरी न्यायालयात त्याला किती वजन प्राप्त होते हे यथावकाश कळेलच. परंतु पोलीस अधिकारी वर्तुळाचा कानोसा घेतला असता हे महाराष्ट्र पोलीस सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या हाडवैरातून निर्माण झालेले भांडण वाटते.
अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्याविरुद्ध त्यांच्या खात्यानेच तयार केलेले कागदपत्र पत्रकारांच्या हाती लागताच वाझे यांच्या विरोधातील कागदपत्रेही जादूची कांडी फिरावी तसे मिळतात, याभोवती नक्कीच संशयाचे जाळे आहे. येथे सचिन वाझे यांची बाजू घेण्याचा तसाच भारती यांनी मुद्दामहून विरोध करण्याचा प्रश्न नाही. त्याआधी मुकेश अंबानी यांच्या आलिशान घराजवळ सोडून देण्यात आलेल्या गाडीकडे वळू. ही गाडी विरोधी पक्ष सांगतो तसे मनसुख हिरण यांची नाहीच. या गाडीचा मूळ मालक दुसराच कोणीतरी आहे. मात्र ही गाडी मनसुख यांच्या ताब्यात होती हे मान्य. ही गाडी मुंबईच्या वाटेवर विक्रोळी येथे बंद पडली. ती गाडी पूर्व द्रुतगती मार्गावर सोडून मनसुख मुंबईला गेला आणि नंतरचे रामायण आता समस्त महाराष्ट्राला माहीतच झाले आहे. त्याची अखेर आज वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्यात झाली. हाही एक समझोता होता. कारण विधिमंडळाचे काम सुरळीत सुरू होऊन अर्थसंकल्प मंजूर व्हावा, हा समझोता झाल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सांगितले व मुख्यमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिला.
पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने पत्र लिहूनसुद्धा भारती यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही तसेच चौकशीही झाली नाही. मग कथित आरोपांसाठी वाझे यांची मान का कापायची? आम्हाला माहीत आहे की वाझे यांनी आपल्या कार्यशैलीने अनेक शत्रू निर्माण केलेले आहेत. त्यात हॉटेल्सवाले आहेत. गुंड टोळ्या आहेत. तसेच काही तगडे राजकारणीही आहेत. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बेसुमार मर्जी, हेही वाझे यांच्या विरोधातील एक प्रमुख कारण आहे. आता कोण कोणाच्या मार्जीत असावे ते पण राजकीय नेते ठरवणार का? “To Confucius harmony was consensus , not conformity It required loyal opposition” असं म्हणतात, तर मग विरोधी पक्षाने कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेच्या वेळी मनसुखच्या प्रश्नाबरोबरच या संबंधातील इतर प्रश्नही उपस्थित करणे गरजेचे होते. पोलिसांची संख्या, पोलीसठाण्याच्या इमारती, त्यांना मिळणाऱ्या, वारंवार बिघडणाऱ्या गाड्या, त्यांची बेकार दळणवळण साधने, त्यांच्याकडील गंजलेली शस्त्रे, पोलिसांची घरे आदी अनेक प्रश्न होते. हे सर्व अनुत्तरित राहिले.
याचा अर्थ आम्ही मनसुखचा मृत्यू गांभीर्याने घेत नाही असा नाही. त्याचाही छडा लागला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या जिलेटीनच्या काही कांड्यावरून सर्व महाभारत घडले आहे त्या नुसत्या कांड्यांवर स्फोट करण्याची क्षमता असते का? की स्फोटासाठी आवश्यक असणारी इतर सामुग्री आकाशातून पडणार होती. सरळसरळ हा खोटा प्लॅन असल्याचे उघड दिसत आहे. शिवाय त्या इमारतीच्या आजूबाजूला इतकी हायटेक सुरक्षा आहे की मुंगीलाही शिरकाव करणे अशक्य आहे. तरी नशीब.. आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने इमारतीच्या सुरक्षारक्षकांना काही प्रश्न विचारले. जर हीच विचारणा मुंबई पोलिसांनी केली असती तर भाजपने मुंबई शहरच डोक्यावर घेतले असते. अंबानी हे देशातील प्रमुख उद्योगपती आहेत म्हणून हा सर्व तपास जलदगतीने होणे गरजेचे आहे. परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे प्रश्न गेला की तो कायमच अनुत्तरित राहतो असा आजवरचा दुर्दैवी अनुभव आहे. एक बरे झाले सर्वच तपास यंत्रणांना आता शांतपणे तपास करता येईल. कारण, विधिमंडळाचे अधिवेशन संपलेले आहे. म्हणजे रोज काही तरी नवीन माहितीचा स्फोट तरी होणार नाही. जिलेटीनच्या कांड्या तसेच मनसुख यांच्या हत्त्येचा लवकरात लवकर तपास लागावा आणि दोषी गजाआड व्हावेत हीच आमची इच्छा! “Certain amount of opposition is great help to mankind kites rises against not with the wind” हे सर्वांनीच लक्षात ठेवलेले बरे!