मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या प्रकाश पुराणिक स्मृती महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फौंडेशनने अजिंक्यपद पटकाविले. प्रारंभी ३ बाद १५ धावा अशा ढासळलेल्या डावानंतर अष्टपैलू पूनम राऊत (नाबाद ९७ धावा) व मंजिरी गावडे (नाबाद ५८ धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी १५६ धावांची अभेद्य भागिदारी केल्यामुळे दिलीप वेंगसरकर फौंडेशनने बलाढ्य भामा क्रिकेट क्लबचा १८ धावांनी पराभव केला. अंजू सिंग, कृतिका कृष्णकुमार आदींनी प्रयत्नांची शर्थ करूनही भामा क्रिकेट क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
एसपीजी खेळपट्टीवर भामा क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून वेंगसरकर फौंडेशनला प्रथम फलंदाजी दिली. चौथ्या षटकाला आघाडीचे ३ फलंदाज अवघ्या १५ धावांत पॅव्हेलीयनमध्ये पाठवून तुशी शाह (२० धावांत २ बळी) व कृतिका यादव (२५ धावांत १ बळी) यांच्या मध्यमगती माऱ्याने वेंगसरकर फौंडेशनला प्रारंभी हादरविले. परंतु त्यानंतर शतकाकडे कूच करणाऱ्या पूनम राऊत (५३ चेंडूत नाबाद ९७ धावा, ११ चौकार व २ षटकार) व मंजिरी गावडे (४८ चेंडूत नाबाद ५८ धावा, ७ चौकार) यांनी चौथ्या विकेटसाठी १५६ धावांची शानदार भागीदारी करून भामा क्लबच्या ७ गोलंदाजांना जेरीस आणले. परिणामी वेंगसरकर फौंडेशनने मर्यादित २० षटकांत ३ बाद १७१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भामा क्लबच्या विकेट ठराविक अंतराने मिळविण्यात वेंगसरकर फौंडेशनच्या अदिती सुर्वे (२४ धावांत २ बळी), रेश्मा नायक (१९ धावांत २ बळी), फातिमा जाफर (३८ धावांत २ बळी), पूनम राऊत (३१ धावांत २ बळी) आदी गोलंदाजांना यश लाभले. त्यामुळे भामा क्लबला २० षटकात ८ बाद १५३ धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. अपवाद मात्र अंजू सिंग (२२ चेंडूत ४० धावा) व कृतिका कृष्णकुमार (२५ चेंडूत ३३ धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करून डावाच्या मध्याला भामा क्लबच्या विजयी आशा पल्लवित केल्या होत्या. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पूनम राऊत, उत्कृष्ट फलंदाज वृषाली भगत, उत्कृष्ट गोलंदाज अदिती सुर्वे ठरले. उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार मानसी तिवारी व स्वरा जाधव यांनी पटकाविला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारतीय संघाचा माजी कसोटीपटू प्रविण आमरे, एमसीएचे सचिव डॉ. उन्मेष खानविलकर, संयुक्त सचिव निलेश भोसले, खजिनदार अरमान मलिक, क्रिकेटप्रेमी प्रदीप पालशेतकर आदी मान्यवर तसेच एसपीजी व एमजेएससी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

