यंदा फक्त पहिल्या पाच महिन्यांत, आरपीएफने रेल्वेच्या हद्दीतून 4,607 मुलांची सुटका केली असून यामध्ये घरातून पळून गेलेल्या 3430 मुलांचा समावेश आहे. आरपीएफने सुटका केलेल्या मुलांव्यतिरिक्त इतर यंत्रणांकडून शोध घेतला गेलेल्या तसेच ज्यांचा शोध लागला नाही अशा मुलांची संख्या लक्षात घेतल्यास ही संख्या कितीतरी पटीने वाढेल. या संख्येवरून मुलांची घरातून पळून जाण्याची समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) गेल्या सात वर्षांपासून ‘नन्हे फरिश्ते’ अभियान प्रभावीपणे राबवत आहे. भारतीय रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांमध्ये काळजी आणि सुरक्षेची गरज असलेल्या लहान मुलांची सुटका करण्यासाठी हे अभियान समर्पित आहे. आरपीएफने गेल्या सात वर्षांत (2018 ते मे 2024), रेल्वेस्थानके आणि रेल्वेगाड्यांमधून संकटात सापडलेल्या 84,119 मुलांची सुटका केली.
“ऑपरेशन नन्हे फरिश्ते”च्या आरंभासह 2018 हे वर्ष महत्त्वाचे ठरले. या वर्षात, आरपीएफने एकूण 17,112 मुलांची सुटका केली. यामध्ये मुलगे आणि मुली दोन्ही समाविष्ट होते. 2018, या वर्षाने अशा उपक्रमाची तातडीची गरज अधोरेखित करत या अभियानाचा भक्कम पाया रचला. 2019मध्ये आरपीएफने एकूण 15,932 मुला-मुलींची सुटका केली. कोविड-19 साथ रोगामुळे 2020 हे वर्ष आव्हानात्मक ठरले. सामान्य जीवन विस्कळीत झाले आणि अभियानाच्या कामावर लक्षणीय परिणाम झाला. तरीही या आव्हानांचा सामना करत आरपीएफने 5,011 मुलांची सुटका करण्यात यश मिळविले.
2021मध्ये, आरपीएफने आपल्या बचावकार्यात आणखी प्रगती करत 11,907 मुलांची सुटका केली. 2022मध्ये, आरपीएफने 17,756 मुलांची सुटका केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या होती. यावर्षी घरातून पळून गेलेली आणि हरवलेली मुले मोठ्या संख्येने सापडली. त्यांना आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देण्यात आले. 2023 या वर्षात आरपीएफने 11,794 मुलांची सुटका केली. आरपीएफने आपल्या अथक परिश्रमांनी केवळ मुलांची सुटका केली नाही, तर पळून जाणाऱ्या आणि हरवलेल्या मुलांच्या वाढत्या समस्येबाबत जागरुकता निर्माण केली. त्यामुळे पुढील कारवाई शक्य झाली आणि या अभियानाला विविध हितधारकांचे पाठबळ मिळाले.