ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, बार्ट्स हेल्थ एनएचएस ट्रस्ट आणि लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजच्या डॉक्टरांनी टार्गेटेड थर्मल थेरपी (ट्रिपल टी) विकसित केली आहे. ही उच्च रक्तदाबावर एक अतिशय सोपी आणि कमीतकमी खर्चात त्वरित उपचार देणारी प्रक्रिया आहे. उच्च रक्तदाबाच्या सर्वसामान्य परंतु अनेकदा दुर्लक्षित अशा मूळ कारणाच्या वैद्यकीय व्यवस्थापनात ही नवी थेरपी क्रांती घडवून आणेल. ही नवी क्रांतिकारी थेरपी सध्या निदान न झालेल्या आणि पारंपरिक उपचारांची सुरुवात न झालेल्या जगभरातील लाखो हायपर टेन्शन रुग्णांना फायदा देऊ शकते. ट्रिपल टी थेरपीला वैज्ञानिकदृष्ट्या एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड-मार्गदर्शित रेडिओफ्रिक्वेन्सी अॅब्लेशन म्हणून ओळखले जाते.
जगभरातील तीनपैकी एका व्यक्तीला सध्या उच्च रक्तदाब समस्या सतावत आहे. यातील दर वीसपैकी एका प्रकरणात प्राथमिक अल्डोस्टेरोनिझम नावाचा हार्मोनल आजार आढळतो. तथापि, प्रभावित झालेल्यांपैकी एक टक्क्यापेक्षा कमी लोकांचे निदान होते. एका किंवा दोन्ही अधिवृक्क ग्रंथींमधील (ॲड्रेनल ग्लँडस्) लहानलहान सौम्य गाठी जेव्हा जास्त प्रमाणात अल्डोस्टेरॉन तयार करतात, तेव्हा उच्च रक्तदाबाची स्थिती उद्भवते. अल्डोस्टेरॉन हा एक असा संप्रेरक (हार्मोन) आहे, जो शरीरात मीठ पातळी वाढवून रक्तदाब वाढवतो. प्राथमिक अल्डोस्टेरोनिझम असलेले रुग्ण बहुतेकदा मानक रक्तदाब औषधांना चांगला प्रतिसाद देत नाहीत. अशा रुग्णांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका जास्त असतो.
आतापर्यंत, प्राथमिक अल्डोस्टेरोनिझमसाठी एकमेव प्रभावी उपचार होता, तो म्हणजे संपूर्ण ॲड्रेनल ग्लँडस् शस्त्रक्रियेने काढून टाकणे. यासाठी सामान्य भूल दिली जाते आणि दोन ते तीन दिवस रुग्णालयात राहणे भाग पडते. याशिवाय, पूर्ण बरे होण्यासाठी काही आठवडे आराम करणे आवश्यक असते. परिणामी, बरेच रुग्ण यावर उपचार घेणे टाळतात. ट्रिपल टी शस्त्रक्रियेने यावर जलद आणि सुरक्षित पर्याय प्रदान केला आहे. यात ग्रंथी न काढता लहान ॲड्रेनल नोड्यूल निवडकपणे नष्ट केले जातात. डायग्नोस्टिक स्कॅनमधील अलीकडच्या प्रगतीमुळे हे शक्य झाले आहे, ज्यामध्ये आण्विक रंगांचा (मॉलीक्युलर डाईज) वापर केला जातो. या डाईज अगदी लहान ॲड्रेनल नोड्यूलदेखील अचूकपणे ओळखून नष्ट करतो. डाव्या ॲड्रेनल ग्रंथीतील गाठी जठराच्या अगदी जवळ असल्याचे दिसून येते, जिथून त्यांना थेट लक्ष्य केले जाऊ शकते.
![](https://kiranhegdelive.com/wp-content/uploads/2025/02/Blood-Pr.jpg)
नवीन उपचारात तरंग ऊर्जेचा (वेव्ह एनर्जी) वापर केला जातो. शिवाय यात रेडिओफ्रिक्वेन्सी आणि अल्ट्रासाऊंड या दोन प्रसिद्ध वैद्यकीय तंत्रांचाही वापर केला जातो. रेडिओफ्रिक्वेन्सी किंवा मायक्रोवेव्ह तंत्रात खराब झालेल्या ऊतीमध्ये (टिश्यू) ठेवलेल्या एका लहान सुईमध्ये उष्णता निर्माण केली जाते, ज्यामुळे नियंत्रित जळजळ होते. अल्ट्रासाऊंड प्रक्रियेचा रिअल-टाइम व्हिडिओ तयार करण्यासाठी परावर्तित ध्वनी तरंग (रिफ्लेक्टेड साऊंड वेव्हज्) वापरले जातात. ट्रिपल टीमध्ये, नियमित एंडोस्कोपीप्रमाणे, एक लहान अंतर्गत कॅमेरा वापरला जातो. तो अल्ट्रासाऊंड तसेच प्रकाशाचा वापर करून तोंडातून पोटात जातो. त्यातून एंडोस्कोपिस्टला ॲड्रेनल ग्लँडसचे नेमके दृश्य दिसू शकते. त्यामुळे पोटातून एक बारीक सुई अचूकपणे नोड्यूलमध्ये निर्देशित करता येते. उष्णतेच्या लहान स्फोटांमुळे (हीट बर्स्ट) नोड्यूल नष्ट होतो; परंतु आसपासच्या निरोगी टिश्यूजचे मात्र नुकसान होत नाही. या थेरपीसाठी फक्त 20 मिनिटे लागतात आणि अंतर्गत किंवा बाह्य चीरांची (इन्सीजन्स) कोणतीही आवश्यकता भासत नाही. ही अतिशय सुकर नॉन इनवेसिव्ह उपचारपद्धती आहे.
या अभ्यासाला फॅबुलास (FABULAS) असे म्हणतात. हे नाव अल्ट्रासाऊंड मार्गदर्शनासह रेडिओफ्रिक्वेन्सी एंडोस्कोपिक एब्लेशनच्या व्यवहार्यता अभ्यासाचे संक्षिप्त रूप आहे. फॅबुलासने प्राथमिक अल्डोस्टेरोनिझम असलेल्या 28 रुग्णांमध्ये ट्रिपल टी चाचणी केली गेली. ज्यांच्या आण्विक स्कॅनमध्ये डाव्या अधिवृक्क ग्रंथीमध्ये हार्मोन-उत्पादक नोड्यूल आढळले. नवीन प्रक्रिया सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले. बहुतेक रुग्णांमध्ये सहा महिन्यांनंतर हार्मोन पातळी सामान्य झाली होती. अनेक सहभागी रुग्णांनी सर्व रक्तदाब औषधे थांबवली. परंतु त्यांच्यात पुन्हा ब्लड प्रेशरची स्थिती उद्भवली नाही.
फॅबुलास अभ्यासाचे सह-वरिष्ठ संशोधक आणि लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील एंडोक्राइन हायपरटेन्शनचे प्रा. मॉरिस ब्राउन म्हणाले की, लंडनमध्ये अल्डोस्टेरॉन हार्मोनचा शोध लागल्याला आता 70 वर्षे झाली आहेत. याच्या शिशानंतर वर्षभरातच अमेरिकेत अल्डोस्टेरॉन-उत्पादक ट्यूमरमुळे गंभीर उच्च रक्तदाब असलेला जगातला पहिला रुग्ण आढळून आला होता. FABULASचे मुख्य अन्वेषक आणि UCL इन्स्टिट्यूट फॉर लिव्हर अँड डायजेस्टिव्ह हेल्थ येथे हेपॅटोलॉजी आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे प्रा. स्टीफन परेरा यांनी सांगितले की, FABULASच्या यशामुळे ‘WAVE’ नावाची एक मोठी चाचणी सुरू झाली आहे. यात पारंपरिक एड्रेनल शस्त्रक्रियेशी ट्रिपल टीचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल. 2027पर्यंत त्याचे अंतिम निष्कर्ष अपेक्षित आहेत. सध्या हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना वारंवार डॉक्टरकडे जाऊनही वर्षानुवर्षे डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. त्याचा दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो. आता रक्तदाबावरील नव्या नॉन-इनवेसिव्ह उपचारांमुळे या रुग्णांना त्वरित बरे वाटेल. ते लगेच सामान्य दिनचर्येत परतू शकतील.
यापुढील काळात योग्य प्रशिक्षणासह, रक्तदाब नियंत्रित करणारे नवे इनवेसिव्ह तंत्र संपूर्ण ब्रिटन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एंडोस्कोपी युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ शकते. यामुळे प्राथमिक अल्डोस्टेरोनिझम असलेल्या रुग्णांमध्ये निदान आणि उपचार केले जाऊ शकतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि इतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी होईल. दीर्घकाल रक्तदाब औषधांवर अवलंबून राहणाऱ्या रुग्णांची जगभरातील संख्याही यामुळे कमी होईल.