राज्यातील साखर आयुक्तपदातील सावळागोंधळ सुरूच आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांचीही सहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. काल उशिरा जारी आदेशानुसार, त्यांची मुंबईत कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यावर्षी राज्याचा ऊसगाळप हंगाम सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये साखर आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली करून त्याजागी आठवड्यानंतर सिद्धराम सालिमठ यांची नियुक्ती केली गेली होती. आता सालिमठ यांनाही कामाची पुरेशी संधी न देताच त्यांचीही बदली करण्यात आली. त्यांच्या जागीही नवे आयुक्त देण्यात आलेले नाहीत. साखर आयुक्तपदाबाबत सातत्याने सुरू असलेल्या या खो-खोच्या खेळामुळे साखर उद्योगात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
कोकण विभागाचे सध्याचे अतिरिक्त आयुक्त विकास मारुती पानसरे यांची मुंबईतच एमएसएसआयडीसीचे (MSSIDC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.