सत्ताधाऱ्यांवर टीका करताना शाब्दिक चिमटे काढणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जोरदार टीका केली. ती करताना त्यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे…, या कवितेचा आधार घेतला आणि विरोधकांसह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. जयंतराव, तुम्ही अजितदादांचे ऐकत नाही आणि माझेही ऐकत नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे, अशी टिप्पणी फडणवीस यांनी करताच सभागृहात पुन्हा हंशा उसळला.
दावोस शिखर परिषदेतील गुंतवणुकीची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, जयंतराव तुमचा प्रॉब्लेमच हा आहे की, चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता, असे फडणवीस म्हणताच सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून दाद दिली. योग्य गोष्टी, योग्य लोकांसोबत आणि योग्य वेळी सांगितल्या तर कार्यान्वित होतात, असे फडणवीस यांनी म्हणताच सदस्यांनी त्यांना दाद दिली.
गुंतवणुकीच्या करारांबद्दल किमान जयंतरावांनी तरी शंका व्यक्त करायला नको, अशी अपेक्षा करून फडणवीस म्हणाले की, रोहित पवारांनी शंका घेतली तर मी समजू शकतो. कारण ते तुलनेने तरुण आहेत. ते अनभिज्ञ आहेत म्हणत नाही मी.. पण ते तरुण आहेत. त्यांनी किंवा वरुणने (सरदेसाई) शंका घेतली तर मी समजू शकतो, असेही फडणवीस म्हणाले. जयंत पाटलांना उद्देशून फडणवीस म्हणाले की, आपले गझलकार कविवर्य सुरेश भट काय म्हणतात बघा. साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, आताच शंकेखोर जे त्यांचे कधी होईल बरे? फडणवीस यांनी भट यांच्या या ओळी उद्धृत करताच सभागृहात पुन्हा हंशा उसळला.

ना माध्यमांकडे क्वालिटी बातम्या.. ना विरोधकांकडे टीकेचे मुद्दे!
मी, एकनाथ शिन्दे आणि अजित पवार यांच्यात उत्तम समन्वय असून राज्य सरकार सर्व निर्णय समन्वयातून घेत आहे, असे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले. तिघांपैकी कोणीही नाराज नाही आणि स्थगिती दिलेल्या प्रकल्पांपैकी बहुतांश निर्णयांमध्येही आमच्या तिघांचाही सहभाग होता, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
माध्यमांवर खापर फोडताना ते म्हणाले की, हल्ली शिन्देंनी केलेले प्रकल्प फडणविसांकडून रद्द, ही बातमी माध्यमांसाठी आवडती बातमी झाली आहे. पण, नोकरशाहीत खालच्या पातळीवर विभागीय आयुक्तांकडून एखादा प्रकल्प रद्द केला गेला तरी फडणविसांचा शिन्देंना दणका, अशी बातमी दिली जाते. त्याचे कारण माध्यमांकडे क्वालिटी बातम्या नाहीत आणि विरोधकांनाही सरकारवर टीका करता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अशा बातम्या दिल्या जातात, असा दावाही फडणवीस यांनी केला.
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ, अशी म्हण मराठीत आहे. पण तिघांचे भांडण माध्यमांचा लाभ, अशी नवी म्हण गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात रूढ होऊ घातली होती. पण फडणवीस यांनी शिन्दे आणि आपल्यात कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचा दावा केला. कोणत्याही बैठकीला तिघांपैकी एखादा नसला की तो नाराज, अशा बातम्या दिल्या जातात, असे फडणवीस यांनी सांगताच कॉँग्रेसचे नाना पटोले बसल्या जागेवरूनच तुम्ही अजित पवारांचे नाव घेत नाही, असे म्हणाले. त्यावर फडणवीस उत्तरले, अजितदादा आक्रमक आहेत आणि ते थेट अंगावरच जातात, असे उत्तर दिले. त्यावर सभागृहात हंशा उसळला. आणि अजित पवार यांनीही नाना पटोले यांच्याकडे रोखून बघत आपल्या भावना व्यक्त केल्या.