Homeमाय व्हॉईसपरिचारिकांची देणी काय...

परिचारिकांची देणी काय त्यांच्या नातवंडांना देणार?

तसे तर जागतिक परिचारिका दिन प्रत्येक वर्षीच येतो. परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रदीर्घ काळात आल्याने त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. परिचारिका दिनानिमित्ताने सर्वांनीच परिचारिका आणि सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पाठीवर शाबासकीची थाप मारली. हे चांगलेच झाले. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन वर्तमानपत्रांची पाने सजवली. झाले ते चांगलेच झाले.

दिवस संपन्न झाला. परंतु सुफळ तेव्हाच होईल जेव्हा सरकारदरबारी त्यांची अडलेली कामे त्वरित होऊन त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना तातडीने मिळतील. केवळ हक्काचे पैसेच नाहीत,  पण गेल्या अनेक वर्षांत न केलेली परिचरिकांच्या भरतीबाबतही सरकारने मनावर घेतले पाहिजे. कोरोना काळात काही परिचारिका कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्याही अपुरी आहे. शिवाय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, या कंत्राटी परिचरिकांना वेतन वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी आहेत. इतकेच नव्हे तर ठरलेल्यापेक्षा त्यांच्या हातावर कमी रक्कम टेकवली जात आहे.

संतापजनक बाब म्हणजे सरकारने घोषित केलेल्या कोणत्याही वेतन आयोगाची वेतन श्रेणी परिचरिकांना प्रत्यक्ष मिळण्यास किमान दीड-दोन वर्षे वाट पाहवी लागते. त्याचवेळी त्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, लिपिक, प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी-कामगारांना जाहीर झालेली पगारवाढ दोन-तीन महिन्यांतच नियमित दिली जाते. लिपिकांची संख्या तितकीच असतानाही परिचरिकांना मात्र नेहमीच जाहीर झालेली वेतश्रेणी मिळण्यात विलंब वा अतिविलंब होत असतो.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही किमान दीड वर्षाने परिचरिकांना तो मिळाला. गंमत पुढेच आहे. या वेतनाची थकबाकी पदरात पाडून घेण्यासाठी परिचरिकांना अक्षरशः प्रशासकीय अधिकाऱ्यांपुढे गुढघे टेकावे लागतात, अशी संतापजनक परिस्थिती आहे. सेवानिवृत्त झालेल्या परिचरिकांचे हाल तर कुत्रा खात नाही. अनेकदा दूरवरून हेलपाटे घालूनही सरकारच्या जी. टी., कामा आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील सेवानिवृत्त परिचरिकांना थकबाकी चार वर्षे झाली तरी अद्यापि मिळालेली नाही.

तुमचे सेवापुस्तक मिळत नाही, सेवापुस्तकात त्रुटी आहेत, आता आमच्याकडे काम करायलाच कोणी नाही, मीच एकटा हे सांभाळत आहे, थोडी कळ सोसा.. अशी उत्तरे ज्येष्ठ परिचरिकांच्या तोंडावर फेकली जात आहेत. कुटुंबातील आजारी व्यक्ती वा गरजेसाठीही स्वतःच्या हक्काची रक्कम वापरता येत नसल्याने परिचारिका कमालीच्या हवालदिल झालेल्या आहेत. काहींनी तर ही थकबाकी मिळण्याआधीच इहलोक सोडलेला आहे. आता तर सरकारी नियमांच्या जंजाळात थकबाकी अडकल्याने ती सबंधित परिचारिकेच्या नातवाच्याच हाती पडेल, अशी भविष्यवाणी रुग्णालय परिसरात व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक वर्षांत परिचरिकांची रीतसर भर्ती न केल्याने अनेक पदे रिक्त आहेत. शिवाय सरकारकडे प्रतीक्षायादीही असून त्यात दरवर्षी भरच पडत आहे. परिचरिकांचे प्रशिक्षण करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्याही कमी कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने चांगल्या परिचारिका यापुढे दिवास्वप्नच ठरणार असे वाटू लागले आहे. खासगी संस्थेतून पास होणाऱ्या परिचारिका मोठ्या प्रमाणात आपल्या कामात यथायथाच असतात, कारण त्यांना प्रशिक्षणच त्या लायकीचे मिळत असते.

माझे मित्र आणि एकेकाळचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनीही एक पोस्ट लिहून परिचरिकांची संख्या किती कमी आहे त्याची आकडेवारीच दिलेली आहे. ती सरकारच्या सर्व संबंधित खात्यांनी नजरेखालून घालावी म्हणजे आपल्याला खरोखरच परिचरिकांचे कौतुक करण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न पडावा. मनातल्या मनात का होईना तो पडला तरी या पोस्टने बरेच साधले असे म्हणता येईल.

खरे तर परिचारिका दिनीच मी हे लिहिणार होतो. परंतु म्हटले आज त्यांचा पवित्र दिवस आहे. त्यात मिठाचा खडा नको, म्हणून मागे राहिलो. शासनकर्त्यांनी तरी मागे राहू नये ही अपेक्षा!

Continue reading

बिहारमध्ये विरोधकांचे ‘जंगलराज’ तर सत्ताधाऱ्यांचे काय ‘मंगलराज’?

"Criticism may not agreeable but its necessary. It fulfils the same function as pain in the human body. It calls attention to an unhealthy state of things" असंच काहीस राजकारणात सत्तारूढ पक्ष व विरोधी पक्ष यांचे नाते असावे, असं...

ठाणे.. ती गाडी आणि त्यावरचे स्टिकर.. गौडबंगाल तर नाही ना!

नेहमीप्रमाणे ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरात फेरफटका मारून ढोकाळी नाक्यानजिक असलेल्या घरी जायला बस घेतली. तुम्ही विचाराल की तुम्ही दररोज किंवा आलटूनपालटून कोर्टनाक्याला का जाता? उत्तर सोपं आहे. राजकीय नेत्यांच्या पंटर्सची या परिसरात उठबस असते. जिल्हाधिकारी कार्यालय आहे. समोरच जिल्हा...

आता कळेलच धडधाकट कोण आणि कुबड्यांची गरज कुणाला?

आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार आहे. राष्ट्रीय पक्ष मग तो भारतीय जनता पक्ष (भाजप) असो वा काँग्रेस, त्यांनी नेहमीच असे...
Skip to content