Homeब्लॅक अँड व्हाईटउंचावत चाललेल्या इमारती...

उंचावत चाललेल्या इमारती आणि आकसणारे अंगण!


माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!, या माझ्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या सकारात्मक अशा होत्या. गरजेनुसार जीवनशैली बदलत जाते. प्राधान्यक्रम बदलत जातात. नव्या पिढीला आवश्यक ते बदल होतात. या बदलांना सामोरे जात आयुष्य सुखावह कसे करता येईल एवढे बघितले की पुरे. निरीक्षण आणि विश्लेषण हा माझा छंद असल्यामुळे आजूबाजूला घडत असलेल्या घडामोडींचा मी आढावा घेत असतो. पुणे शहरात मी राहायला आलो त्याला साठ वर्षे होऊन गेली. गावात असताना नदीच्या काठावर जाऊन नितळ पाण्यात पाय टाकून बसणे किंवा साठलेल्या डबक्यात दगड टाकल्यावर टपकन् उड्या मारुन सटकणारे बेडूक बघणे हाही मोठा आनंद होता. पुढे पुण्यात नदीच्या काठावर कधीतरी बसण्याचा योग आला. आता मुठा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी भिंती आहेत. पण तिथे बहुधा कुठल्यातरी वस्तूंची विक्री सुरु असते. एकंदर सगळा गर्दीचा प्रकार. भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला कादंबरीत पुण्याचा उल्लेख आहे तो मुख्यतः उपरोधिक असा आहे. इथले लोक एकावर एक असलेल्या मजल्यांच्या घरात राहतात असे नेमाडे म्हणतात. मला आठवते तसे शनिवार पेठेत एका घरात दुसऱ्या मजल्यावर माझा मोठा भाऊ जो पुण्यात नुकताच आला होता तो राहत होता. तिथे पाटा-वरवंटा होता. पण त्यावर काही वाटले की खाली आवाज खाली जात असे. दोन मजल्यांची घरे फारशी नव्हती. त्याच शनिवार पेठेत काॅसमाॅस बँकेने एक इमारत बांधली ती सात मजली. ही इमारत बघण्यासाठी लोक शहराच्या अनेक भागातून येत असत. आता परिस्थिती झपाट्याने बदलली. एफएसआय नावाचा शब्द आला आणि हवे तेवढे बांधकाम करण्याची सुविधा उपलब्ध झाली. नंतर रीडेव्हलपमेंट हा शब्द आला. सतत बदलत जाणारे नियम आणि पळवाटा आल्या. आता शहरात आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती उभ्या राहत आहेत. ही वाढ आगामी काळात कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही. पण शहराचा सांस्कृतिक ढाचा बदलत आहे हे लक्षात येते.

नव्या एफएसआयच्या उपलब्धतेनुसार पूर्वीच्या चार घरांच्या जागी बारा घरे असा हिशेब आहे. या घरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची कुटुंबे राहयला येत आहेत. कोट्यवधी रुपयांचे घर असेल तिथे लाखो रुपये किंमतीची कार असणारच. अधिक सुबत्ता असेल तर एकापेक्षा अधिक कार असणार. त्या उभ्या करण्यासाठी जागा अपुरी असल्यामुळे एकावर एक गाड्या उभ्या करता येतील अशी लोखंडी कांबांची पार्किंग. इमारत उंच असल्यामुळे वर जाण्यासाठी लिफ्ट हवीच. या परिस्थितीत लिफ्ट तयार करणाऱ्या कंपन्या श्रीमंत झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. त्यातही सातत्याने बदल होत आहेत. चाळीस वर्षांपूर्वी पुण्यात उंच असलेल्या सरकारी इमारतीत महाराष्ट्राचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री लिफ्टमध्ये अर्धा तास अडकून घामाघूम झाले होते. अगदी अलिकडेदेखील तशी परिस्थिती आली होती. मुंबईत आमदारांचे हंगामी निवासस्थान असलेल्या मनोरा इमारतीत बिघडलेल्या लिफ्टमध्ये घुसण्याचा प्रताप मी स्वतः केला होता. तेव्हा लिफ्ट प्रत्येक मजल्यावर फक्त डोकावून वरखाली करत होती. अखेर एका अनोळखी मजल्यावर थांबली तेव्हा हायसे वाटून मी बरेच जिने उतरुन खाली आलो होतो. आता मात्र बहुतेक ठिकाणी स्वयंचलित लिफ्ट आल्या आहेत. अर्थात त्यांनादेखील बिघडण्याचा पर्याय असतो. पण त्या बिघडताना जवळच्या मजल्यावर नेऊन सोडतात.

इमारती

होत असलेला बदल माझ्या लक्षात येतो तो म्हणजे गरजेनुसार घरांच्या आतील बाजूचा आकार वाढत आहे. नारायण पेठेत एका चाळवजा इमारतीत पन्नास वर्षांपूर्वी जाणे होत असे तेव्हा आत स्वयंपाकघर आणि बाहेर एक खोली हा परिसरदेखील खूप वाटत असे. शिवाय घरात एक मोरी असायची. अशी काही घरे कायदेशीर अडचणी असल्यामुळे तशीच आहेत. पण जिथे संधी आहे तिथे घरे आतल्या बाजूने विस्तारत आहेत असे दिसते. पुण्यात किंवा तत्सम शहरांत अशा मोठ्या घरांना अधिक मागणी आहे. ही गेल्या आठवड्यात वाचलेली बातमी. अशाच एका विस्तारित घरी गेलो होतो तेव्हा जो बदल लक्षात आला तो मनात टिपून ठेवला. गप्पा आणि भोजन असा कार्यक्रम होता. आधी पत्ता शोधावा लागला. नंतर मोटार उभी करण्यासाठी जागा शोधली. तो कोणाच्या कंपाऊंडच्या समोर येता कामा नये. इमारतीत अगोदरच अनेक मोटारी उभ्या. मग मोटार उभी करुन आत हळूहळू गेल्यानंतर एक अरुंद वाट लिफ्टच्या दिशेने जात होती. तेथून आत गेल्यानंतर लिफ्ट गवसली.

इमारत छोट्या आकाराच्या जमिनीवर असल्यामुळे लिफ्ट साधारण सहा माणसांना पुरेल एवढी. लिफ्टमधून वर गेल्यानंतर आपल्याला हवा तो मजला आला आणि तिथे समोरासमोर फक्त दहा फुटांच्या अंतरात एकूण चार दरवाजे. शिवाय खालून येणारा जिना. त्याचा वापर त्या तुलनेत कमी, पण चारही घरांच्या दरवाज्यात चपला आणि बुटांचा खच. अर्थात बरीच माणसे आलेली असतील तेव्हा. पण आकसलेल्या या परिसराचे महत्त्व आता फारसे उरलेले नाही. रेल्वेत अरुंद दरवाजातून धडाधड माणसे आत आल्यानंतर चलाखी दाखवणारे हवी ती जागा पकडतात, बाकीचे मिळेल तो कोपरा पकडतात. तसे या नव्या घरांमध्ये शिरण्याच्या आधी बरीच कसरत करावी लागते. आधी उभ्याउभ्या चप्पल किंवा बूट काढून ठेवणे मोठा उद्योग. आत गेल्यानंतर मात्र बराच मोठा असा दिवाणखाना आणि तिथे असलेले छान सोफे लक्ष वेधून घेतात. भितींची रंगसंगती मनाला भावते. नवे घर असेल तर आपण सगळा परिसर बघतो. एक मास्टर बेडरुम (म्हणजे नेमके काय?), नंतर आणखी दोन बेडरुम आणि मधोमध स्वयंपाकघर.

माझ्या नजरेत या गोष्टी बसतात तसे स्वयंपाकघरदेखील आकसत चालले आहे असे वाटते. अर्थात खेड्यापाड्यात असायची तशी भलीमोठी स्वयंपाकघरे आता शक्य नाहीत, तरीही आठदहा फूट रुंदीच्या स्वयंपाकघरात तीन चार माणसांना एकाचवेळी वावरताना गर्दीचा अनुभव येऊ शकतो. पण मधोमध स्वयंपाकघर असल्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवता येते हा एक फायदा.
म्हणजे घरातील इतर परिसर विस्तारित होत असताना अंगण मात्र बारीक होत आहे एवढे खरे. परिणाम असा की, रांगोळी काढायची तरी एका कोपऱ्यात भिंतीला खेटून काढावी लागते. जिन्याच्या बाजूला जे घर आहे तिथे रांगोळी काढण्याची संधीच नाही. शिवाय सणवारी रांगोळी काढावी तेव्हा माणसे घरी आली तर रांगोळीचे भवितव्य फारसे चांगले नाही. आणि अंगण आकसले तसे पडवी नावाचा प्रकार उरलाच नाही. अन्यथा खेडोपाडी जुन्या घरांमध्ये मागच्या बाजूच्या पडवीच्या पलीकडे छानसे तुळशीवृंदावन असायचे. अजूनही अनेक ठिकाणी आहे. भगिनीवर्ग अंघोळ उरकल्यावर तिथे पाणी देऊन मग स्वयंपाकघरात येत असत. तुळशीचा मंद आणि थंडावा देणारा गंध अंगावर थोडासा रोमांच पसरवीत असे. मग त्या उत्साहात रांगोळीची रचना होत असे.

आता तुळशीला स्वतःची जागा उरली नाही. पण बाल्कनी नावाच्या जागेत इतर रोपट्यांच्या सहवासात ती कुठेतरी अंग चोरुन बसलेली दिसते. पण आवर्जून आणली जाईल असे नाही. आणि त्या बाल्कनीत प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये पाणी घालताना ओघळ खाली जाणार नाहीत याची मात्र काळजी घ्यावी लागते. अर्थात आकसलेल्या अंगणात पाहुणे येतील तेव्हा चपलांचा खच असतो ती वेळही भारी असते. माणसांचा वावर हवाच. आपले प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे की.. आपल्या दारात जो चपलांचा खच असतो ती खरे तर आपली खरीखुरी श्रीमंती असते. कारण आपल्या सहवासात जेवढी माणसे, तेवढे आपण श्रीमंत…

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व लेखक आहेत)

संपर्कः 99604 88738

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!

माझ्यासाठी कोकण म्हणजे ज्याला तळकोकण म्हणतात ते किंवा जे समुद्राच्या किनाऱ्यावर नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग हेही कोकणच. पण किनारपट्टीचा विचार केला तर पार केरळपर्यंत कोकण आहे. पण संस्कृती, सण सगळीकडे एकसारखे नाहीत. मी मुख्यतः हा विषय मांडतो...

मुंबई मराठी माणसाचीच! पण मराठी माणूस ठाकरे बंधूंचा आहे का?

मुंबई आणि मराठी माणूस हे नाते भावनिक आहे. या भावनिक नात्यावर गेली कित्येक वर्षे मुंबईचे राजकारण चालते. देशात जो राजकीय कल असतो तो मुंबईत लोकसभा निवडणुकीत परावर्तित होतो. अपवाद गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा. त्या निवडणुकीत ठाकरे यांच्या पाठीशी असलेल्या...

मुलामुलींसाठी आधी करिअर की लग्न?

मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं (विवाह) त्या माध्यमातून जमले. दोन दिवसांपूर्वी कोणा जाणकार व्यक्तीने विवाहाचे वय किती असावे, म्हणजे किती...
Skip to content