Tuesday, February 4, 2025
Homeपब्लिक फिगरहे मुख्यमंत्री म्हणजे...

हे मुख्यमंत्री म्हणजे नुसते रडतलक्ष्मी..

रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्यापासून हाफकीन इन्स्टिट्यूटला लस बनवण्याची परवानगी देण्यापर्यंत अनेक गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. हे मुख्यमंत्री कसले? दीड हजार घ्या, पाचशे घ्या, हजार घ्या, बोलणारे. नुसते रडतलक्ष्मी आहेत, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. लॉकडाऊन करण्याच्या वारंवार धमक्या दिल्यानंतर अखेर अघोषित लॉकडाऊन जाहीर केला गेला. संचारबंदीचा आज दुसरा दिवस आहे. काय परिस्थिती आहे? उपाययोजनेचा काहीही परिणाम नाही. महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये बाजारपेठा चालूच आहेत. लोकांची दयनीय अवस्था आहे. अन्न नाही, दूध नाही. लोक रस्त्यावर येणार नाहीतर काय? यांच्या पॅकेजचे पैसे केव्हा येणार? तोपर्यंत काय उपाशी मरायचे, असा सवालही त्यांनी केला.

मुंबईत सव्वा लाख भिकारी

रिक्षावाल्यांसाठी महिन्याला दीड हजार रूपये देणार आहेत. एका कुटुंबातली पाच माणसे या दीड हजार रूपयांत कशी उपजीविका करणार? जनतेचे पालनपोषण कसे करणार, याचा विचार कोणी केला आहे का? देशाच्या एकूण करातले ३१ टक्के रक्कम मुंबई देते. गेल्या वर्षी, या वर्षी कोरोनामुळे व्यापारी, लघु, मध्यम, मोठे उद्योजक सारे ठप्प झाले आहेत. कामगार उद्ध्वस्त झाला आहे. मुंबईत नुसते भिकारी सव्वा लाख आहेत. भिक कुठून मागणार? सर्वच बाबतीत आर्थिक चणचण निर्माण झाली आहे, असेही राणे म्हणाले.

संचारबंदीच्या निर्णयाने राज्यातील जनता समाधान होणार आहे का? त्यामुळे त्यांचे पालनपोषण होणार आहे का? दीड हजारात लोकांचे पोट कसे भरणार? राज्यातील कोरोना बळींची वाढती संख्या हे उद्धव ठाकरे सरकारचे पाप आणि अपयश आहे. दुकाने बंद करायची तर जीएसटी का आकारली जाते? दुकानदारांना नोटीस का पाठवत आहात? असा सवालही त्यांनी केला.

पैसा कुणी कुठे पोहोचवला, चौकशी व्हावी

अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. जमा करायचे आणि आणून द्यायचे. काहीही कमिशन न घेता. म्हणून त्यांची चौकशी करावी. सेवा आणि मेवा कसा जमा केला, कुठून नेऊन, कुठे पोहोचवला याची चौकशी झाली पाहिजे. ते चौकशीला तयार नसले तर उचलून नेतील. इतकी टीका झाल्यानंतरही हे सारे गप्प का आहेत? यांचे हात दगडाखाली आहेत. जखम होऊनच ते बाहेर येतील. या राज्यात लवकरच परिवर्तन होईल. तारीख मी सांगणार नाही. मंत्री लगेच पळापळ करतात, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता?

राज्य आहे, राज्याला स्वत:साठी लागणारा पैसा निर्माण करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्यामुळे जरा संविधान वाचा. मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करता? राज्य दिवाळखोरीकडे जात आहे. मास्क लावा, दीड हजार रुपये देतो, हे सांगण्याचे काम काय मुख्यमंत्र्यांचे आहे का? क्लार्कचे काम ते.. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय देता? असा सवालही त्यांनी केला.

कोकणाला ५० कोटी मिळतील की नाही?

आठ मार्चला अर्थसंकल्प मांडला तेव्हा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याला १७० कोटी जाहीर केले. एक महिना झाला नाही तर त्यातले ३० टक्के कमी केले. आता १३० कोटी मिळणार आहेत. अजून पूर्ण वर्ष जायचे आहे. शेवटी सिंधुदूर्गला ५० कोटी तरी मिळणार आहेत का, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विकासकामे बंद केली. कोरोनासाठी पैसे नाही. इंजेक्शन घ्यायचे.. पैसे नाही. बेड हवे.. पैसे नाही. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारकडे मागायची. मग तुम्ही काय करणार? म्हणे कोरोनाचा अंतर्भाव नैसर्गिक आपत्तीत करा. नैसर्गिक आपत्तीत काय काय येते ते आधी वाचा. चार ओळीचे पत्र लिहिता तरी येते का, या मुख्यमंत्र्यांना.. हे सांगणार आणि अधिकारी लिहिणार.. रोगराई नैसर्गिक आपत्तीत येत नाही, हे कळायला नको.. अशी टीकाही राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

नाचता येईना, अंगण वाकडे

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे जे सांगत आहेत ते नाचता येईना अंगण वाकडे आहे. रुग्णांच्या संख्येचा अंदाज घेता येत नाही का? अनेक देशात कोरोना थांबला आणि पुन्हा वाढला. त्यांनी उपाययोजना केली. शिंगणे काय सागंत आहेत? मुख्यमंत्र्यांनी बोलावे. त्यांनी मंत्र्यांना बळी देऊ नये, असेही ते म्हणाले. तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ किती जणांना पुरणार? पिंपात घालून वरून पाणी पिणार का?, असा सवालही त्यांनी केला.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content