मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी व त्यांच्या ‘किचन कॅबिनेट’ने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याला लवकरच मासळीबाजाराचे स्वरूप प्राप्त होईल की काय, अशी रास्त शंका घेण्याजोगी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या ठिकाणी म्हणजे कोर्टनाका परिसरात नेहमीच गर्दी असते. कारण जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा कोर्ट, कोर्टाच्या मागे ठाणे सिव्हिल रुग्णालयाची होऊ घातलेली नवी इमारत, कोर्टाच्या नवीन इमारतीची उभारणी, पोलीस अधिकाऱ्यांचे विश्रांतीगृह, त्यालाच लागून पुढे आनंदाश्रम, त्याच्या बाजूला ठाणे वाचनालय आदी, आदी.. आणि त्यात गाड्यांची बेसुमार संख्या, टीएमटीच्या बसगाड्या हे सर्व एकत्र पाहिले की डोक्याच्या भुगा सोडाच ‘लोच्या’च होतो. त्यात आता श्रवणमास जसा सुरु झाला आहे तसाच ‘निवडणूक’ हंगामही लवकरच सुरु होणार असल्याने कोर्टनाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होणार हे ठरलेलेच! त्यातून येथे वाहतूक हवालदारांची चणचण.. त्याहूनही संतापजनक बाब म्हणजे वकीलवर्ग आपल्या गाड्या कोर्टासमोर वा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या करूनच उतरणे पसंद करत असल्याने ‘भोंग्याच्या’ आवाजाचा जणू उत्सवच असतो. (तरी बरे, हा परिसर नो हॉकिंगचा आहे.)
जिल्हाधिकारी कार्यालय ही पाच मजली प्रशस्त इमारत आहे. या इमारतीला मदतच होईल अशी दुसरी इमारत बाजूलाच उभारली आहे. परंतु त्याचे काम काही अजून संपत नाही असे दिसते. काही कार्यालये या इमारतीत शिफ्ट करण्यात आलेली आहेत. तरीही इमारत अजून पूर्णपणे भरलेली नाही. त्यातच मुख्य इमारतीच्या पाचही मजल्यांवर अनेक खोल्या रिकाम्या आढळून आल्या तर काही खोल्यांमध्ये नेहमीच कसले तरी रिनोव्हेशनचे काम सतत सुरु असते. (आपल्या हातून या खोल्या जाऊ नयेत म्हणून योजलेली अशी ही ट्रिक – एक कर्मचारी)
आधार केंद्र: निर्वासित वागणूक
वाचक हो, आधार कार्डचा महिमा मी काय वर्णवा! ते जन्माच्या वेळेपासून लागते, शाळेत प्रवेश करताना लागते, बँकेत खाते उघडायला लागते, सरकारच्या प्रत्येक कामात लागते, आयकर भरताना लागते आणि हल्ली तर स्मशानातही लागते. थोडक्यात इतके महत्त्वाचे कार्ड देणाऱ्या विभागाला मात्र निर्वासिताना देतात तशी एक छावणीवजा जागा दिलेली दिसली. कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या मायबाप जनतेला बसण्यासाठी काही बाकडी बाहेर ठवलेली आहेत व त्यांच्यासाठी एक पावसाळी शेड उभारण्यात आलेली आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी हे कार्यालय मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर होते. परंतु आता तेथे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आल्याने आधार कार्ड विभागाला ही निर्वासित छावणी देण्यात आली आहे, असे अधिकृतरित्या सांगण्यात आले. आधार कार्ड केंद्राला मुख्य इमारतीत वा नवीन इमारतीत प्रशस्त जागा दिली जावी अशी ठाणेकरांची मागणी आहे. आधार कार्ड काढण्यासाठी वा त्यात बदल करण्यासाठी दिवसाकाठी सुमारे 200/250 नागरिक येत असतात असे समजले.
माहिती खात्यात माणसांचा दुष्काळ
ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा असल्याने तसेच आता केव्हाही राज्य विधानसभा निवडणुकांचा मोसम सुरु होणार असल्याने सरकारची कामे, सरकारची प्रतिमा त्यातूनही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची प्रतिमा व त्यांनी केलेली जनतेच्या हिताची कामे जनतेपर्यंत पोहोचायला नकोत का? मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांना वा किचन कॅबिनेटला काय वाटते? ही सर्व कामे आपोआप होतील? माहिती खात्यात सध्या असलेली इनमीन चार माणसे ही कामे करतील, असे संबंधिताना वाटते की काय? मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याच्या सरबराईसाठीच ही चार माणसे लागतील. मग बाकीच्या कामाचे काय? कंत्राटी माणसे घ्या असे सांगणे सोपे असते. पण त्यांचे काम शून्य असते. कारण, त्यांना काहीही अनुभवच नसतो. केवळ गुगल सर्च करून मंत्रिमंडळाची प्रतिमा तयार होत नसते, ही साधी गोष्टही कळेना कुणाला, म्हणजे धन्यच म्हणायला पाहिजे.
शिवाय हे माहिती खातेही अडगळीच्या खोलीत टाकले आहे. तेही सुमारे 49 पायऱ्या चढून गेल्यावर समजते. आणि तेथेही आनंदच आहे. मुख्य इमारतीत बऱ्याच खोल्या रिकाम्या आहेत. त्यातील दोन मोठ्या खोल्यांमध्ये माहिती खात्याचा संसार थाटावा असे वाटते. तळमजल्यावर सोय करता येऊ शकते किंवा तांत्रिक विभाग नवीन इमारतीत शिफ्ट करून किंवा कसे ते वरिष्ठांनी पाहवे, असे सुचवावेसे वाटते. ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात मंजूर पदांच्या संख्येपेक्षा सध्याची पदसंख्या अत्यंत तुटपुंजी असल्याचे समजते. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी याच नव्हे तर इतर जिल्हा माहिती खात्याबद्दलही असाच दुजाभाव राखत असल्याचे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा व शहर असूनही गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांवरील पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे माहिती खात्याला साधे आमंत्रण ही नसल्याची कुजबुज आज कार्यालयात ऐकू आली. प्रकाशकांनी यासंबंधी आपली हतबलता आमच्याकडे व्यक्त केली असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
जाता जाता आता निवडणुका संपेपर्यंत तरी वाहतूक खात्याच्या दोनतीन अंमलदारांसह पुरेसे वाहतूक हवालदार कोर्टनाका परिसरात तैनात केले जावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. वर उल्लेख केलेल्या महत्त्वाच्या इमारतीबरोबरच सरकारी विश्रामगृहही याच विभागात असल्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचेही आवागमन होत राहणार असल्याने वाहतूक पोलिसांचा कसच लागणार आहे.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर