आधुनिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करताना, भारतीय रेल्वेस्थानके आपली ‘जुनाट आणि सुविधांचा अभाव’ अशी प्रतिमा मागे सोडून उत्कृष्ट स्थानकांच्या नव्या युगाकडे प्रवास करत आहेत. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या दूरदर्शी विकास प्रयत्नांची प्रशंसा केली. कोल्हापूर रेल्वेस्थानकाच्या इमारतीच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ह्या शहराची ऐतिहासिक वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली तसेच अत्यंत सुयोग्यपणे सामावून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

रेल्वेच्या इतिहासात, एक ऐतिहासिक मैलाचा दगड स्थापन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, आभासी माध्यमातून देशभरातील 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली आहे. 24,470 कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेल्या या व्यापक पुनर्विकास योजनेत महाराष्ट्रातील 44 स्थानकांसह 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील स्थानकांचा समावेश आहे.

भारतीय रेल्वेचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, प्रकाश उपाध्याय यांनी, सर्वसमावेशक पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे उपस्थितांसामोर पुनर्विकासाचा आराखडा प्रभावीपणे मांडत सुधारित कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठीचा व्यापक दृष्टीकोन सांगितला. स्थानकाच्या नव्या आराखड्यात प्रवाशांचा सुखद सोयी सुविधांचा अनुभव देण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.
यात, प्रशस्त पोर्टिको, 12-मीटर लांबीचा पादचारी पूल, लिफ्ट, रॅम्प आणि एस्केलेटर यासारख्या दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा यांचा समावेश आहे. तसेच गाडीची माहिती प्रणाली दर्शवणारी आधुनिक व्हिडिओ डिस्प्ले युनिट्सही असतील.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाणारे आदरणीय स्वातंत्र्यसैनिक कलगौडा पाटील आणि वसंतराव माने यांचा सत्कारही यावेळी झाला.

उत्सवाचा एक भाग म्हणून, विविध शाळांमध्ये आयोजित, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आल्याने कार्यक्रमाला तरुणांच्या सर्जनशीलता अनुभवता आली. याशिवाय अनेक शाळांनी एकता आणि आनंदाची भावना व्यक्त करत स्फूर्तीवंत गाणी आणि नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.


मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वैद्यकीय विभागाने या समारंभात उपस्थितांच्या आरोग्याची काळजी घेत प्रथमोपचार बूथची व्यवस्था करून प्रवाशांच्या कल्याणासाठी आपली बांधिलकी सिद्ध केली. यावेळी विभागीय वित्त व्यवस्थापक राहुल पाटील तसेच श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरचे स्टेशन मास्तर विजय कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

भारतीय रेल्वेस्थानकांची पुनर्कल्पना, नागरिकांसाठी अखंड आणि सोयीचे वाहतूक जाळे तयार करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. विमानतळ, रस्ते आणि रेल्वे यांचा एकत्रितपणे विकास केला जात आहे, प्रवासात क्रांती घडवून आणली जात आहे आणि एकूणच जीवनमानाचा दर्जा सुधारत आहे.