टेनिस विश्वात लाल मातीच्या क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या एकमेव फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि अमेरिकेची कोको गॉफ हे आता नवे राजा-राणी झाले आहेत. फ्रांसमधील जगप्रसिद्ध पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या यंदाच्या स्पर्धेत टेनिसमधील या युवा खेळाडूंनी शानदार खेळ करून आपल्या विजयाची मोहोर उमटवताना विश्वातील साऱ्या टेनिसप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. क्ले कोर्टवर खेळताना खेळाडूकडे जबरदस्त स्टॅमिना, वेगवान खेळ आणि चिकाटी या तीन गोष्टींची गरज असते. तरच त्याचा निभाव या लाल मातीच्या कोर्टवर लागू शकतो. या दोघांकडे ही विजयाची त्रिसूत्री असल्यामुळे जेतेपदावर कब्जा करण्यास कार्लोस, कोकोला यश मिळाले. यंदादेखील पुरुष विभागात राफेल नादालचा वारसदार म्हणून ओळखला जाणाऱ्या आक्लराझने आपले गतविजेतेपद कायम राखण्यात यश मिळवले तर गॉफने मात्र प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली.
या दोघांच्या विजयाला एक वेगळीच किनार आहे, तसेच काही योगायोगदेखील जुळून आले आहेत. जागतिक क्रमवारीत अल्कराझ दुसऱ्या स्थानावर तर गॉफदेखील दुसऱ्या स्थानावर होती. अंतिम फेरीत दोघांनी आपले प्रतिस्पर्धी असलेल्या जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडूंना नमविण्याचा पराक्रम केला. निर्णायक लढतीत गॉफने पहिला सेट गमावूनदेखील एरिनाला ३ सेटमध्ये पराभूत केले तर अल्कराझने यानिक सिन्नरविरुद्धदेखील पहिले दोन सेट गमावून पुढचे तीन सेट जिंकून अंतिम सामन्यात बाजी मारली. कार्लोसचे हे कारकिर्दीतील ५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद होते. उभय खेळाडूंची निर्णायक लढत तब्बल ५ तास २९ मिनिटे रंगली. पुरुष गटातील अंतिम फेरीतील हा आजवरचा दीर्घकाळ चाललेला सामना होता, तर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची दीर्घकाळ चाललेली लढतदेखील होती. याअगोदर २०१२मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेमध्ये जोकोविच-नादाल यांच्यातील लढत तब्बल ५ तास ५३ मिनिटे चालली होती. राफेल नादालला आपले दैवत मानणाऱ्या अल्कराझने २२व्या वर्षी ५वे ग्रैंडस्लॅम जेतेपद मिळवले. नादालनेदेखील २२व्या वर्षी आपले ५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले होते. हा योग जुळून आल्यामुळे अल्कराझ कमालीचा खूष होता. या विजयाबरोबरच अल्कराझने सिन्नरची ग्रँडस्लॅम स्पर्धेतील २० सामन्यांतील विजयी दौड रोखली. गुस्तावो कुएर्तन (ब्राझील), राफेल नादाल (स्पेन) यांच्यानंतर फ्रेंच स्पर्धेत जेतेपद राखण्यात यशस्वी ठरलेला अल्कराझ केवळ तिसरा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे अल्कराझने ५ ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून पाचही प्रयत्नात विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पहिले दोन सेट गमावूनदेखील विजेतेपद मिळवणारा कार्लोस ९वा खेळाडू ठरला. याअगोदर असा पराक्रम बोर्ग, आगासी, लेंडर, गुडियो, थेंम, जोकोविच, नादाल आणि सिन्नरने केला होता. ९पैकी ६ फ्रेंच टेनिस स्पर्धेत याची नोंद झाली आहे, तर २ ऑस्ट्रेलियन आणि १ अमेरिकन या इतर स्पर्धा आहेत. निर्णायक शेवटच्या सेटमध्येदेखील कार्लोस ५-६ असा पिछाडीवर होता. पण तेथूनदेखील ३ मॅचपॉईंट वाचवून सामन्यात त्याने जबरदस्त कमबॅक केले. त्याला तोड नाही. अंतिम सामन्यातील ३ सेट ट्रायब्रेकरमध्ये रंगले. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही. दबाव असतानादेखील आपला खेळ अधिक उंचवायचा आणि लढाऊ बाणा कायम ठेवायचा, हेच अल्कराझने ही स्पर्धा जिंकताना दाखवून दिले. आजच्या युवा टेनिसपटूंसाठी हा विजय निश्चितच प्रेरणादायी आहे. टेनिस जगतात ग्रँडस्लॅम स्पर्धा प्रतिष्ठेची का समजली जाते याचे हे उत्तम उदाहरण आहे. फेडरर, नादाल, जोकोविच यांच्यानंतर कोण हा प्रश्न टेनिस जगताला पडला होता. परंतु आता त्यांची जागा घेणारे अल्कराझ, सिन्नर हे प्रकाशात येत आहेत. ही टेनिस विश्वासाठी नक्कीच मोठी बातमी आहे.
उपांत्य फेरीच्या सामन्यात सिन्नरने जोकोविचला सरळ ३ सेटमध्ये नमविले. त्यामुळे या स्पर्धेतील आपले चौथे विजेतेपद मिळविण्याचे जोकोचे स्वप्न भंग पावले. त्याचबरोबर विक्रमी २५वे ग्रँडस्लॅम जेतेपददेखील तो मिळवू शकला नाही. जोकोच्या खेळातील पहिली जादू आता लोप पावत चालली आहे. वाढत्या वयाचा परिणाम त्याच्या खेळावर दिसू लागला आहे. कदाचित पुढल्या वर्षी जोकोविच या स्पर्धेत नसेल, उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळल्यानंतर तीन महिन्यांची बंदी सिन्नरवर घालण्यात आली होती. ती बंदी उठल्यानंतर त्याने केलेल्या कमबॅकला तोड नाही. कार्लोसविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आठवे मानांकन देण्यात आलेल्या लोरेन्झोने दुखापतीमुळे चौथ्या सेटनंतर माघार घेतली. त्यामुळे कार्लोसचा विजय तिथेच निश्चित झाला.
सेरेना विल्यम्सनंतर तब्बल १२ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर अमेरिकेच्या कोको गॉफने पुन्हा एकदा ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. सेरेनाने २०१३मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हादेखील योगायोग म्हणजे सेरेनाला दुसरे मानांकन आणि रशियाच्या मारियाच्या शारापोवाला प्रथम मानांकन या स्पर्धेत देण्यात आले होते. तरीदेखील सेरेनाचीच अंतिम सामन्यात सरशी झाली होती. २०१३नंतर महिला विभागात प्रथम दोन क्रमाकांच्या खेळाडूत अंतिम लढत पुन्हा एकदा झाली. पहिला सेट जिंकून गॉफची प्रतिस्पधी असलेल्या बेलारूसव्या सबालेंकाने या सामन्यात जोरदार प्रारंभ केला. पहिला सेटचा निकाल टायब्रेकरवर लागला. तो ८० मिनिटे चालला. परंतु पढील दोन सेटमध्ये गॉफने आपला खेळ कमालीचा उंचावून ग्रँडस्लॅम स्पर्धेतील दुसरे जेतेपद पटकावले. याअगोदर २०२३मध्ये गॉफने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. तेव्हादेखील तिने सबलेंकालाच पराभूत केले होते. पहिल्या सेटनंतर सबालेंकाची काहीशी दमछाक झाली. तिथेच तिचे सामन्यावरील नियंत्रण हळूहळू सुटू लागले. मग त्याचाच पुरेपूर फायदा गॉफने घेतला. गॉफने वेगवान सर्विस, रिटर्नचे जोरदार फटके, ड्रॉप शॉट आणि बैंकहॅन्डचे जोरदार फटके लगावून सबालेंकाला चांगलेच अडचणीत आणले. युवा १८ वर्षीय गॉफसमोर मग सबालेंका काहीच करू शकली नाही. दोन्ही सेट गॉफने सहज जिंकले.

तीन ग्रैंडस्लॅम स्पर्धाविजेत्या सबालेंकाने पहिल्यांदाच फ्रेंच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. परंतु जेतेपदाने मात्र तिला हुलकावणी दिली. उभय खेळाडूंत क्ले कोर्टवरच माद्रीद स्पर्धेत गेल्याच महिन्यात अंतिम लढत झाली होती. तेव्हा मात्र सबालेंकाने बाजी मारली होती. त्या पराभवाची परतफेड लगेचच गॉफने करुन दाखवली. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी गॉफने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पदार्पण केले. उपांत्य फेरीत गॉफने फ्रान्सच्या जागतिक क्रमवारीत ३६१व्या क्रमांकावर असलेल्या लोइस बोईसनचा सरळ २ सेटमध्ये पराभव केला. विशेष म्हणजे लोइसला या स्पर्धेत खास प्रवेश देण्यात आला होता. खास प्रवेश मिळवून या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी लोइस पहिली महिला टेनिसपटू ठरली. याअगोदर लोइसने तिसरे मानांकन देण्यात आलेल्या जेसिका आणि सहावे मानांकन देण्यात आलेल्या एड्रीवाचा पराभव करून स्पर्धेत चांगलीच खळबळ माजवली.
दरवर्षीप्रमाणेच यंदाची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धादेखील चांगलीच रंगतदार झाली. जगातील कोट्यवधी टेनिसप्रेमींना या खेळाची जणूकाही मेजवानीच मिळाली. याच स्पर्धेदरम्यान विक्रमी १४ वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नादालचा आयोजकांतर्फे शानदार सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्याच्यासोबत रॉजर फेडरर, अँडी मरे, नोवाक जोकोविच हेदेखील होते. विशेष म्हणजे आयोजकांनी नादालच्या पावलाचे ठसे मुख्य कोर्टवर कायमस्वरूपी जपून ठेवले आहेत, जेणेकरुन या महान टेनिसपटूला या स्पर्धेदरम्यान कोणीच विसरू शकणार नाही. आता लवकरच लंडनमध्ये सुरू होणाऱ्या वर्षातील तिसऱ्या विम्बल्डन ग्रैंडस्लॅम टेनिस स्पर्धेत अल्कराझ, गॉफ आपल्या फ्रेंच स्पर्धेतील जेतेपदाची पुनरावृत्ती करणार का, याकडे टेनिसप्रेमींचे लक्ष असेल. कार्लोसने गेली २ वर्षं ही स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे तो यंदा जेतेपदाची हॅटट्रिक करतो का, याची उत्सुकता आहे.