मलेशियात झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या दुसऱ्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या भारताने यंदादेखील जबरदस्त खेळ करुन जेतेपदाला गवसणी घातली आणि आम्हीच या स्पर्धेचे खरे “चॅम्पियन्स” असल्याचे दाखवून दिले. २०२३मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत शेफाली वर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारताने इंग्लंडला नमवून ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला होता. आता त्याच विजयाची पुनरावृत्ती निकी प्रसाद कर्णधार असलेल्या भारतीय संघाने केली. यंदाच्या स्पर्धेतील भारताने पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत केलेली अफलातून कामगिरी पाहता भारतच या स्पर्धेचा खराखुरा दावेदार होता, असे म्हटले तर वावगे ठरु नये. सर्वच्या सर्व सातही सामने जिंकणारा आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहणारा भारत हा एकमेव संघ होता.

अ गटात समावेश असलेल्या भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून दणदणीत पराभव करुन आपल्या विजयी अभियानाला प्रारंभ केला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत यजमान मलेशियाचा १० गडी राखून सहज पराभव केला. गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर भारताने ६० धावांनी विजय मिळवून आपल्या विजयी अभियानाला प्रारंभ केला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत यजमान मलेशियाचा १० गडी राखून सहज पराभव केला. गटातील आपल्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेवर भारताने ६० धावांनी विजय मिळवून स्पर्धेचा सुपर सिक्समधील प्रवेश पक्का केला. सुपर सिक्समध्ये पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ८ गडी राखून लीलया नमवले. दुसऱ्या लढतीत स्कॉटलंडचा १५० धावांनी दणदणीत पराभव करुन भारताने उपांत्य फेरीतील आपल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात भारताची सलामीवीर त्रिशाने स्कॉटलंड गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत जबरदस्त शतकी खेळी केली. या स्पर्धेत शतक काढणारी त्रिशा पहिली फलंदाज ठरली. त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत भारताने गतउपविजेत्या इंग्लंडचा पराभव करुन अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. निर्णायक जेतेपदाच्या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून सहज पराभव करुन दुसऱ्या जगज्जेतेपदावर विजयाची मोहोर उमटवली.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार रेनीकेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु तो त्यांच्या अंगलट आला. शानदार भारतीय फिरकी माऱ्यासमोर द. आफ्रिकेचा डाव अवघ्या ८२ धावातच कोसळला. तेथेच भारताने जेतेपदाची अर्धी लढाई जिंकली. अवघ्या ११.२ षटकात त्यांचे सर्व फलंदाज तंबूत परतले. आयुषी शुक्ला, जी. त्रिशा, वैष्णवी शर्मा, पुरानिका सिसोदिया यांच्या अचूक फिरकी माऱ्यासमोर द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. त्रिशाने ३ बळी टिपून त्यांच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तर आयुषी, वैष्णवी, पुरानिकाने प्रत्येकी २ बळी घेऊन त्रिशाला सुरेख साथ दिली. त्रिशाने मग अष्टपैलू खेळ करताना नाबाद ४४ धावांची सुरेख खेळी करुन भारतीय विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिला कमलिनीचीदेखील सलामीत चांगली साथ मिळाली. या दोघींनी भारताला बऱ्याच सामन्यात चांगली सुरुवात करुन दिली. त्याचाच मोठा फायदा भारताला मिळाला. कारण चांगल्या सुरुवातीमुळे नंतर आलेल्या फलंदाजांवरील दडपण कमी होत होते. त्यामुळे ते फलंदाज आपला नैसर्गिक आक्रमक खेळ सहज करत होते. स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात आपल्या अष्टपैलू खेळाची सुरेख छाप पाडणाऱ्या त्रिशाला सामनावीर, मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या. या संपूर्ण स्पर्धेवर भारताचे एक हाती वर्चस्व राहिले असे म्हटले तर चूक ठरणार नाही. भारताने ५ सामने ८ किंवा त्यापेक्षा जास्त गडी राखून जिंकले, तर २ लढतीत ६०पेक्षा जास्त धावांनी जिंकल्या. एकूणच या स्पर्धेत भारतासमोर कुतल्याच संघाने म्हणावे तसे मोठे आव्हान उभे केले नाही. स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणाऱ्या अब्बल ५ गोलंदाजांमध्ये ३ भारतीय गोलंदाजांचा समावेश होता. वैष्णवी शर्माने सर्वाधिक १७ बळी घेतले. आयुधीने १४ आणि सिसोदियाने ४ बळी टिपले. सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांमध्ये भारताच्या दोघीजणी होत्या. त्रिशाने सर्वाधिक ३०९ धावा केल्या, तर तिची सहकारी कमलिनीने १४३ धावा करुन तिसरा क्रमांक मिळवला.

भारतीय संघ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण क्षमतेने या स्पर्धेत उतरला होता. भारतीय संघाच्या सुरेख क्षेत्ररक्षणानेदेखील दाद मिळविली. स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारताचा समतोल संघ होता. सर्व खेळाडूंनी जबाबदारीने खेळ केला आणि आपली भूमिका चोख पार पाडल्यामुळेच दुसरे जगज्जेतेपद भारताच्या नावे लागले याबाबत कोणाचे दुमत होणार नाही. प्रत्येक चेंडू बघून त्याला भारतीय फलंदाजांनी योग्यरित्या न्याय दिला. एका जमान्यात क्रिकेटविश्वात भारतीय फिरकी गोलंदाजांची मोठी ख्याती होती. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. या भारतीय संघात आयुषी शुक्ला, पुरानिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा या तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाज होत्या. त्यांची गोलंदाजी खेळणे हे प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजासमोर मोठे आव्हान होते. याचा प्रत्यय स्पर्धेत बहुतेक सर्व सामन्यात आला. स्पर्धेपूर्वी बीसीसीआयने खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्याचे खेळाडूंनी चीज केले असेच म्हणावे लागेल. बक्षिस म्हणून बीसीसीआयने ५ कोटी रुपये जाहीर केले. या ज्युनियर संघातील किमान ३-४ खेळाडू भारतीय सिनियर संघात प्रवेश करतील अशी शक्यता स्पर्धेतील त्यांची शानदार कामगिरी बघून वाटते. या स्पर्धेतील त्रिशाची सुरेख कामगिरी बघून तिच्याकडून भावी काळात मोठ्या अपेक्षा भारतीय संघ बाळगून असेल. हे जेतेपद भारतीय महिला क्रिकेटसाठी भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल अशी आशा करूया तसेच हा विजय युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरेल.