परवा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी अत्याधुनिक अशा ई-मोटारीच्या नव्या शोरूमचे उद्घाटन केले. त्यांनी टेस्ला वाय प्रकराच्या मोटारीत बसण्याचा, गाडी हाताळण्याचाही अनुभव घेतला. टेस्लाने हीच गाडी अमेरिकेत पंधरा दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या घरी ड्रायव्हरशिवाय पाठवली होती. म्हणजे गाडीच्या संगणकात ग्राहकाचा पत्ता लोकेशन टाकल्यानंतर व तिथे जाण्याचे आदेश दिल्यानंतर ती गाडी स्वतःहून आपोआप ग्राहकाच्या दरवाजात जाऊन उभी राहिली. एखाद्या सायन्स फिक्शनमध्ये असावी अशी घटना टेस्लाने प्रत्यक्षात साकारली आहे. ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या टॅक्सी सर्व्हिस हे टेस्लाचे पुढचे ध्येय आहे. अशा अत्याधुनिक यंत्रणा असणारी गाडी आता मुंबईत बीकेसीत मिळू लागणार आहे. त्याची किंमत अर्थातच स्वप्नवतच आहे. म्हणजे सर्वसामान्य मुंबईकर स्वप्नातही कल्पना करता येणार नाही अशी! साठ ते सत्तर लाख फक्त!! अशा किंमतीत टेस्ला वाय भारतात मिळणार आहे. टेस्लाच्या ड्रायव्हर सीटवर रुबाबात बसलेल्या फडणवीसांचे छायाचित्रही बोलके आहे. त्याना झालेला आनंद व समाधान त्यातून झळकत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अशाच प्रकारच्या आणखी दोन-तीन हसऱ्या तसबिरी सरत्या सप्ताहात ठळकपणाने समोर आल्या. दुसरी तसबीर होती ती नवी मुंबई विमानळाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली तेव्हाची. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावा यासाठी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कालावधीत मोठी धडपड केली होती. तो विमानतळ आता पूर्ण होण्याच्या टप्प्यापर्यंत आला आहे. ज्यांनी नवी मुंबई विमानतळाचे भूमीपूजन केले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते त्याचे उद्घाटन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकेल. अशा टप्प्यापर्यंत, म्हणजे 94-95 टक्के कामे पूर्ण होण्यापर्यंत हा विमानतळ आला आहे. मुख्य धावपट्टटी तयार होऊन आता सहा महिने झाले. तिथे विमानाची चाचणी उड्डाणेही घेतली गेली. आता टर्मिनल इमारत, विमान कंपन्यांचे काऊंटर, प्रवाशांचे सामान वाहून नेणारे बेल्ट, सुरक्षा तपासणीच्या व्यवस्था अशी सगळीच कामे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या भागातील मोठे नेते वनमंत्री गणेश नाईक अशा तिघांनी विमानतळाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी फडणवीस यांच्या तसेच शिंदेंच्या नावाने विमानतळ प्राधिकाऱ्यांनी दोन बोर्डिंग पासही तयार करून दाखवले व त्यावर दोघा नेत्यांच्या सह्या घेतल्या. इतक्या टप्प्यावर काम आले व आपण सुरु केलेला प्रकल्प आपल्याच कालावधीत पूर्ण होत आहे, याचे एक समाधानाचे हसू तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर झळकलेले माध्यमांनी टिपले.

महाराष्ट्रात आणि देशात आता हे वारंवार घडतेय की ज्या नेत्यांनी प्रकल्पाची पायभरणी केली, कामाची सुरूवात केली, त्यांनाच त्या प्रकल्पाच्या उद्घाटनाचीही संधी मिळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले. अनेक मेट्रो तसेच रेल्वे प्रकल्पांची कामेही मोदींच्याच हस्ते सुरु झाली व समाप्तही झाली. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने पूर्ण होत असल्याचेही हे लक्षण आहे. याआधी मुंबईतील मेट्रो व पूर्व द्रूतगती महामार्गांचे प्रकल्प ज्यांनी पायाभरणी केली त्यांची राजवट संपून अनेक वर्षांनी पूर्णत्वास गेले. मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग तसेच मुंबईतील वरळी-वांद्रे हा पहिला सागरी सेतू, हे प्रकल्प याचे उदाहरण ठरावे. नितीन गडकरींनी 1995-96मध्ये या दोन्ही कामांची सुरूवात केली आणि त्यांचे सरकार जाऊन काही वर्षांनंतर विलासराव-भुजबळांना त्यांची उद्घाटने करण्याची संधी मिळाली.
टेस्लाचे छायाचित्र आणि विमानतळ प्रकल्पाच्या पाहणीनंतरची मुख्यमंत्र्यांची हसरी छबी निराळी आणि विधान परिषदेत चमकलेले मुख्यमंत्र्यांचे हास्य हे आणखी निराळे! तिथे त्यांच्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची हातोटीही दिसून आली. निमित्त होते ते परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवृत्तीचे. आणखी दीड महिन्याने अंबादास दानवे यांचा परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ समाप्त होत आहे. पुढच्या सत्राच्या आधी जे सदस्य निवृत्त होतात त्यांचा निरोप समारंभ विद्यमान अधिवेशनाच्या अखेरच्या सप्ताहात करण्याची प्रथा व परंपरा विधान परिषदेत पाळली जाते. त्याचप्रमाणे सत्र संपण्याआधी सर्व सदस्यांचे एक छायाचित्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर घेण्याचीही प्रथा परिषदेत सांभाळली जाते. दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ तसेच सर्व सदस्यांचा ग्रूप फोटो असे कार्यक्रम बुधवारी विधानभवनात पार पडले. तेव्हा दोन गमतीदार पण त्याचवेळी लक्षणीय प्रसंग घडले. त्याने काही नेतेमंडळी अस्वस्थही झालेली असणार यात शंका नाही.

परिषदेतील निरोप समारंभात दानवेंचे कौतुक करताना उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यात टोलेबाजी रंगली होती. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यासाठी दानवेंनी बरेचदा आंदोलने केली होती. हा संदर्भ घेऊन फडणवीस म्हणाले की, जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वात आमचे सरकार सत्तेत आले तेव्हा औरंगाबादचे नाव बदलण्यात आले. त्यावर लगेच मविआ सरकारने तो निर्णय केला होता असे उद्धव ठाकरे तसेच अन्य सेना सदस्य सांगू लागले. यावर फडणवीसांनी संधी घेतली. ते म्हणाले की आता नीट ऐका. जेव्हा एकनाथ शिदें सरकारमधून बाहेर पडले, तेव्हा राज्यपालांनी तुम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र दिले. ते पत्र मिळाल्यानंतर खरेतर तुम्हाला मंत्रीमंडळ बैठक घेऊन निर्णय करण्याचाही अधिकारच नव्हता. त्या मंत्रीमंडळ बैठकीत तुम्ही छ.संभाजीनगर नामांतराचा निर्णय केलात. पण तो बेकायदा ठरतो. आमचे सरकार आल्यानंतर बहुमत सिद्ध झाल्यानंतरच्या पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत आम्ही तो निर्णय केला व तो केंद्र सरकारने मान्य केला. म्हणून छ. संभाजीनगर नाव दिले गेले.
या कुरघोडीनंतर जेव्हा दानवेंना पुन्हा परतण्यासाठी शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या तेव्हा ठाकरे काहीतरी बोलले. त्यावर फडणवीस म्हणाले की, “बघा 2929पर्यंत आम्ही तिकडे (विरोधी) बाजूला जाण्याची संधी नाही. तुम्हालाही तिकडे विरोधी पक्षनेत्याची संधी (दानवे गेल्यानंतर) नाही. तुम्ही इकडे संधी घेण्याचा (सत्तारूढ बाकांवर येण्याचा) विचार करू शकता. आपण बोलू पण त्यावर…” या फडणवीसांच्या या खुल्ल्या उद्गारावर सभागृहात हंशा, टाळ्या उसळल्याच, पण बाहेर राजकारणातील भूकंपाच्या चाहुलीने काहींना धडधडायलाही लागले असेल. एकनाथ शिंदेंचे सहकारीही अस्वस्थ झाले असतील. त्यानंतर रात्री एका समारंभात मुख्यमंत्री पोहोचले तेव्हा आदित्य ठाकरे तिथून बाहेर पडत होते. दारातच गाठ पडली. तेव्हा आदित्य म्हणाले की, “तुम्ही ऑफर दिलीत आणि मी लगेच तुमच्या स्वागातासाठी इथे उभा आहे!” खरेच काय बोलणे झाले का? असेही आदित्यनी विचारले. म्हणजे मातोश्रीवरही हादरा बसलाच तर! मुख्यमंत्र्यांनी अर्थातच म्हटले की, जे झाले ते गंमतीत होते.

त्या गंमतीनंतर विधानभवनाच्या प्रांगणात दुसरा गंमतीदार, रंजक प्रसंग घडला. “संगीत खुर्ची मानापमान” असा तो नाट्यप्रयोगच होता. त्यानेही एकनाथ शिंदेंसह ठाकरे अडचणीत आलेले दिसले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सारे परिषद सदस्य उभे राहतात, पुढे मांडलेल्या दहा खुर्च्यांवर नेतेमंडळी बसतात व ग्रुप फोटो घेतला जातो. त्यासाठी नेहमीप्राणे परवाही खुर्च्या मांडलेल्या होत्या. परिषदेचे पीठासीन अधिकारी, विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच निवृत्त होणारे अंबादास दानवे अशांच्या खुर्च्यांची मांडणी होती. सारे बसल्यानंतर अचानक उद्धव ठाकरे तिथे आले. तसेही ते सदस्य म्हणून फोटोत अपेक्षितच होते. पण माजी मुख्यमंत्री व दानवेंच्या पक्षाचे नेते या नात्याने त्यांच्यासाठी खुर्चीही होती. पण ते आले तेव्हा एकनाथ शिंदेंच्या पलिकडच्या फक्त दोन खुर्च्या रिकाम्या होत्या. हे दोघे कट्टर वैरी बनलेले नेते आता शेजारी शेजारी बसणार की काय, या कल्पनेने सारे फोटोग्राफर कॅमेरे सरसावून तयार होते. पण शिंदे व ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलेही नाही! नीलमताई गोऱ्हेंनी तो अवघड क्षण निभावून नेला. त्या मध्ये बसल्या आणि शिंदे ठाकरेंमधील अंतर कायम राखले गेले. त्याही प्रसंगातील नेत्यांच्या छुप्या हास्यात निराळा संदेश दिला जातच होता!