Homeमुंबई स्पेशलवरील विनंतीस मान...

वरील विनंतीस मान देऊन.. १५ दिवसांत कल्व्हर्ट मोकळे!

मध्य रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनंतर मुंबई महापालिकेने आपल्या क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंडदरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाहमार्गांतला (कल्व्हर्ट) गाळ अवघ्या १५ दिवसांत काढून दिला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या प्रकारची कामे संबंधित खात्यांमार्फत पूर्ण करण्यात येतात. मुंबई महानगर क्षेत्रातील नाल्यांमधील गाळ काढून स्वच्छता करण्याची कामे प्रामुख्याने मुंबई महापालिका करते. त्याचप्रमाणे तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची तसेच रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाहमार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येऊ नये, यासाठी ही स्वच्छता अतिशय महत्त्वाची ठरते.

मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. त्यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१, मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाहमार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते तर बंदिस्त प्रवाहमार्गातील गाळ काढून स्वच्छ्ता करणे आव्हानात्मक असते.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोह मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाहमार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई महापालिका प्रशासनाला अलीकडे झालेल्या पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत विनंती केली होती. मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाहमार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याकारणाने त्यांनी महापालिकेला हे काम करण्यासाठी विनंती केली.

महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू ह्यांनी रेल्वे प्रशासनाची विनंती मान्य केली. त्यानुसार, पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याने तातडीने कार्यवाही सुरू केली. पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करून या १८पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.

ह्या १५ कल्व्हर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मस्जिद स्थानकदरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ, करी रोड ते परळदरम्यान, परळ ते दादरदरम्यान जगन्नाथ भातमकर पुलाखाली, दादर ते माटुंगादरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीव (सायन)दरम्यान, शीव ते कुर्लादरम्यान, कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ, कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ, भांडुप ते नाहुरदरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला आणि मुलुंड ते ठाणेदरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला या ठिकाणच्या कल्व्हर्टची स्वच्छता करण्यात आली आहे.

विद्याविहार ते घाटकोपरदरम्यान जॉली जिमखाना लगत, विक्रोळी ते कांजूरमार्गदरम्यान विक्रोळी स्थानकाजवळ आणि कांजूरमार्ग ते भांडुपदरम्यान दातार नाला ह्या तीन बंदिस्त प्रवाह मार्गाच्या ठिकाणी संयंत्र पोहोचू शकत नसल्याने तेथील रेल्वे रुळाखालून प्रवाहमार्ग स्वच्छतेचे काम स्वतः रेल्वे प्रशासनाकडून मनुष्यबळ नेमून केले जात आहे.

१९ मे रोजी सुरू झालेली ही कार्यवाही ४ जूनला म्हणजेच अवघ्या १५ दिवसात पूर्ण झाली आहे. पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता एल. कमलापूरकर, उपप्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे, सहाय्यक अभियंता राजेश यादव आदींनी याकरीता विशेष परिश्रम घेतले.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content