शनिचा कोप झाला तर भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते, असे शनिकृपा किंवा शनिकोपावर विश्वास असलेले सांगतात. पण, प्रत्यक्ष शनिवरच शनिपीडा होण्याची वेळ आली तर… प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमधील मंडळींनी सरेआम लूट करत देवस्थानच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे आणि देवस्थानवरच शनिपीडा आणली आहे, असे शुक्रवारी स्पष्ट झाले.
आमदार विठ्ठल लंघे यांनी शनिशिंगणापूरमध्ये चाललेल्या लुटीबद्दलची लक्षवेधी सूचना शुक्रवारी विधानसभेत मांडली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानामध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाह्य तपासयंत्रणांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. आमदार सुरेश धस यांनी चर्चेत सहभाग घेताना शनिशिंगणापूरच्या देवस्थानमधील आर्थिक घोटाळा हा पाच-पन्नास कोटींचा नसून जवळपास पाचशे कोटींच्या घरात आहे, असा आरोप केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्यांद्वारे देणगी वसूल करून तसेच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार, संस्थानच्या विविध विभागांत 2447 बनावट कर्मचारी दाखवण्यात आले. त्यांच्या नावाने पगाराचे पैसे, काही अन्य व्यक्तींच्या खात्यांत वळते करण्यात आले. रुग्णालय विभागात 327 कर्मचारी दाखवले गेले. प्रत्यक्षात केवळ 13 कर्मचारी उपस्थित होते. अस्तित्त्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी 80 कर्मचारी, 109 खोल्यांच्या भक्तनिवासासाठी 200 कर्मचारी, 13 वाहनांसाठी 176 कर्मचारी, प्रसादालयात 97 कर्मचारी दाखवण्यात आले होते. इतर विभागांमध्येही असेच बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत. देवस्थानच्या देणगी व तेल विक्री काऊंटर, पार्किंगसाठी कर्मचारी, गोशाळा, शेती, वृक्षसंवर्धन, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत आणि सुरक्षा विभागातही बोगस कर्मचाऱ्यांची माहिती आढळली. बनावट अॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून सायबर पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुरू आहे. जे ट्रस्टी लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाईल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांचा भोंगा हा वैचारिक प्रदूषणाचा प्रकार
शिवसेना उबाठाचे संजय राऊत रोज सकाळी उठून टीव्ही वाहिन्यांवरून बोलतात, त्याचा उल्लेख राऊत यांचे नाव न घेता सकाळी दहा वाजताच्या भोंग्यावर काय कारवाई करणार, असा सवाल काही आमदारांनी केला. त्यावर मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी टिप्पणी केली की, सर्वसाधारणपणे वाजणारे भोंगे ध्वनिप्रदूषणाच्या कक्षेत येतात. पण, तुम्ही म्हणताय त्या भोंग्यावर कारवाई करण्यासाठी आपल्याकडे वैचारिक प्रदूषणाविरोधातला कायदा नाही. तसा कायदा झाला की त्या भोंग्यावरही कारवाई करू.
मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी राऊत यांच्या भोंग्याचा विषय उपस्थित केला गेला. मशिदींवरील भोंग्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर्स लावायला बंदी आहे. रात्री दहानंतर पारंपरिक वाद्ये वाजवण्यावर मात्र बंदी नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला वर्षभरातून काही ठराविक दिवस रात्री दहाची कालमर्यादा मध्यरात्री बारापर्यंत वाढवण्याची मुभा दिलेली आहे. त्याचा वापर गणपती उत्सव, नवरात्रीसह नाताळ आणि अन्य सणासुदीच्या वेळी केला जातो. पण, मशिदींवरील भोंग्यांसाठी वर्षभर परवानगी दिलेली नाही. ध्वनिक्षेपक किंवा भोंगे लावताना ठराविक डेसिबल्सच्या आत ध्वनिमर्यादा असणेही गरजेचे आहे. त्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यास आणि मशिदींवरील भोंगे मोठ्या आवाजात असल्यास संबंधित क्षेत्रातील पोलीसठाण्याच्या प्रमुखाविरुद्धही कारवाई केली जाईल.