सुरेश कलमाडींची माझी पहिली भेट झाली ती १९७९/८०च्यादरम्यान.. म्हणजे तब्बल सत्तेचाळीस वर्षांपूर्वी. सुरेश कलमाडी गेल्याची बातमी कळली आणि गेल्या ४७ वर्षांतला सुरेश कलमाडींचा स्क्वॉड्रन लीडर ते अगदी अतिशय वाईट पद्धतीनं राजकारण संपलेला खासदार, हा प्रवास जसा झर्रकन डोळ्यासमोरून गेला तसाच तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंगही… ।। ढेकणासंगे हिरा जो भंगला| कुसंगतीने जाला घात तैसा ।।
१९७/८०दरम्यान पुण्यात जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धांचे वार्तांकन करायला वि वि करमरकरांनी मला पुण्यात पाठवलं होतं. पुण्यात काही अडचण आली तर पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या बंड्या (प्रल्हाद) सावंतला भेट, तो सकाळ वृत्तपत्राचा क्रीडा वार्ताहर आहे, हेही त्यांनी सांगितलं. मी संध्याकाळी उशिरा पुण्यात पोहोचलो ते थेट सकाळ कार्यालयात प्रल्हाद सावंतांकडे. त्याचं काम संपेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेलेले. तिथून आम्ही दोघं डेक्कन जिमखान्यावर कॉफी हाऊसमध्ये आलो. बंड्यानं जेवण मागवलं आणि गल्ल्यावरचा एक उंचापुरा देखणा तरुणही बंड्यासमोर येऊन बसला. बंड्याने ओळख करून दिली- “हा सुरेश, हॉटेलचा मालक”. बंड्या तेव्हा सुरेश कलमाडींना खाजगीत नावानेच हाक मारायचा. बोलता बोलता बंड्या सुरेश कलमाडींना म्हणाला, दोन दिवसांत जिल्हा स्पर्धा सुरू होताहेत पण पैशाची अडचण आहे. काहीतरी मदत कर. बंड्याला दोनशे रूपयांची गरज होती. सुरेश कलमाडींनी पटकन पैसे काढून दिले. तीन दिवस स्पर्धा मस्त पार पडल्या. बंड्या म्हणाला- उमेश, बक्षीसवितरण समारंभाला सुरेशला बोलवूया. मी पुण्यातल्या पेपरमध्ये फोटो छापून आणतो, तू मटामध्ये फोटो छाप.
वृत्तपत्रात दुसऱ्या दिवशी फोटो छापून आले आणि सुरेश कलमाडींना दोनशे रूपये काय जादू करू शकतात ते कळलं. त्या दिवसानंतर सुरेश कलमाडी ॲथलेटिक्समध्ये लक्ष घालायला लागले. मला नक्की आठवत नाही, पण बहुदा त्याच सुमारास पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या निवडणुका होत्या. सुरेश कलमाडींना अध्यक्षपदासाठी उभे राहा म्हणून बंड्या गळ घालत होता. निवडणुकावगैरे माझं काम नाही असं सांगत कलमाडींनी बंड्याला टाळलं. पण बंड्या काही हटेना. मग सुरेश कलमाडींनी आपल्या पत्नीला, मीरा कलमाडींना अध्यक्षपदासाठी उभं करू असा मार्ग काढला. मीरा कलमाडी निवडूनही आल्या. निवडून येऊ याची खात्री नसल्यानं मतमोजणीच्या वेळीही मीरा कलमाडी आल्या नव्हत्या. ४७/४८ वर्षांपूर्वीचे सगळे संदर्भ आठवत नाहीत, पण मीरा कलमाडी बराच काळ पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्ष होत्या असं वाटतंय. पण प्रत्यक्षात कामं सुरेशभाईच करायचे. संघटनेवर आपली चांगली पकड बसली आहे हे सुरेशभाईंच्या लक्षात यायला लागलं होतं. भाई संघटनेत अधिकाधिक लक्ष घालायला लागले. संघटनेला स्पर्धा भरवायला कायमच पैशांची अडचण असायची आणि प्रत्येकवेळी भाई स्वतः खिशात हात घालून अडचण सोडवायचे. भाईंना दूरदृष्टी होती. टिपिकल स्पर्धा तर भरत राहतीलच पण काहीतरी वेगळं करू असं ते बंड्याला सांगायचे.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ही भाईंकडून ॲथलेटिक्सला मिळालेली देणगी होती. सालं होतं १९८३. मी १९८३ ते १९९१ असा दरवर्षी मुंबईहून पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दोन दिवसांसाठी यायचो. भाईंचा कामाचा झपाटा अफाट होता. कामात प्रचंड शिस्त होती. त्यामुळे अगदी बारीकसारीक गोष्टीतही ते स्वतः लक्ष घालायचे. त्याकाळात स्पर्धेचा आणि भाईंचाही बोलबाला जबरदस्त होता. बघताबघता पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन हा सुरेशभाईंनी एक मोठा ‘इव्हेंट’ करून टाकला. बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले होते. भाईंच्या आवाका जबरदस्त होता. संघटनेवर मजबूत पकड होती. पाहतापाहता सुरेशभाईं राजकारणात आले. राजकारणाची परंपरेनं आलेली कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ब्राह्मणांच्या पुण्याच्या राजकारणात कानडी माणसासाठी जम बसवणं सोपं काम नव्हतं. पण त्या माणसाचा स्वभावच वेगळा होता. साम दाम दंड भेद यांचा यथेच्छ वापर करत ते खासदार झाले. केंद्रात मंत्री झाले. प्रथम महाराष्ट्र राज्य संघटना, नंतर भारतीय ॲथलेटिक्स संघटना आणि नंतर आंतरराष्ट्रीय आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचेही अध्यक्ष झाले. त्यांच्या वाढीचा वेग धडकी भरावी असा प्रचंड होता. या वेगवान प्रवासात सत्ता, पैसा आणि प्रसिद्धीच्या हव्यासापायी आपण कोणाला जवळ करतोय, कोणाला दूर लोटतोय याचं भान भाईंना राहिलं नाही. ॲथलेटिक्समधली चांगली माणसं भाईंपासून दूर व्हायला लागली आणि उत्तरेकडच्या लॉबीनं भाईंचा कब्जा घेतला. स्पर्धा भरविण्यासाठी सहजपणे खिशातून पैसे काढणारे भाई पुण्या-मुंबईच्या मोठमोठ्या उद्योजकांना वेठीस धरायला लागले. वेठीस धरायला लागले हे म्हणणं कदाचित चूक असेल पण खासदारांचा शब्द नाकारून चालणार नाही आणि दिलेला पैसा इतर मार्गानी वसूल करता येईल या खात्रीतून… मॅरेथॉन, गणेशोत्सवापासून ते फिल्म फेस्टीवलपर्यंतच्या सुरेशभाईंनी सुरू केलेल्या प्रत्येक उपक्रमाला छोट्यामोठ्या उद्योजकांनी मोठा आर्थिक पुरवठा सातत्यानं केला. आणि त्यातूनच भ्रष्टाचाराची सुरूवात झाली.
लोकसत्तामधून मी त्यावर लिहायला सुरूवात केली ती १९९३मध्ये. १९९२ साली मी पुण्यात लोकसत्तामध्ये आलो आणि बंड्यामुळे भाईंशी जवळीक वाढली. सुरेशभाई आठवड्यातून जवळपास चार-पाच दिवस भेटायचे. जसजसा जवळ जात गेलो तस तसा भाईंबद्दल माझा भ्रमनिरास व्हायला लागला. जेमतेम वर्षभरातच मुंबईत मटामधून वि वि करमरकर आणि पुण्यात लोकसत्तमधून मी कलमाडींच्या कार्यपद्धतीच्या विरोधात मोहीम सुरू केली. सुरेशभाई स्वतः आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न घरातले होते. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी भ्रष्टाचार करायची गरज लागली असेल असं मला वाटतं नाही. पण संघटना बांधताना, मोठी करताना आणि त्यावरची आपली पकड कायम ठेवण्यासाठी सर्व बऱ्यावाईट गोष्टी कराव्या लागतात, त्या त्यांनी केल्या हेही नाकारता येणार नाही. सुरेशभाईंनी गोळा केलेली मंडळी या काळात भाईंना जळूसारखी चिकटून होती.

पुणे लोकसत्तामध्ये मी सात वर्षे होतो. सुरेश कलमाडींच्या विरोधात सतत लिहित होतो आणि त्याची किंमतही मोजत होतो. त्या सात वर्षांत लोकसत्ताच्या निवासी संपादकांनी मला प्रचंड त्रास दिला. पण गमतीचा भाग म्हणजे सुरेश कलमाडींशी माझे व्यक्तिगत पातळीवरचे संबंध अतिशय मित्रत्वाचे होते. अर्थात ते श्रेय त्यांचंच. अखेरीस १९९९मध्ये मी लोकसत्तामधून राजीनामा देऊन बाहेर पडलो. ज्या दिवशी लोकसत्ता सोडलं त्या दिवशी उशीरा संध्याकाळी सुरेश कलमाडींच्या सचिव राजा महाजनचा फोन आला. “भाईंनी तुझ्यासाठी फेअरवेल पार्टी ठेवलीय, १० वाजेपर्यंत ब्ल्यू डायमंडला पोहोच.” मी दहाच्या सुमारास तिथे गेलो. पण रिसेप्शनवर कोणालाच अशा गेट टुगेदरची माहिती नव्हती. मी राजाला फोन केला तर तो म्हणाला ब्ल्यू डायमंडला खोली बुक केलीय, भाई तिथे पोहोचलेत, तू पण वर जा.” मी खोलीवर गेलो तर तिथे फक्त सुरेशभाई होते. बाकीचे कोण कोण येणार आहेत विचारलं तर म्हणाले आपण दोघंचं आहोत.
बिअर आली, गप्पा सुरू झाल्या. मी हसत म्हणालो. मला एकट्याला पार्टी देताय, ब्याद गेली एकदाची असं वाटतंय ना? भाई हसले नाहीत. पण म्हणाले, मला तुझ्याशी आज मोकळेपणानं बोलता येईल. काही काळ दोघंही गप्प. भाई म्हणाले, “माझ्यावर कायम वाईट टीका करत राहिलास.” मी म्हणालो, “तुम्ही ॲथलेटिक्समध्ये आलात तेव्हा आशेचा किरण दिसत होता. पण नंतर सगळं बिघडत गेलं. ॲथलेटिक्समधली चांगली माणसं हळूहळू दूर गेली, वाईट प्रवृत्ती स़घटनेत आल्या. तुम्ही त्याच्या स्वैर कारभाराकडे काणाडोळा करत राहिलात.” मी सुरेशभाईंना म्हणालो, १९८३मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू केलीत. प्रत्येक वर्षी कोट्यवधी रूपये खर्च केलेत, एकतरी मॅरेथॉनपटू यातून भारताला मिळाला का? मी भाईंना चार-पाच नावं सांगितली आणि म्हणालो, या माणसांना बाहेर काढा, प्रचंड भ्रष्टाचारी आहेत,तुमचं नाव खराब होतंय.” भाई म्हणाले- ते शक्य नाही. एक मोठा पॉझ गेला. शांततेचा भंग करत म्हणालो, “आज नाही, पण दहा वर्षांनी माझे शब्द तुम्हाला आठवतील. तुमची राजकीय कारकीर्द हीच माणसं संपवतील.” तो विषय तिथंच थांबला. बाकी गप्पा झाल्या आणि आम्ही निघालो. ही गोष्ट १९९९ मधली… कॉमनवेल्थ गे्म्स भ्रष्टाचार प्रकरणात राजधानीतला नवा बांधलेला फ्लायओव्हर कोसळल्यानंतर विरोधी पक्षांचा क्षोभ मिटवण्यासाठी, दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना वाचवण्यासाठी कलमाडींचा बळी देण्यात आला. कलमाडींना मी ज्या माणसांपासून सावध राहा, त्यांना बाजूला करा, तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल असं सांगितलं होतं त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला. अर्थात कॉमनवेल्थ गेम्सचे सर्वेसर्वा या नात्यानं कलमाडीच त्याला जबाबदार होते.
२००३मध्ये मुंबईत सहारा न्यूज चॅनलसाठी मी परत पुण्यात आलो, काम सुरू केलं. भाईंबरोबर पूर्वीसारखी भेट व्हायची नाही. बातमीसाठी क्वचित भेट व्हायची. पण टेलीव्हिजन बातम्यांच्या दीड मिनिटांच्या बातमीत भाईंबाबत कधी काही फार बातम्या करायला वेळही मिळायचा नाही. पुढच्या तीन वर्षांनंतर माझ्या बायकोला कॅन्सर झाल्यामुळे मीदेखील फारसा शूटवर नसायचो. माझ्या १५००० रूपये पगारात हे अवघड आजारपण कसं काढणार याच चिंतेत असायचो. एकदा असाच रात्री दीड वाजता भाईंचा फोन आला. “तुझ्या बायकोला कॅन्सर झालाय हे बोलला नाहीस मला. मी वॉशिंग्टनमध्ये आहे, अनुराधाशी बोललोय. उद्या तिच्या पुण्याच्या ऑफीसमधून फोन येईल. तिकडे जाऊन ये..” मी विचारलं कोण अनुराधा? “अनुराधा देसाई. वेंकीजची मालकीण..” एवढंच बोलून भाईंनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी वेंकीजमधून फोन आला. माझ्या बायकोच्या आजाराची जबाबदारी वेंकीजनं घेतली होती. दुसऱ्या दिवशी मला दीनानाथ मंगेशकर हाॉस्पिटलमधून फोन आला की, डाॅक्टर धनंजय केळकरनी तातडीनं बोलावलंय. मी गेलो तर पुण्याच्या महापौर दीप्ती चौधरी, स्थायी समितीचे अध्यक्ष, काही नगरसेवक असा लवाजमा दीनानाथला आला होता. “आठलेकर मॅडमची व्यवस्थित काळजी घ्या” हा सुरेशभाई़ंचा निरोप घेऊन ते आले होते. सतत सात वर्षं मी ज्या कलमाडींवर अतिशय कडक शब्दांत टीका करत होतो त्याच कलमाडींनी “उमेश आठलेकरच्या बायकोची काळजी घ्या” हे सांगायला पुण्याच्या महापौरांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं..
कलमाडी हा वेगळाच माणूस होता. कॉमनवेल्थ गे्म्स प्रकरणात जवळपास नऊ महिने तुरुंगात काढल्यानंतर कलमाडी बाहेर आले खरे.. पण त्यांचं राजकारण संपल्यातच जमा होतं. त्यांनी आपलं राजकीय पुनरूज्जीवन करण्याचे केलेले प्रयत्नही क्षीण असेच होते. त्यात आजारांनी ते हतबल होते. काही वर्षांपूर्वी मी सहज भेटायला म्हणून कलमाडी हाऊसवर गेलो तर तिथला सुरक्षारक्षक बंगल्याचा दरवाजा उघडत नव्हता. माझी थोडी माहिती सांगितल्यावर त्यानं दरवाजा थोडा किलकिला केला आणि मी जागीच गोठल्यासारखा उभा राहिलो… बंगल्याच्या लॉनवर सकाळच्या कोवळ्या उन्हात व्हीलचेअरवर भाई बसले होते. पांढरीशुभ्र दाढी, डोळे मिटलेले, मान डावीकडे कललेली… चेहऱ्यावरची रया गेलेली… भाईंना भेटायचं धैर्य मला झालं नाही….
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक आहेत.)

