महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता फक्त मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवर अवलंबून न राहता महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणी करणार आहेत. याचसाठी राज ठाकरे येत्या ४ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या सत्तेतील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच राज्यभरातून आपल्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. त्यानंतर ठाकरे परदेशात गेले होते. १५ दिवसांनी
आल्यानंतर त्यांनी या अहवालाचा अभ्यास केला. पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणाही केली. येत्या विधानसभा निवडणुकीत २००पेक्षा जास्त जागा लढविण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.
एरव्ही राज ठाकरे किंवा त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे मुंबईबाहेर पडल्यास मुणे आणि नाशिकपर्यंतच जाता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर मनसेचे कार्यकर्ते व या हल्लाप्रकरणातील आरोपी जय मालोकर यांच्या मृत्त्यूनंतर अमित ठाकरे यांचे अमरावतीला जाणे झाले इतकेच लक्षात राहणारी बाब आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय कक्षा आता रुंदावत आहेत, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.