महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या घोषणानंतर लगेचच महाराष्ट्रात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरला अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारीअर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असेल. 30 ऑक्टोबरला उमेदवारीअर्जांची छाननी केली जाईल. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांत असलेल्या 288 मतदारसंघात याकरीता मतदान घेतले जाईल. यापैकी 234 मतदारसंघ सामान्य असतील तर 25 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी आणि 26 मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित असतील, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रातल्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाल 27 नोव्हेंबर 2024पर्यंत आहे. त्यापूर्वी मतदानाची आणि नव्या विधानसभा अस्तित्त्वाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक होते. त्यानुसार या सर्व मतदानाची आणि मतमोजणीची आखणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण नऊ कोटी 59 लाख मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या चार कोटी 59 लाख असून महिला मतदारांची संख्या चार कोटी 64 लाख आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या 56 हजार आहे. सहा लाख 32 हजार दिव्यांग मतदार आहेत. 12 लाख 48 हजार मतदार 85 वर्षांवरील आहेत तर शंभरी ओलांडलेले 49 हजार मतदार या निवडणुकीत आपले कर्तव्य बजावू शकतात. एक कोटी 85 लाख तरुण मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावू शकतील.