Monday, May 5, 2025
Homeमाय व्हॉईसकोकणात आवाज कुणाचा?

कोकणात आवाज कुणाचा?

बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महाशक्तीने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने अक्षरशः फोडली आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडला. आता या घटनेला तीन वर्षे लोटली तरी अजूनही फोडाफोडीचे उद्योग सुरूच आहेत. भारतीय जनता पक्षप्रणित तीन राजकीय पक्षांचे सरकार सत्तेवर आले. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तीन पक्ष. या पक्षांची महायुती झाली. आता तीन तिघाडा काम बिघाडा..नुसार या तिन्ही पक्षात अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. अर्थात ही स्पर्धा आहे ती वर्चस्वाची!

मुळात भाजप हाच खरा वर्चस्ववादी राजकीय पक्ष आहे. कारण आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडून भाजपने महाराष्ट्रात वर्चस्व स्थापन केले आहे. त्यासाठी पक्षफोडी आणि घरफोडीबरोबरच केंद्रातील सत्तेचा वापर करून, केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर करून अन्य पक्षातील प्रभावी नेते, कार्यकर्ते, भाजपने त्या पक्षात खेचून आणले. जिंकणारे, प्रस्थापित, अनुभवी आणि जिल्ह्या-जिल्ह्यात वर्चस्व असलेले नेते भाजपने आपल्याकडे घेतले. भाजपची सध्याची असलेली वाढ ही अशी आयात केलेल्या नेत्यांमुळे आहे, हे वास्तव आहे. यात स्वपक्षातील निष्ठावंत मागे सारले गेले. त्यांना सतरंज्या उचलण्याचे काम भाजपने दिले. संघाच्या शिस्तीमुळे दाबले गेलेले भाजपचे नेते गप्प राहिले. भाजपचा रंग आता पूर्णपणे बदलला गेला आहे. महाराष्ट्राचे आजचे राजकारण दोन गुजराती नेत्यांच्या हातात गेले आहे आणि मराठी माणूस ते उघड्या डोळ्यांनी शांतपणे पाहतोय.

कोकण

कोकण हा ठाकरेंचा गड मानला जातो. गेली 45 वर्षे याच कोकणी जनतेने बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केले. ठाकरे यांनीही कोकणी माणसांवर मनापासून प्रेम केले. कोकणच्या कार्यकर्त्यांना मानाची पदे दिली. सत्तेची उब दिली. आमदार, खासदार, नगरसेवक, महापौर केले. शिवसेना-कोकण एक समीकरण झाले. मात्र शिवसेना फुटल्यावर शिवसेनेच्या गडाला हादरे बसू लागले. आधी अर्धी शिवसेना घेऊन शिंदे भाजपच्या कळपात गेले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी बळावून त्यांनी स्वतःचा शिवसेना हा राजकीय पक्षच उभा केला. सर्व रसद भाजपने मुक्तहस्ते दिली. त्यामुळे शिंदे एका रात्रीत नेते झाले.  बंडखोर नेते म्हणून प्रसिद्धीस आले.

राजकारणात एकदा पडले की मागे फिरता येत नाही. शिंदे यांनी भाजपच्या मदतीने परतीचे दोर स्वतःच कापले. त्यांना वर्चस्व सिद्ध करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. ते बंडखोर स्वभावाचे आणि प्रचंड महत्त्वाकांक्षी असल्याने अन्य राजकीय पक्षात ते राहू शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून आणि मोदी-शाहांची मदत घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळविले. भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले. भाजपचे स्वतःचे 105 आमदार असताना 40 आमदार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केले. आणि त्यांच्यावर कटाक्ष ठेवण्याची देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले. शिवसेना फुटली, तरच महाराष्ट्रात भाजप वाढेल, याच हेतूने शिवसेना फोडली गेली.

कोकण

भाजप वाढला. ज्या शिवसेनेमुळे भाजप वाढला. ती शिवसेना भाजपने कमजोर केली. शिंदेची दुसरी शिवसेना जन्मास घातली. महायुतीत भाजपचे नेते नारायण राणे खासदार आहेत. त्यांचा एक मुलगा भाजपचा मंत्री आहे तर दुसरा मुलगा निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेचा आमदार आहे. शिंदे यांचेच मंत्री उदय सामंत शिंदेचे विश्वासू सहकारी आहेत. ते रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. शिंदेंच्याच सेनेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम हेही कोकणचे नेते म्हणवितात. त्यांचा मुलगा योगेश कदम सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे कोकणची सूत्रे आता कोणाच्या हातात हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

नारायण राणे यांचे संपर्क कार्यालय आता रत्नागिरीत सुरू आहे. उदय सामंत हेही कोकणचे विकासपुरुष म्हणवून घेतात. त्यांचे थोरले बंधू किरण सामंत शिंदेंच्याच शिवसेनेचे राजापूरचे आमदार आहेत. त्यांनी ठाकरेंच्या राजन साळवी यांचा पराभव केला. साळवी नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिंदे ठाकरेंची सेना संपवायला निघालेले आहेत. याआधी ठाकरेंचे सहा आमदार, एक खासदार कोकणातून होते. आता एकमेव आमदार भास्कर जाधव हेच आहेत. खासदार विनायक राऊतांचा पराभव नारायण राणेंनी केला. कोकणात ठाकरेंकडे आता भास्कर जाधव यांच्या रूपाने तगडा, आक्रमक, अभ्यासू असा एकच नेता आहे.

कोकण

राणे कंपनीच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ठाकरेंचे वैभव नाईक यांचा पराभव निलेश राणे यांनी केला. त्यासाठी त्यांनी शिंदेंची शिवसेना पत्करली. आज राणेंच्या घरात भाजप आणि शिवसेना असे दोन राजकीय पक्ष आहेत. वैभव नाईक यांनाही शिंदेंची ऑफर होती म्हणतात. पण नाईक उद्धव ठाकरेंसोबत राहिले, असे पुन्हा पुन्हा सांगतात. भविष्याचे माहित नाही, पण आज तरी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. असो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जशा जवळ येतील, तसे कोकणातील वातावरण तापत जाईल हे नक्की!

Continue reading

बाळासाहेब असेपर्यंत महाराष्ट्रात मनमानी करता येत नव्हती भाजपला!

महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला जाणार याची चिंता बदमाश राजकारण्यांना नसली तरी ती सामान्य मराठी माणसांना नक्कीच आहे. गेल्या दहा वर्षांत तर महाराष्ट्रातील राजकारणाने टोक गाठलेले आहे. यात समाजकारण होरपळून जात आहे. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र गावगुंडांच्या ताब्यात जाताना पाहवे...
Skip to content