Homeमाय व्हॉईसठाकरेसाहेब, बरे झाले...

ठाकरेसाहेब, बरे झाले हो नागपूरला आलात! फार उपकार झाले बघा महाराष्ट्रावर!!

महाराष्ट्र विधिमंडळाचे छोटेखानी अधिवेशन नागपूरमध्ये नुकतेच पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अधिवेशनात फार काही होईल अशी अपेक्षा कोणी बाळगलेलीही नव्हती. मात्र नेहमीप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा या भागासाठी काही चांगल्या आणि भरघोस घोषणा केल्या जातील ही अपेक्षाही यावेळी फोल ठरली. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या आधी सरकारने ज्या काही घोषणा केल्या त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात या अधिवेशनात स्पष्टता आणण्यात आली इतकेच. विरोधी पक्ष या संपूर्ण अधिवेशनात पूर्णपणे निष्प्रभ ठरला. पहिल्या दिवसापासून ते अधिवेशन संपेपर्यंत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा तसेच विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदासाठीच आटापिटा केला. परंतु तो निष्फळ ठरला. एका आठवड्याच्या अधिवेशनातले एक आकर्षण होते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे! नेहमीप्रमाणे बूमवाल्या मराठी पत्रकारांमध्ये गाजावाजा करत दोन दिवसांनी दुपारी ते दाखल झाले आणि दोन दिवस नागपूरच्या थंडगार वातावरणात वावरल्यानंतर पुन्हा मुंबईला रवानाही झाले.

ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते विधानसभा वा विधान परिषदेपैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. नियमानुसार सहा महिन्यांत कोणत्यातरी एका सभागृहाचे सदस्य होणे त्यांना क्रमप्राप्त होते. विधानसभेची पोटनिवडणूक लढवणे त्यांच्या बसकी बात नव्हती. जनतेसमोर जाऊन कौल घेण्यासाठी हिम्मत लागते. आदित्य ठाकरेंना विधानसभेवर पाठवण्यासाठीही त्यांनी भारतीय जनता पार्टीची युतीधर्म म्हणून पूर्ण मदत घेतली. वरळीतले भाजपाचे संभाव्य उमेदवार सुनील राणे यांना तेव्हाचे आमदार विनोद तावडेंचे तिकीट कापायला लावून बोरीवलीतून उमेदवारी द्यायला लावली. इतकेच नव्हे तर एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष आणि वरळीचे माजी आमदार सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांचा संभाव्य काटा दूर केला. वरळीचे आपलेच आमदार सुनील शिंदे यांना ती जागा आदित्यसाठी सोडण्यास भाग पाडले आणि भाजपाच्या मदतीने मुलाला आमदारकी मिळवून दिली. यासाठी त्यांना विधान परिषदेच्य़ा दोन जागांची किंमत मोजावी लागली. एक जागा सुनील शिंदेना द्यावी लागली तर दुसरी अहिर यांच्यासाठी सोडावी लागली. परिणाम असा झाला की, आज फक्त वरळीतच शिवसेना (उबाठा)चे एक नाही, दोन नाहीत तर तीन-तीन आमदार आहेत. तर सांगायचे असे की जनतेचा कौल घ्यायचे टाळून ठाकरेंनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा मार्ग पत्करला. पण त्यातही अडसर होता तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा. त्यांच्यात आणि उद्धव ठाकरेंमध्ये विस्तव जात नव्हता. त्यामुळे ठाकरेंवर मुख्यमंत्रीपद सोडावे लागते की काय अशी वेळ आली होती. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी अखेर त्यांना भाजपाच्या दिल्लीतल्या नेत्यांना, खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गळ घालावी लागली. तेव्हा कुठे पाने हलली आणि कसेबसे ते विधान परिषदेचे सदस्य झाले.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर याच उद्धव ठाकरेंनी शिंदेंसह त्यांच्याबरोबर गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना परत बोलवताना उरलीसुरली शिवसेना टिकवण्याच्या प्रयत्नात दूरदृष्य प्रणालीमार्फत संबोधन करताना भावनिक साद घातली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली. पण, प्रत्यक्षात मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा त्यांच्या खिशातून आजपर्यंत बाहेर आलेला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात, मग ते मुंबईत असो वा नागपूरमध्ये, त्यांना हजेरी लावावीच लागते. दरवेळी ते अधिवेशनाला जातात ते एखाद्या सेलीब्रेटीच्या थाटात! विधिमंडळात काय चालले आहे याच्याशी त्यांचे काही देणेघणे नसते. आपला स्वतःचाच अजेंडा ते राबवतात. प्रत्येक अधिवेशनात ते जेमतेम दोन दिवस विधिमंडळाच्या आवारात दिसतात. विधान परिषदेच्या सभागृहात जेमतेम दोन-चार तास घालवतात. विधिमंडळाबाहेर माध्यमांशी बोलताना सत्ताधाऱ्यांवर टोमणे मारण्यापलीकडची टीका त्यांच्याकडून होत नाही.

ठाकरे

या अधिवेशनातही ते तिसऱ्या दिवशी दुपारनंतर नागपूर विधिमंडळाच्या आवारात अवतरले. दोन दिवस ते उपस्थित होते. या काळात त्यांनी सभागृहात जेमतेम दोन तास घालवले. या काळात त्यांनी एकही प्रश्न वा उपप्रश्न विचारला नाही की कोणत्या चर्चेत भाग घेतला. मग या दोन दिवसांत ठाकरेंनी नेमके केले काय? तर दोन वेळा विधिमंडळाबाहेर त्यांनी पक्षाच्या काही आमदारांच्या उपस्थितीत माध्यमांना संबोधित केले. त्या संबोधनातही त्यांनी विधानसभा तसेच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दाच मांडला. या पलीकडे त्यांची धाव गेली नाही. पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा मुद्दा नव्याने मांडला. अधिवेशनापूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या कामकाजात विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी कोणताही लिखित नियम नाही. ज्या विरोधी पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद दिले पाहिजे, असा विधिमंडळाचा संकेत आणि परंपरा आहे. परंतु सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला तयार नाही. सरकार जर विरोधी पक्षनेतेपद द्यायला तयार नसेल तर त्यांनी सरकारमध्ये असलेले उपमुख्यमंत्रीपद, जे घटनाबाह्य आहे ते त्वरित रद्द करावे आणि जे जे उपमुख्यमंत्री ज्या-ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना त्या-त्या खात्याचे मंत्री म्हणूनच संबोधले जावे, अशी मागणी ठाकरेंनी केली. हीच मागणी त्यांनी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलतानाही केली. मात्र, यावेळी त्यांनी एक नवीन पण तितकीच हास्यास्पद गोष्ट सांगितली की, सरकार विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरते.

उद्धव ठाकरे विधिमंडळात असा प्रयत्न करणार हे ओळखून सत्ताधारी शिवसेनेने त्यांचे बिंगच फोडले. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव पुढे करून ठाकरे आपले चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे नाव ऐनवेळी रेटतील, अशी शंका सेनेचे मंत्री उदय सामंत तसेच आमदार निलेश राणे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवण्याच्या प्रयत्नात भाजपापासून दूर जाऊन हिंदुत्वाची कास ढिली करत उद्धव ठाकरेंना काँग्रेसच्या मांडीवर बसावे लागले. मुस्लीमांची मने सांभाळावी लागली. आदित्य तर मुख्यमंत्री झाले नाहीत, पण या प्रयत्नात ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे जोखड स्वीकारावे लागले. आता ते आदित्यना विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसवू पाहत आहेत. याकरीता त्यांनी या अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही भेट घेतली. विधान परिषदेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात सभेत काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यातही ते यशस्वी झाले. परंतु त्यांची डाळ शिजली नाही. केवळ याचसाठी ते यावेळी मुंबईहून नागपूरमध्ये आले होते. जनाधार असता, जास्त आमदार निवडून आणले असते तर त्यांना अशा नाकदुऱ्या काढाव्या लागल्या नसत्या.

जनाधार वाढवण्यासाठी सभागृहात तासन्तास बसून जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरावे लागते. मतदारसंघ पिंजून काढावा लागतो. शर्टाची, कुर्त्याची इस्त्रीची घडी मोडावी लागते. एक-दोनदा शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहून विरोधकांना टोमणे मारून चालत नाही. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात सेलीब्रेटीप्रमाणे वावरून जनाधार वाढत नाही हे आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या लक्षात यायला हवे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सेलेब्रीटीच्याच थाटात जायचे, वावरायचे. पण त्यांना ते शोभायचे, कारण मराठी जनतेच्या भावनेला हात घालण्यात ते यशस्वी झाले होते. त्याचप्रमाणे त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती. किंग होण्यापेक्षा किंगमेकर बनण्यात त्यांना रस होता. उद्धवजी स्वतःच किंग झाले आणि मुलाबाळांचे, आप्तेष्टांचेच हित जोपासत बसले. त्यामुळे आज त्यांच्यात मुंबई महापालिकाही स्वबळावर लढण्याची हिम्मत राहिलेली नाही! सर्वसामान्यांशी असलेली नाळ त्यांची केव्हाच तुटली आहे. त्यामुळेच ठाकरेंनी नागपूर सोडल्यानंतर तेथे उपस्थित असलेले शिवसैनिक म्हणाले- बरे झाले हो साहेब तुम्ही आलात. महाराष्ट्रावर अनंत उपकारच झाले, बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण अमित शाहांच्या दरबारी! मध्यरात्रीनंतर गुफ्तगू!!

महाराष्ट्रातल्या मुंबईसह अनेक महापालिकांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला कसे सामावून घ्यायचे यावर चर्चा करण्यासाठी बुधवारी रात्री भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली. मध्यरात्रीनंतर...

मुख्यमंत्रीपदासाठी खरंच फिट आहेत का नितीश कुमार?

बिहारचे काळजीवाहू मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती खरोखरीच उत्तम आहे का? त्यांना पुढच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार सोपविण्याइतके ते फिट आहेत का, असे एक नाही तर अनेक प्रश्न सध्या बिहारच्या राजकीय नेत्यांमध्ये चर्चिले जात आहेत. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनताप्रणित...

आशिया कप फायनलमध्ये रंगला ‘क्रिकेट मानापमान’चा प्रयोग!

बिहार, पश्चिम बंगाल विधानसभा आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीवर झालेल्या राजकीय रंगरंगोटीच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला आशिया टी-20 क्रिकेट चषक (कप) अखेर दुबईतच राहिला. दुबईमध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दोन चेंडू राखून सनसनाटी...
Skip to content