यंदाच्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात 27%, बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्रात 12% तर टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
यंदा मौसमी पाऊस योग्य वेळेत चांगला सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी जोर धरला आहे. त्यामध्ये कांद्यासह टोमॅटो आणि बटाट्याचाही समावेश आहे. कृषी मंत्रालयाने केलेल्या मूल्यांकनानुसार, कांदा, टोमॅटो व बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. या वर्षी खरीप हंगामात 3.61 लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दीष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% अधिक आहे. कांद्याचे सर्वोच्च उत्पादन घेणारे राज्य असलेल्या कर्नाटकात 1.50 लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याच्या लागवडीचे उद्दीष्ट असून त्यातील 30% क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. इतर मोठ्या कांदा उत्पादक राज्यांमध्येही लागवडीचे प्रमाण चांगले आहे.
बटाटा हे रब्बी हंगामातील पीक असले तरी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये खरीप हंगामातही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा खरीप हंगामात बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात जवळपास संपूर्ण नियोजित क्षेत्रावर बटाट्याची लागवड पूर्ण झाली आहे तर कर्नाटकासह इतर राज्यांनीही बटाट्याच्या लागवडीत चांगली प्रगती केली आहे.
कृषी मंत्रालयाच्या मूल्यांकनानुसार, खरीपातील टोमॅटो लागवडीखालील क्षेत्र यंदा 2.72 लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षी 2.67 लाख हेक्टर होते. टोमॅटोचे मोठे उत्पादन घेणाऱ्या आंध्र प्रदेशातील चित्तूर व कर्नाटकातील कोलार या प्रदेशांतील पिकाची स्थिती चांगली आहे. कोलार भागात टोमॅटोच्या फळतोडणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत हा टोमॅटो बाजारात येईल. चित्तूर आणि कोलार भागातील जिल्हास्तरीय फळपिके विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा टोमॅटोच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात महाराष्ट्र आणि तमिळनाडू या टोमॅटोच्या मुख्य उत्पादक राज्यांमध्ये यंदा खरीप हंगामात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.