शिवसेनेचे नायगावचे माजी शाखाप्रमुख, मित्रवर्य सुरेश काळे यांनी समाजमाध्यमावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचे ॲड. सुधा चुरी यांचे छायाचित्र पाठविले आणि एकदम धस्स झाले. गेल्या काही दिवसांपासून सुधाताईंची सतत आठवण येत होती. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि मी आम्ही दोघांनी सुधाताई यांची मुंबईतल्या गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची इच्छाही व्यक्त केली. परंतु त्या हल्ली कुणालाच भेटत नसल्याचे तसेच त्या आजारी असल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळातील सुधा चुरी यांचे योगदान खूप मोठे आहे. तसे गोरेगाव हे रणरागिणींचेच शहर म्हणावे लागेल. मृणाल गोरे, सुधा चुरी, मोहिनी अणावकर अशा अनेक रणरागिणी गोरेगावातून राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकल्या. मृणालताई पाणीवाल्या बाई म्हणून ओळखल्या गेल्या. महागाई संयुक्त प्रतिकार महिला समितीच्या माध्यमातून मृणालताई, अहिल्याबाई रांगणेकर, प्रमिलाताई दंडवते, मंगलाताई पारेख, कमलताई देसाई यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारला ‘दे माय धरणी ठाय’ करुन सोडले होते. भाऊसाहेब वर्तक अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना सचिवालयात त्यांना घेराव घातला होता. मोहिनी अणावकर या निहाल अहमद यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वत्र आंदोलनात सहभागी होत होत्या. आताही त्या घर हक्क समिती आणि झोपडपट्टीवासियांसाठी झगडत आहेत.
सुधा चुरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खणखणीत नेतृत्त्वाखाली शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी १९६६पासून झटत होत्या. शिवसेना महिला आघाडीप्रमुख म्हणून त्यांचे कार्य जबरदस्त होते. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यांनी राज्यात महिला आयोगाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला आणि एक सर्वपक्षीय समिती स्थापन केली. सुधाकरराव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात महिला आयोगाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात येत असल्याचे जाहीर केले. मी सुधाकररावांना ही समिती सर्वपक्षीय आहे का? असे विचारले. त्यांनी होकार दिला. मग मी या समितीत शिवसेना-भाजप युतीचे कुणीही नाही, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर त्यांनी मला नावे सुचवा असे सांगताच शिवसेनेच्या सुधा चुरी आणि भारतीय जनता पक्षाच्या जयवंतीबेन महेता ही दोन नावे सुचविली. सुधाकरराव नाईक यांनी मनाचा मोठेपणा दाखवीत तत्काळ ही दोन्ही नावे जाहीर केली.
आपली नावे समितीवर कशी आली याची या दोघींना कल्पना नव्हती. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात गोरेगाव येथे एनएससी येथे गटप्रमुखांच्या मेळाव्यात योगायोगाने सुधाताई भेटल्या. मी त्यांना महिला आयोगाच्या स्थापनेसाठी समिती स्थापन करण्यात येत असल्याच्या घोषणेचा किस्सा सांगितला. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीवर चर्चेसाठी मला बोलावले होते. योगायोगाने जयवंतीबेन तिथे चर्चेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी गप्पा मारत असताना त्यांनासुद्धा हा किस्सा सांगितला. तेव्हा “तरीच म्हटलं आमचं नाव काँग्रेस राजवटीत कसं आलं?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सुधाताई मात्र नंतर मागेच राहिल्या. नेत्यांसमोर पुढेपुढे करण्याची सवय त्यांना नसल्याने त्यांना सत्तेत मानाचे पान मिळू शकले नाही. सुधाताईंच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा!