राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श वस्तुपाठ ठरेल, असे हे पुस्तक.. पी. परमेश्वरन यांनी लिहिलेलं ‘मार्क्स आणि विवेकानंद’ हे पुस्तक. या दोन्ही महापुरुषांच्या समर्थकांनी, विरोधकांनी आणि तटस्थ अभ्यासकांनीही अवश्य वाचायला हवे!
कार्ल मार्क्स आणि स्वामी विवेकानंद. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक विचारविश्वात आमूलाग्र क्रांती घडवून आणू पाहणारे दोन महापुरुष! त्या दोघांमधील अंतर दोन ध्रुवांमधील अंतरासारखेच.. आणि तरी त्या दोघांच्याही कार्यकर्तृत्वाला तेजोवलय लाभले. त्या दोन तेजोवलयांची विचारप्रवर्तक तौलनिक चिकित्सा करणारे हे दुर्मिळ पुस्तक आता पुन्हा एकदा वाचकांना सादर..
मार्क्स आणि विवेकानंदंनी या दोघांचीही जडणघडण कशी झाली; कुणाकुणाचा, कसकसा प्रभाव त्या दोघांवर पडला; त्या दोघांच्या आयुष्याचा प्रवाह कसा पुढे पुढे जात राहिला; त्या दोघांची जगाकडे पाहण्याची दृष्टी कशी होती; जग बदलण्यासाठी कोणत्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार त्या दोघांनी केला; साम्यवाद आणि राष्ट्रवाद यांच्याबद्दलच्या त्या दोघांच्या भूमिका काय होत्या; त्या दोघांच्या धर्मविषयक संकल्पनांमध्ये कोणता फरक होता; भारताच्या पूर्वेतिहासाबद्दल आणि भवितव्याबद्दल त्या दोघांचे काय म्हणणे होते.. या आणि अशा आणखीही काही प्रश्नांच्या आधारे विवेकानंद केंद्राचे भूतपूर्व अध्यक्ष पी. परमेश्वरन यांनी लिहिलेल्या आणि जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार चं. प. तथा बापूसाहेब भिशीकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती.
हे पुस्तक इंग्रजीत १९८७मध्ये प्रसिद्ध झाले. मराठीत १९९३मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. सध्याची सुधारित आवृत्ती जुलै २०२५मध्ये प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर यांनी तर नवीन मराठी आवृतीची प्रस्तावना कम्युनिस्ट विचारधारेचे गाढे अभ्यासक आणि लेखक डॉ. अशोक मोडक यांनी लिहिली आहे. या दोन्ही प्रस्तावना अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहेत. एकूण ११ प्रकरणांतून अत्यंत अभ्यासपूर्णपणे लिहिलेले हे पुस्तक वैचारिक साहित्य वाचणाऱ्यांसाठी, विविध विषयांवर बोलणाऱ्यांसाठी मेजवानीच आहे.

न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर आपल्या प्रस्तावनेच्या शेवटी लिहितात- “मार्क्सचे मानवतेवर प्रेम होते आणि सामाजिक अन्यायाचे ते कडवे विरोधक होते. काही थोर माणसे जग हादरवून सोडतात, तर काही जगाला आकार देतात. एकाचवेळी जगाला हादरे देणाऱ्या व आकारही देणाऱ्या पुरुषोत्तमांचा आढळ क्वचितच होतो. मार्क्स सार्वदेशिक होते आणि सर्वत्र त्यांचा प्रभाव प्रत्ययास आला. शिकागो येथील धर्मपरिषदेत केलेल्या पहिल्याच भाषणाने विवेकानंद तिथे एखाद्या बाँबगोळ्यासारखा दणका उडवून गेले. आता त्यांच्या मानवतावादाचे धडे खुद्द मॉस्को विद्यापीठातही श्रवण केले जात आहेत. एका शतकापूर्वीच्या परस्परांपासून भिन्न असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वांची नीट समज येण्यास परमेश्वरन यांच्या या लेखनाचा फार उपयोग होईल. या दोघांनीही जगाला धक्का दिला आहे व आकारही दिला आहे.”
प्रथम आवृत्तीचे संपादक आनंद हर्डीकर यांनी लिहिले आहे- “पी. परमेश्वरन यांच्या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांचा अफाट व्यासंग जसा सर्वच्यासर्व अकरा प्रकरणांच्या शेवटी दिलेल्या संदर्भटिपांवरून सहज लक्षात येण्यासारखा आहे, तसाच तो पानोपानी विखुरलेल्या नेमक्या उद्धरणांमुळेही जाणवण्यासारखा आहे. तो एकसुरी, एककल्ली, एकाक्ष अजिबात नाही. ज्या दोन क्रांतिकारक महापुरुषांची त्यांनी तौलनिक चिकित्सा केली आहे, त्या दोघांचे समग्र साहित्य तर त्यांनी अभ्यासलेले आहेच, पण त्या त्या महापुरुषांच्या समर्थकांनी आणि विरोधकांनी काय काय लिहून ठेवले आहे, याचाही धांडोळा त्यांनी घेतला आहे.”
नवीन मराठी आवृतीची प्रस्तावना डॉ. अशोक मोडक यांनी लिहिली आहे. प्रस्तावनेचा शेवट त्यांनी चं. प. भिशीकर यांनी लिहिलेल्या अनुवादकाच्या मनोगतातला एक उतारा देऊन केला आहे.
“विवेकानंदांचा जगावर पडलेला प्रभाव उत्तरोत्तर वर्धिष्णू होत आहे, तर मार्क्सवादी विचारातली मूलभूत अपूर्णता मान्य करण्यास परिस्थितीनेच भाग पाडले आहे. रशियातील क्रांती आणि तेथील श्रमिकांची हुकूमशाही ही मार्क्सवादाची प्रयोगशाळा होती. त्या प्रयोगाचे कोणते धिंडवडे निघाले, हे आपण पाहतोच आहोत. स्वामीजींचा आग्रह होता की, हिंदू जीवनदर्शनाची प्रयोगशाळा भारतच राहणे अपरिहार्य आहे. तेव्हा आधुनिक भारताने जागृत होऊन आपल्या आदर्शानुसार लोकजीवन उभे करून दाखविले पाहिजे. भारताच्या जागृतीचा आणि येऊ घातलेल्या मंगल पुनरुत्थानाचा आशावादी उल्लेखही त्यांच्या लिखाणात आढळतो.”
मार्क्स आणि विवेकानंद
लेखक: पी. परमेश्वरन
अनुवाद: चं. प. भिशीकर
प्रकाशक: विवेकानंद केंद्र
मूल्य- २५० ₹. / पृष्ठे- २२८
सवलत मूल्य- २२० ₹
कुरिअर खर्च- ५० ₹.

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)