महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जरी आपले पिताश्री गोपीनाथजींचा वारसा सांगत राजकारण करत असल्यातरी त्यांना गोपीनाथजींची सर नाही हे मी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते. आज तेच मला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना सांगायचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेच होते. त्यांची सर नाही उद्धवजींना आहे आणि आदित्यजी म्हणजे दूर दूर की बात… है दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंनी त्यांचा बहुतर्चित दिल्ली दौरा केला. एका दिवसाच्या या दौऱ्यात त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी तसेच आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रात आकारात आली ते शरद पवार यावेळी दिल्लीतच होते. परंतु आदित्य ठाकरे यांनी त्यांना भेटण्याची हिंमतच दाखवली नाही.
कारणही तसेच होते. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने उधळली. ठाण्याचा विकास एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनीच झाला, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांची ही कृती यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला दिलेल्या सुसंस्कृतपणाच्या शिकवणीला साजेशीच होती. आपला वैरी जरी समोर असला तरी त्याची आस्थेने चौकशी करायला पाहिजे. मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, हे जे यशवंतराव चव्हाण बोलत होते ते शरद पवार यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे मतभेद जगजाहीर होते. जाहीर भाषणांमध्ये बाळासाहेब शरद पवार यांचा उल्लेख मैद्याचे पोतं.. असा करायचे. परंतु या दोन्ही नेत्यांमध्ये असलेली मैत्री त्यामुळे कधी खंडित झाली नव्हती. एकमेकांच्या घरी आपल्या परिवाराला घेऊन दोन्ही नेते अनेकदा भेटले. पण बाळासाहेबांची पुढची पिढी मात्र अशी निखळ मैत्री मानायला तयार नाही. मग व्हॅलेंटाईन डेसारखा मैत्रीचा दिवस असला तरीही त्यांचे बोल बिघडलेलेच असतात.

संजय राऊत यांनी यानिमित्ताने शरद पवार यांच्यावर फार वाईट शब्दांत आणि अत्यंत आक्रमकपणे टीका केली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या टिकेची पाठराखण करताना ते पक्षाच्या वतीनेच बोलले, असे स्पष्ट केले. दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्याबरोबरच होते बाबांनी संजय राऊत यांच्या विधानाची मल्लिनाथी केली असताना आदित्यजींची अशी हिंमत होऊ शकत नाही की ते संजय राऊत यांच्याविरोधात बोलू शकेल. पण राजकारणात एक वेगळा स्तर असतो. राऊत यांनी केलेल्या टिकेनंतर आदित्यजी पवारांना भेटून यावर पडदा टाकतील, अशी अपेक्षा होती. तसा प्रयत्नही त्यांनी केला असू शकतो. पण, आदित्यजींच्या आजोबांच्या वयाचे शरद पवार त्यांना भेट देतील तर ना.. पवारांना ओळखणारे प्रत्येकजण हे जाणतात. एखाद्या पत्रकाराने पत्रकार परिषदेत पवारांना अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला की ते, तू नवीन आहेस का? कोणत्या पेपरचा आहे? असे विचारत. त्याचे नाव लक्षात ठेवत आणि नंतर त्या पेपरच्या संपादकांना फोन करून अशा नवख्या पत्रकाराला माझ्या प्रेस कॉन्फरन्सला पाठवण्याची तुमची हिम्मत कशी होते असा सवाल करायचे. त्यामुळे ते काही बधणार नाहीत, हे आदित्य ठाकरेंनाही माहित होते. त्यामुळे त्यांनी पवारांना दिल्लीत भेटण्याचा नादच सोडून दिला. या दौऱ्यात त्यांनी समदुःखी असलेले राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना भेटून मुंबई गाठली.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात शिवसेनेचा उबाठा गटाला मोठी गळती लागली आहे. ही गळती नळ फुटल्यासारखी नाही तर एखादी मोठी जलवाहिनी फुटल्यासारखी आहे. त्यांच्या पक्षाचे अनेक मातब्बर नेते सध्या शिवसेनेच्या वळचणीला जात आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या हातामध्ये भगवा आणि धनुष्यबाण देत स्वागत करत आहेत. याच उबाठाचे एकेकाळचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसांपूर्वीच शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाचा धक्का पचत नाही तोच उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्यांना घरचा आहेर दिला. राजन साळवी यांनी आपल्या पराभवाला माजी खासदार आणि उबाठाचे नेते विनायक राऊत जबाबदार असल्याचे आवर्जून सांगितले. भास्कर जाधव यांनी त्याचीच री ओढली. एकनाथ शिंदेंबरोबर जे गेले त्यांना तसेच एकनाथ शिंदे यांना आपण जर गद्दार म्हणत असू तर पक्षात राहून पक्षविरोधी कामे करणाऱ्या नेत्यांना आपण काय म्हणणार, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या बोलण्याचा रोख विनायक राऊतांकडेच होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब सांगायचे की निखाऱ्यावर जर राख जमली तर त्या निखाऱ्याची धग लागत नाही. फुंकर मारूनच ही राख दूर करावी लागते. मग ही फुंकर मारणार कोण असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
भास्कर जाधव हे तेच नेते आहेत की जे आधी शिवसेनेत होते आणि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल दाद मागण्यासाठी मातोश्रीवर गेले असता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होऊन तेव्हाच्या एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यापुढे कैफियत मांडायला गेलेले भास्कर जाधव मातोश्रीवर त्यांची भेट मागत होते. पण त्यांना उत्तर देण्यात आले की, साहेब आज कोणालाही भेटणार नाही. कारण, साहेब दुःखात आहेत. त्यांनी मलेशियाहून आणलेला एक लाख रुपयाचा मासा मेल्यामुळे साहेब दुःखात आहेत. जाधव यांनी हे उत्तर ऐकले. मातोश्रीच्याच पायऱ्यांवर अश्रू गाळले आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय गाठले. पुढे ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही झाले. राष्ट्रवादीतही पुन्हा त्यांची घुसमट झाली आणि ते स्वगृही परतले. परंतु मातोश्रीच्या व्यवहारात काहीही फरक पडला नाही, हे जाधवांच्या आताच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

आपल्या दिल्ली भेटीत आदित्य ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांची एक बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांकडून किंवा कोणा पदाधिकाऱ्याकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण आल्यास तेथे शक्यतो जाऊ नये. त्यातूही जायचे असेल तर जाण्यापूर्वी मातोश्रीची परवानगी घ्यावी, असे फर्मान त्यांनी सोडले. उद्धव ठाकरे जरी बाळासाहेब नसले तरी वयोमानाचा आणि अनुभवाचा विचार करता पक्षाचे आमदार-खासदार एकवेळ त्यांचे ऐकतीलही. पण, आदित्य ठाकरे.. तेही आता वडिलांच्या वयाच्या खासदरांना आदेश देऊ लागले आहेत. नंतर खासदार संजय जाधव यांनी अप्रत्यक्षपणे या आदेशाची खिल्ली उडवली. तुम्ही एबीपीचे पत्रकार असाल, तुम्ही लोकमतचे असाल. तुम्ही जर एकमेकांनी एकमेकांना बोलावले तर काय ऑफिसला फोन करून विचारणार का, मी जाऊ की नको असा प्रश्न त्यांनी केला. आदित्य ठाकरेंना जो मेसेज मिळायचा होता तो मिळाला.
थोडक्यात सांगायचे झाल्यास उद्धव ठाकरे जरी बाळासाहेबांचा वारसा सांगत असले तरी आज अशा पद्धतीच्या ऑर्डरी सोडण्याची ताकद त्यांच्यात उरलेली नाही. आणि आदित्य ठाकरे जर असे धाडस करत असतील तर त्यांच्या पक्षाचा लय होण्यास वेळ लागणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या यादीत सर्वात जास्त जागा शिवसेनेच्या उबाठालाच मिळाल्या आहेत. परंतु या जागा विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेल्या संख्येपेक्षा कमी आहेत. असे असले तरी सत्ताधाऱ्यांच्या मनात आले तर ते सर्वात मोठ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपद देऊ शकतात. विरोधी पक्षनेतेपद हे कॅबिनेट मंत्राच्या दर्जाचे असते. उबाठाने यापूर्वीच आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्त केले आहे. औपचारिकपणे ही निवड आहे. त्यामुळे जर विरोधी पक्षातल्या सर्वात मोठ्या पक्षाच्या नेत्याला विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद द्यायचे असा निर्णय जर सत्ताधारी पक्षाने, पर्यायाने विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतला तर हे पद आदित्य ठाकरे यांना जाईल. काँग्रेसची संख्या नंबर दोनवर आहे. त्यांनीही विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विधान परिषदेत काँग्रेस नंबर एकवर असतानासुद्धा आम्ही उबाठाचे नेते अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद मान्य केले आहे. ऑगस्टपर्यंत दानवे यांचे सदस्यत्व असेल. त्यामुळे तोपर्यंत तेथे उबाठाचाच विरोधी पक्षनेता असणार आहे. जर उबाठाने विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला तर आम्हीही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे गेल्या काही वर्षांपासून पुत्रप्रेमाने आंधळे झाले आहेत. आपला मुलगा विधानसभेत विरोधी पक्षनेता होत असेल तर ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद सोडायला तयार असतील आणि जर त्यांनी फक्त मुलाच्याच हिताचा निर्णय घेतला तर मग शिवसेनेच्या उबाठा गटाला फक्त भगवान बचाये..
आपले वय काय, पात्रता (खरे तर लायकी) काय, आपण बोलतो काय, आपण ज्यांच्या विषयी बोलतो त्यांची ज्येष्ठता किती याचा पाचपोच येत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरेंनी मुलाला कितीही प्रमोट केले तरी काही उपयोग होणार नाही. किंबहुना आजच्या उबाठाच्या अवस्थेला संजय राऊत यांच्या पेक्षा ही बाप बेटेच जबाबदार आहेत.
अगदी बरोबर! कधी शहाणपण येणार? बहुदा pक्ष संपल्यावरच वाटतयं