गुन्हेगार ठरण्याआधीच नराधम ठरवणारे तुम्ही कोण? गेल्या तीन दिवसांपासून पुण्याच्या स्वारगेट बसडेपोत उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसमध्ये झालेल्या कथित बलात्काराचे प्रकरण मराठी वृत्तवाहिन्यांवर दिवसरात्र गाजतंय. या कथित बलात्कारप्रकरणी आता संशयित आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक झाली आहे. 26 वर्षांच्या एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ही बलात्काराची घटना उजेडात आल्यापासून टीव्हीवरच्या बहुतांशी मराठी वृत्तवाहिन्यांवरून आरोपीचा उल्लेख नराधम असा केला जात आहे. आपल्याकडे स्वातंत्र्य आहे. बोलायलाही आणि व्यक्त व्हायलाही.. म्हणूनच कोणीही अगदी मोकळेपणाने कुठेही, कशीही आंदोलने करतात. काहीही, केव्हाही , कधीही कोणालाही बोलतात. त्यात पत्रकार म्हटले तर जगातले सर्व तज्ज्ञ त्यांच्या घरी पाणी भरतात, अशी स्थिती आहे. खासकरून, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्यांची. टीआरपी वाढवून कंपनीसाठी किंवा वैयक्तिक पातळीवर सेंकदाप्रमाणे पैसे मोजणारे हे लोक रोज कोणाची ना कोणाची मीडिया ट्रायल करत आहेत.
घटनेला एक दिवस झाला नाही तर आरोपी अजून मोकाट.. राज्यात कायदा -सुव्यवस्था ढासळली… घटनेचा दुसरा दिवस होता. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर काही मते व्यक्त केली. काय म्हणाले ते? ते म्हणाले की, जेव्हा घटना घडली त्यावेळी त्या बसच्या अवतीभवती दहा ते पंधरा जण उपस्थित होते. बलात्काराच्या वेळी जर काही स्ट्रगल झाला असता किंवा सुटकेसाठी काही प्रयत्न झाला असता तर पीडितेचा आवाज या लोकांपर्यंत पोहोचला असता. पोलिसांनी त्यांची जी ठरलेली वेळ आहे त्यावेळी प्रत्यक्ष गस्त घातलेली आहे. तसे सर्व सीसीटीव्हीच्या फूटेजमध्येही दिसते. त्यामुळे पोलीस यासाठी जबाबदार आहेत, असे मानण्याचे कारण नाही.
पण मीडिया हल्ली बातम्या देण्यापेक्षा ट्रायल करण्यामध्येच जास्त स्वारस्य दाखवतो. कोर्टात काय होईल ते होईल पण मीडियाच्या कोर्टामध्ये निकाल झालेला असतो आणि सजाही सुनावली जाते. कदम यांनी पोलिसांची बाजू मांडली, वस्तुस्थिती सांगितली तर त्यांचे चुकले कुठे? त्यांना संवेदनहीन ठरवून त्यांच्यावर टीका करण्यात आली. शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते संजय राऊत तर अग्रणी होते. त्यापाठोपाठ काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जे स्वतः गृहमंत्री असताना तुरुंगात गेलेले अनिल देशमुख हेही टीका करताना मागे राहिले नाहीत. महिलांचा विषय.. त्यातही बलात्कारासारखा गंभीर प्रसंग. त्यामुळे जनमताचा जो रेटा असतो तो रेटा लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनीही कदम यांना समज दिली. अशी असंवेदनशील वक्तव्यं कोणीही करू नये, असे ते म्हणाले.

खरेतर असंवेदनशील वक्तव्य केले ते मुख्यमंत्र्यांचेच जवळचे सहकारी संजय सावकारे यांनी. त्यांनी अशा घटना होत असतात.. असे म्हणून माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. तथा आबा पाटील यांचा कित्ता गिरवला. असो. गुरूवारी मध्यरात्रीनंतर उशिरा पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात गुनट गावी आरोपी गाडेला पोलिसांनी पकडले. यासंदर्भात माहिती देताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपी गाडे याने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मानेवर दोरखंडाचे वळ आढळून आले आहेत. दोरखंड तुटल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाडेने या दोन दिवसांत तीन वेळा आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. जर त्याचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर त्याच्या मृत्यूला त्याला नराधम म्हणणारे कोण जबाबदार राहणार होते? पोलिसांना दिलेल्या जबानीत आरोपी गाडे म्हणाला की, माझ्याकडून चूक झाली. मी तिच्याबरोबर संबंध करायला नको होता. परंतु जे काही घडले ते सहमतीनेच झाले. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारे जोरजबरदस्ती केलेली नाही. आता आरोपीच्या या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार? पोलीस जो सीसीटीव्हीचा अहवाल देऊन सांगत असतील की, घटना घडली तेव्हा त्याच्या आसपास दहा ते पंधरा जण वावरत होते, तर त्यावर विश्वास नाही का? जर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं वावरत असतील आणि एखादी व्यक्ती एखाद्या महिलेवर अत्याचार करत असेल तर ती आरडाओरड करणे स्वाभाविक आहे. परंतु तशा प्रकारची काहीही आरडाओरड झालेली नाही, हे कदम यांनी सांगितले तर चुकले कुठे?
राहता राहिला प्रश्न सहमतीचा.. तर रात्री-अपरात्री काळोखी जागेचा आडोसा घेऊन, अडगळीचे ठिकाण हेरून, झाडेझुडपे पाहून, निर्मनुष्य रस्ता हुडकून तेथे वेश्याव्यवसाय करणाऱ्या अनेक महिला मी स्वतः पाहिल्या आहेत. आजही पाहतो. मुंबईत, पुण्यात, नागपूरात आणि राज्यात सर्वत्र… रात्रीची दुनिया ज्यांना माहित आहे त्या स्या सर्वांना विचारा. यात तृतीयपंथीयांचाही मोठा सहभाग असतो. बलात्कारांच्या अनेक घटनांमध्ये, खास करून वेश्याव्यवसाय करणाऱ्या किंवा प्रेमसंबंधातून शरीर संबंध ठेवणाऱ्या मुली स्वेच्छेने शरीरसंबंध ठेवतात. जेव्हा अंगलट येते किंवा याचा उपयोग करून जेव्हा ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार घडू लागतात तेव्हा मग त्याला बलात्काराचे स्वरूप दिले जातं. आणि पुढेस्त्रीदाक्षिण्य सांभाळणारं सरकार असतंच. बलात्काराचे गुन्हे दाखल करायला पोलिसांना भाग पडावे लागते. आपल्याकडे अशा काही केसेस आहेत की ज्यामध्ये एखादी महिला दहा वर्षे एखाद्या पुरूषाकडून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करते आणि पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागतो. आता मला सांगा दहा वर्षे बलात्कार होत असताना या उच्चशिक्षित महिलेच्या संवेदना मेल्या होत्या का? प्रश्न बलात्काराचा नाही तर बलात्काराच्या गुन्ह्याचा आहे. या माध्यमातून आरोपीची ज्या पद्धतीने बदनामी होते त्याला जबाबदार कोण?
माझ्या माहितीत एक प्रकरण आहे. किंबहुना मी त्याचे वार्तांकनही केले आहे. ते वाचा तर तुम्ही चाटच पडाल. १९९०च्या दशकात मुंबई पोलीस दलाच्या क्राइम ब्रँचमध्ये व्हिजलन्स ब्रँच नावाची एक शाखा होती. मुंबईत ठिकठिकाणी चालणाऱ्या वेश्याव्यवसायांवर, अवेध डान्सबारवर छापे मारण्याचे सर्व अधिकार या शाखेकडे होते. त्यामुळे या विभागात काम करणाऱ्या पोलिसांची कमाई दांडगी होती. तेव्हाच्या कित्येक क्राईम रिपोर्टरना त्या शाखेतून महिन्याचा निम्मा पगार हफ्ता म्हणून पाकिटातून मिळायचा. या शाखेत पोस्टिंग व्हावी म्हणून फार मोठी बोली लागायची. अशाच एका प्रयत्नात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, तोही क्राइम ब्रांचमधलाच अयशस्वी ठरला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी त्याने व्हिजलन्स ब्रांचमधल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला. तोही बलात्काराच्या प्रकरणात.

झाले असे की व्हिजलन्स शाखेच्या अधिकाऱ्यांनी खारमधल्या एका हॉटेलमध्ये छापा टाकून तेथे वेश्याव्यवसाय करत असलेल्या सहा महिलांना अटक केली. या आरोपी महिलांना पोलिसांनी पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या कार्यालयात आणले. त्यावेळी पोलीस पथकात महिला पोलीसही होत्या. यात कोणत्या महिला आहेत हे क्राइम ब्रांचच्या या अधिकाऱ्याने हेरले. त्यांनी थेट त्या व्येश्येला पुरविणाऱ्या दलालाला फोन केला. पोलिसी भाषेत त्याला भडवा म्हणतात. दुसऱ्या दिवशी त्याला कार्यालयात बोलावून घेतले. त्याच्या माध्यमातून पकडण्यात आलेल्या, त्याने पुरवलेल्या एका वेश्येकरवी व्हिजलन्स विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करवून घेतला. याकरीता या दलालाला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकीही देण्यात आली. ज्या पोलीस अधिकाऱ्याविरूद्ध या वेश्येने बलात्काराचा गुन्हा नोंदविला तो अधिकारी पायाने अधू होता. रिटायरमेंटला आला होता. आणि ज्या जागी हा बलात्कार झाल्याचा आरोप होता ती जागा त्यांचे कार्यालय होती, ज्यात जेमतेम त्यांची खुर्ची आणि टेबल राहू शकत होते. पण गुन्हा दाखल जाला. आपापसातल्या शत्रुत्वामुळे त्यांच्या नशिबी हे भोग आले.
वेश्याव्यवसाय करणारी तक्रारदार महिला नंतर फिरू नये म्हणून क्राईम ब्रँचच्या या अधिकाऱ्याने या महिलेला आपल्या ताब्यात घेतले. दिवसभर ती महिला पोलीस आयुक्तालयाच्या कंपाउंडमध्ये असलेल्या क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये बसून असायची. काळोख पडला की महिलांना पोलीस स्टेशनमध्ये किंवा कार्यालयात बसवून ठेवता येत नाही म्हणून तिला पाठवून द्यायचे. वांद्र्यात एका रिकाम्या ब्युटी पार्लरमध्ये तिची रात्री राहण्याची व्यवस्था केली गेली होती. बाहेर पहाऱ्याला साध्या वेषातला पोलीस असायचा. असा सारा खटाटोप झाला. पुढे आरोपित अधिकारीही खमका निघाला आणि न्यायालयामध्ये त्याने आपले निर्दोषत्व शाबित केले. त्याच्यावर लागलेला बलात्काराचा डाग न्यायालयीन प्रक्रियेनंतर धुतला गेला. मी स्वतः या तक्रारदार महिलेला पोलिसांनी जिथे लपवून ठेवले तिथे पाळत ठेवून रात्री पावणेदोन वाजता (१९९०च्या दशकात) सांज लोकसत्ता, या लोकसत्तेच्या त्या काळातल्या भावंडात बातमी दिली होती. सुदैवाने त्या काळात सध्या ज्या पद्धतीने मीडिया ट्रायल करणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. नाहीतर पीडित पोलीस अधिकारी कधीच नराधम ठरला असता आणि बलात्काराचे कुभांड रचणारा तो अधिकारी यांच्यासाठी टीआरपी वाढवणारा हिरो ठरला असता..