Homeन्यूज अँड व्ह्यूजलाकूडतोड्याही झाला होता...

लाकूडतोड्याही झाला होता रोहन बोपन्ना!

दोन दशकांपेक्षा जास्त काळ भारतीय टेनिसची सेवा करुन मोठा आधारस्तंभ असलेल्या बुजूर्ग, ४५ वर्षीय रोहन बोपन्नाने अखेर टेनिस रॅकेट टेनिस कोर्टवर कायमस्वरुपी ठेवून आपल्या व्यवसायिक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. रोहनने जरी निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी भारतीय टेनिससाठी त्याने दिलेले सर्वस्व कोणी भारतीय टेनिसप्रेमी विसरु शकणार नाही हे मात्र नक्की. खास‌‌करुन रोहनने मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरी या प्रकारांना भारतीय टेनिसमध्ये नवी ओळख करून दिली. या दोन्ही दुहेरी स्पर्धांना रोहनने एका वेगळ्या उंचीवर‌ नेऊन ठेवले. भारतात या खेळाची लोकप्रियता वाढवण्यात रोहनचा मोठा वाटा आहे. तुम्ही स्वतःला कायम तंदुरूस्त ठेवलेत आणि “अपडेट” ठेवले तर‌ वाढते‌ वयदेखील तुमच्या यशात अडथळा होऊ शकत नाही, हे रोहनने दाखवून दिले. तुमच्या शारीरिक आणि मानसिकतेची कणखर‌ परीक्षा घेणाऱ्या या खेळात वाढत्या वयातदेखील रोहनने मिळवलेल्या यशाला तोड नाही.

वयाच्या ३७व्या वर्षी रोहनने पॅरिस येथे झालेल्या फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीत गॅब्रिएला डेवोस्कीसोबत आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी २०२४च्या ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धेत रोहनने आपले दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद वयाच्या ४४व्या वर्षी पटकावले. त्याने पुरुष दुहेरीत मॅथ्यू हेडनबॅडनसोबत ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. रोहनने खासकरुन आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या टप्प्यात नवनव्या विक्रमाला गवसणी घातली. तेव्हा त्याच्या कारकिर्दीचा दुसरा टप्पा खऱ्या अर्थाने गाजला. खुर्द, मदारपूर येथून रोहनची टेनिस कारकीर्द सुरु झाली. त्याचे वडील क्रीडा‌प्रेमी असल्यामुळे त्याला टेनिस खेळण्यास कुठली आडकाठी नव्हती. छोटय़ा रोहनला घरुन सुरूवातीला भरपूर प्रोत्साहन मिळाले. वडील तर त्याच्या सरावावर सतत लक्ष ठेवून असायचे. आपले खांदे मजबूत करण्यासाठी सुरूवातीला रोहन काही काळ चक्क लाकूडतोड्याही झाला होता. फिटनेस वाढवण्यासाठी तो कॉफीच्या मळ्यात तासनतास धावत असे. हाच खडतर सराव रोहनच्या यशास मोठा कारणीभूत ठरला.

रोहनने शालेय स्पर्धांत चमक दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मग हळुहळू जिल्हा, राज्य स्पर्धांतदेखील रोहनने ‌आपल्या खेळाची छाप पाडली. पुढे मग राष्ट्रीय स्पर्धेतदेखील केलेल्या शानदार कामगिरीमुळे रोहनसाठी भारतीय टेनिस संघाची दारे खुली झाली. वयाच्या २०व्या वर्षी रोहनने व्यवसायिक टेनिसपटू होण्याचा निर्णय घेतला. आपल्या दोन दशकांच्या वाटचालीत रोहनने दोन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या, तर सहा ग्रँड स्लॅम स्पर्धेत रोहनला प्रत्येकी तीनवेळा पुरुष दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २६ एटीपी स्पर्धेत त्याने जेतेपद मिळवले. आफ्रो आशियाई आणि आशियाई क्रीडा‌ स्पर्धेत त्याने प्रत्येकी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ६ “एटीपी मास्टर्स वन थाऊजन” स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. २०१२, १६, २४च्या ऑलिंपिक स्पर्धेत रोहनने भारताचे प्रतिनिधीत्व केले. दुर्दैवाने ऑलिंपिक पदकाचे रोहनचे स्वप्न थोडक्यात हुकले. २००२पासून नियमित मानाच्या डेविस चषक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्याचा दुहेरीतील पहिला सहकारी श्रीराम‌ बालाजी होता, तर मिश्र दुहेरीत भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा‌ होती. सुरूवातीच्या काळात बरीच वर्षे त्याचा दुहेरीतील सहकारी पाकिस्तानचा एहसान उल हक्क कुरेशी होता. ते भरपूर स्पर्धा एकत्र खेळले. अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धेत त्यांनी फायनलपर्यंत मजल मारली होती. विश्व क्रमवारीत अव्वल पाच जोड्यांमध्ये या दोघांनी स्थान मिळवले होते. पुढे “इंडो-पाक एक्सप्रेस‌” या टोपण‌ नावाने ही जोडी टेनिस विश्वात ओळखली जात होती.

यंदा ऑगस्टमध्ये झालेली लॉस एंजलिस मास्टर्स स्पर्धा रोहनच्या व्यवसायिक कारकिर्दीतील शेवटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. या स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आपल्या कारकिर्दीत त्याने एकूण ५३९ सामने जिंकले तर ४१० लढतीूत तो पराभत झाला. डेविस चषक स्पर्धेत त्याने १० एकेरी आणि १२ दुहेरी सामन्यात विजय मिळवला. आक्रमक सर्विस, “नेट प्ले”मधील त्याचे कौशल्य, कणखर मानसिकता ही खेळातील रोहनची खरी ओळख होती. खिलाडूवृत्तीचा मोठा गुण त्याच्या अंगी बाणला होता. “जय असो अथवा पराजय”, त्याची‌ फिकीर रोहनने कधी केली नाही. विनयशिलता, सकारात्मकता, प्रतिस्पर्धी खेळाडूबाबत नेहमी आदराची‌ भावना हेच त्याचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच त्याने टेनिस विश्वात सर्वांचा आदर‌‌ संपादन केला. अनेकदा दुखापतींवर मात करीत त्याने कम बॅक केले. खराब फॉर्म, दुहेरीतील‌ बदलेले सहकारी, या आव्हानांचा यशस्वी मुकाबला करत नवनवे अध्याय त्याने लिहिले. भारतातील अनेक युवा खेळाडूंचा तो आयकॉन बनला. आपल्या या खडतर वाटचालीत रोहनने नेहमी आपला लढाऊ बाणा दाखवला. त्यामुळे ऑलिंपिक, आशियाई क्रीडा‌, डेविस‌‌ चषक स्पर्धा यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना दुखापतग्रस्त असतानादेखील त्याने आपले ‌शंभर टक्के योगदान दिले. भारतीय टेनिसला त्याने नवी ऊर्जा, नवी ताकद दिली. पत्नी सुप्रिया, कन्या त्रिधा, बहिण रश्मीने त्याला कठीण समयी मोलाची साथ दिली. त्यामुळे त्यांचे तो नेहमी आभार मानतो. आपण या खेळाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून त्यांने काही वर्षांपूर्वी “बोपन्ना टेनिस डेव्हलपमेन्ट फाऊंडेशन” सुरू केले. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याने अनेक युवा खेळाडूंना मदतीचा हात पुढे केला. मार्गदर्शन केले. प्रशिक्षण दिले. या खेळातील त्याचे योगदान बघून केंद्र सरकारने रोहनला अर्जुन, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. भविष्यात अखिल भारतीय टेनिस महासंघ त्याच्या योगदानाची दखल घेऊन रोहनचा उचित गौरव करेल अशी आशा करुया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मूकबधिरांपासून सर्वांना हवेहवेसे वाटणारे ‘मल्लखांब लव्ह’!

आशिष देवल, संचिता पाटील-देवल या राष्ट्रीय मल्लखांब खेळाडूंनी अस्सल मराठमोळ्या सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असलेल्या मल्लखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आठ वर्षांपूर्वी‌ मुंबईत बोरिवलीत "मल्लखांब लव्ह"ची सुरूवात केली. या दोघांचे गुरु असलेले मल्लखांबसम्राट दत्ताराम दुदम यांचे स्वप्न होते, ज्याप्रमाणे क्रिकेट हा...

तिसऱ्या प्रयत्नात भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास!

हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने आपल्या लाखो चाहत्यांना दिवाळीनंतर लगेचच पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्याची आगळी...

बॅडमिंटनमधले तपस्वीः मनोहर गोडसे!

बॅडमिंटन आणि मनोहर गोडसे यांचे एक अतूट नातं आहे, जे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुटूच शकत नाही. बॅडमिंटन हा जणू काही गोडसे यांचा श्वास आहे, असेच म्हणावे लागेल. नुकतेच वयाच्या ८६व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या गोडसे यांनी तब्बल सहा दशकांपेक्षा जास्त...
Skip to content