महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे पुढे ढकलण्यात आली होती. या बहुचर्चित पत्रकार परिषदेत या तीनही नेत्यांनी त्यांच्या सरकारने आणलेल्या विविध कल्याणकारी योजना, निर्माण केलेल्या तसेच निर्माणाधीन असलेल्या पायाभूत सुविधांचा लेखाजोखा मांडला. याचवेळी त्यांनी विरोधकांनी अलीकडे केलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरील आरोपांना जोरदार प्रत्युत्तरही दिले. ज्यांचा गृहमंत्रीच जेलमध्ये जातो ते आम्हाला कायदा-सुव्यवस्था कशी राखायची याचे धडे देणार, असे म्हणत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
या पत्रकार परिषदेत महायुतीच्या जागावाटपावर तसेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर काही बोलले जाईल अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतु त्यावर काहीही ठोस कोणी बोलले नाही. जागावाटपाची चर्चा अंतीम टप्प्यात असून लवकरच ते जाहीर केले जाईल, असे त्यांनी सांगितले. महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल असे विचारले असता आमचे मुख्यमंत्री बाजूलाच बसले आहेत, असे मोघम उत्तर देत फडणवीस यांनी शेजारी बसलेल्या मुख्यमंत्री शिंदेंकडे कटाक्ष टाकला आणि हसतहसत विषय टाळला. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कामच आमचा चेहरा आहे, असे स्पष्ट केले. मात्र, माध्यमांनी आग्रह धरल्यावर फडणवीस म्हणाले की, विरोधकांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर कारावा आम्ही लगेचच आमचा नेता कोण असेल हे जाहीर करू. शरद पवारांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.
महाविकास आघाडीच्या जोर-बैठकांना साधारण महिन्याभरापूर्वी सुरूवात झाली. या बैठकांआधीच एका जाहीर मेळाव्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी उतावीळ झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली. शरद पवार तसेच पृथ्वीराज चव्हाण असे ज्येष्ठ नेते व्यासपीठावर बसले होते. त्यांची नावे घेत ठाकरे म्हणाले की, तुम्ही नाव जाहीर करा, मी आता इथेच पाठिंबा जाहीर करतो. परंतु, या दोन्ही नेत्यांनी ठाकरेंना कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी वरचेवर करतच आहेत. मात्र, काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतर जाहीर केला जाईल, असे सांगतानाच या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले. शरद पवार यांनीही यावर भाष्य करताना ज्या पक्षाचे सदस्य जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री असेल असे सांगितले. त्यानंतर ठाकरेंनी स्वतः आता मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी चालवलेला हट्ट सोडून दिला आहे. सत्ताधाऱ्यांनी आपला भावी मुख्यमंत्री जाहीर करावा लगेचच आम्ही आमचा मुख्यमंत्री जाहीर करू, अशी भूमिका त्यांनी कालपरवाच मांडली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यातल्या महायुतीवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी भाजपाच्या आमदारांनी केलेल्या त्यागाची आठवण करून दिली आहे. स्वतःचे फक्त ४० आमदार असताना आणि १० इतर आमदारांचे समर्थन असताना १०६ आमदार असलेल्या व साधारण १० अन्य आमदारांचे समर्थन असलेल्या भाजपाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. अमित शाह यांनी या खेळीला आता भाजपाचा त्याग म्हटले आहे. त्यावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही करा. म्हणजेच आता जास्त जागाही आम्हाला सोडा आणि पुढे सत्तेत परतण्याचा योग आला तर मुख्यमंत्रीपदही आम्हालाच द्या, असे शाह यांनी शिंदेंना सांगितल्याचे समजते.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शाह यांच्या या ‘सल्ल्या’चे समर्थन केले आहे तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र अमितभाईंच्या या सल्ल्याचे खंडन केले आहे. हरयाणात मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्या दुसऱ्या कारकीर्दीच्या शपथविधीच्या निमित्ताने चंदीगढला गेलेले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच अजित पवार एनडीएशासित राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेत आहेत. तेव्हा जागावाटप तसेच पुढची व्यूहरचना यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. परंतु सध्यातरी महायुती आणि महाविकास आघाडी बिनचेहऱ्यानेच निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
यावेळी होणाऱ्या निवडणुका महायुती विरोधात महाविकास आघाडी अशा होणारच नाहीत. अनेक राजकीय पक्ष आणि आघाड्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उतरणार आहेत. तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झालेल्या उद्धव ठाकरेंवर या निवडणुकीतल्या प्रचारावर थोड्या मर्यादा निश्चितच येणार आहेत. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेच्याच मुहूर्तावर महायुतीतला घटकपक्ष असलेल्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीतून एक्झिट घेतली आहे. ते स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देत २००हून अधिक जागा लढवण्याची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या ३० उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केली आहे. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती, शेतकरी नेते राजू शेट्टी तसेच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी एक स्वतंत्र आघाडी या निवडणुकीत उतरवण्याचे घोषित केले आहे. १२ जागा न मिळाल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिला आहे. एमआयएमची स्वतंत्र चूल आहेच. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील उमेदवार देणार की पाडणार याचा निर्णय येत्या रविवारी घेणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. अशा स्थितीत पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.