ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटात आठवड्यातील सुमारे पाच दिवस वाहतूककोंडी-वाहतूककोंडी हा जीवघेणा खेळ सुरूच असतो. ना ठाणे महापालिकेला फिकीर, ना राज्य सरकारला… या दोघांमध्ये पीसला जातो तो नोकरदार, विद्यार्थीवर्ग, महिला, लहान मुले व लाखो कामगार… ज्यांचे हातावर पोट आहे अशी माणसे तर वाहतूककोंडीचा अंदाज घेऊन घराबाहेर न पडणेच पसंत करतात. अशा या वाहतूककोंडी हा ‘नीचे’चा ग्रह असलेल्या गायमुख घाटात परवा रात्रीपासून सुमारे पाच ब्रेकडाऊन पाहिले. हे कमी होते म्हणूनच की काय छायाचित्रात दिसणारा ‘बशा’ टँकरने संपूर्ण दिवसाचीच बरबादी कारून टाकली. या टँकरमध्ये २० टन कच्चे तेल होते. दुर्दैव इथेच संपलेले नव्हते. या टँकरचे सहाही पाईप्स जॅम झाले होते. त्यामुळे हा टँकर रिकामा करून बाजूला करण्याच्या प्रयत्नांवर पाणी पडले! पोलिसांच्या वाहतूक खात्याचे अधिकारी व हवालदारांचा या महाप्रचंड कोंडीने अक्षरशः घामटा काढला! काही अधिकारी तर घरच्या वेशात घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन करत होते. रात्री उशिरा हा बशा टँकर क्रेनच्या सहाय्याने काहीसा बाजूला करून एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले.

गेल्या काही महिन्यांपासून गायमुख घाटातील वाहतूककोंडीची ठाणेकराना नको इतकी सवय झालेली आहे. (न होऊन कसे चालेल? पापी पेट का सवाल जो है..) या टँकरसारखीच अनेक भंगार अवजड वाहने या रस्त्यावरून जात असतात. ना त्यांची देखभाल केलेली असते, ना त्यांचा ड्रायव्हर धड बोलूही शकत असतो. सर्व रामभरोसे असतं ना सरकारची भीती, ना कायद्याची भीती.. फक्त वाटेल तशी गाडी हाकता येते इतकेच काय ते पाहिले जाते. खरंतर अशा भंगार वाहनांना शहरात प्रवेशच देऊ नये. शहराच्या आरोग्याची नासाडी करणारी वाहने इथे नकोतच! ठाण्याची ‘आपली’ माणसे म्हणवणारी राजकीय मंडळी काही ‘बाणा’ दाखवणार आहेत की नाही? की आपापसातच ‘हमरीतुमरी’वर संतुष्ट होणार आहेत.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर


Pisala jato nahi bharadala jato