Homeब्लॅक अँड व्हाईटमाणसे हवी आहेत.....

माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!

माझ्यासाठी कोकण म्हणजे ज्याला तळकोकण म्हणतात ते किंवा जे समुद्राच्या किनाऱ्यावर नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग हेही कोकणच. पण किनारपट्टीचा विचार केला तर पार केरळपर्यंत कोकण आहे. पण संस्कृती, सण सगळीकडे एकसारखे नाहीत. मी मुख्यतः हा विषय मांडतो आहे तो माझ्या गावचा किंवा आसपासच्या गावांचा. माझे एक पुस्तक या विषयावर प्रकाशित झाले. त्याचे शीर्षक आहे “होल्टा”. “होल्टा” म्हणजे बांबूचे किंवा लाकडाचे दांडके. हे दांडके आंबे, रातांबे, आवळे अशी फळे पाडण्यासाठी वापरणे आणि ती आंबटचिंबट फळे खाणे हा अनुभव आजही नवी पिढी घेत असेल. तर मुद्दा असा की, मी गाव सोडून साठ वर्षे झाली. आता मी काही गावाला जाऊन राहयचा नाही. तरीही गावात उत्सव असतो तेव्हा जाणे होते, पण दोन दिवसांत परत येण्याची ओढ लागते. परत आलो की, पुन्हा जावेसे वाटते. पण परिस्थिती जरा वेगळी आहे. सगळी गावे ओस पडली आहेत असे नाही, पण शहराकडे वाढलेला ओढा किंवा नाईलाज म्हणून गावाची लोकसंख्या कमी होते आहे. तरीही पूर्वीच्या तुलनेत लोकसंख्या अधिक आहे, पण कोकणचे सांस्कृतिक स्वरुप बदलते आहे एवढे खरे.

मुख्यतः रत्नागिरी जिल्ह्यात हे जाणवते आहे. महामार्गाच्या लगत असलेल्या गाव किंवा छोट्या शहरात गर्दी दिसते. पण आतल्या बाजूला गेलात तर माणसे शोधावी लागतात. तरीही पूर्वी गावाच्या जवळच्या रस्त्यावरुन रोज जाणाऱ्या एसटी आणि अन्य मोटारी यांची संख्या वाढली असली तरी शहरांमध्ये वाहनांच्या रांगा दिसतात तशा कोकणात नाहीत. मी कधीकधी जातो गावात, पण चाळीस वर्षांपूर्वी जसा अचानक जायचो तसा आता जात नाही. मुळात माझेच घर गावात राहिलेले नाही आणि जिथे हक्काने जात असे तिथेही आता नव्या पिढ्या आल्या, पण एकूण वावर बराच कमी झाला. माझ्या आजोळी राजापूरच्या जवळ असलेल्या तिठवली गावात शंभर वर्षांपूर्वी बांधलेले दगडमातीचे घर होते. तिथे घराच्या वरच्या बाजूला काजूची बाग होती. नैसर्गिक वातावरणात वाढलेली. उन्हाळ्यात सगळ्या ठिकाणांहून पोरं यायची. पाण्यासाठी छोटा पाट होता. त्या पाटाला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कोंडातून पाणी येत असे. या पाण्यावर चार पिढ्या तगल्या. फारसे उत्पन्न नसूनही कितीही पाहुणे येऊन जात. दुपारच्या वेळी आलेला अतिथी भोजन करुन वामकुक्षी आटोपून, दुपारचा चहा घेऊनच बाहेर पडत असे. कोणाचे तरी नाव सांगून कोणीतरी जेवून गेल्याचेदेखील अनुभव आहेत. सुट्टी संपवून परत जाताना चुलीत भाजलेले काजूचे काळेपांढरे तुकडेदेखील भेट म्हणून आणलेले आठवतात, तर कधी राजापुरात एसटीपर्यंत डोक्यावर भलामोठा फणस घेऊन आलेला रामा मला आठवतो.

कोकण

आज कोकण बदलत आहे आणि काही काळाने खरोखरच गंभीर परिस्थिती होईल अशी भीती लोकांना वाटते आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जमिनींचे भाव असा विषय सुरु झाला आहे. आंब्याच्या बागाच्या बागा खरेदी करण्यासाठी देशभरातील लोक येऊ लागले आहेत. विशेषतः सरकारी महामंडळाचे रिटायर्ड अधिकारी, अन्य उद्योगात सफल होऊन श्रीमंत झालेले लोक, राजकारणी यांनी जमिनी घेण्यास सुरुवात कधीच केली आहे. जमिनी विकून श्रीमंत झालेल्यांना पैशांची ऊब मिळाली आहे तर तिथेच अनेक एजंट तयार झाले आहेत. विकास पैसा आणतो, पण समस्यादेखील आणतो. कोकण रेल्वे झाली तेव्हा लोकांना कवडीमोल पैसे मिळाले. एकरी वीस हजार वगैरे.. पण काहींना नोकरीच्या संधी मिळाल्या. तिथे सुबत्ता आली. काही ठिकाणी भरपूर जमिनी गेल्या आणि पैसादेखील भरपूर आला, पण कौटुंबिक वाददेखील आले.

आज कोकणात काही राजकारणी आणि काही संस्था, संघटना जागृती करताना दिसत आहेत. सरकारी प्रकल्प आला तर गोष्ट वेगळी, पण जमिनी ताब्यात घेऊन भविष्यात काही करायचे असे नियोजनदेखील आहे. अर्थात नव्या ठिकाणी जाऊन, पैसे गुंतवून पक्की मांड बसवणेदेखील सोपे नाही. तशा एका राजकारणी माणसाने शेकडो एकर जमीन घेऊन आंबा लावला होता, पण काही वर्षांनी झाडे जळून गेली. जुन्या पिढीचे मार्गदर्शन घेऊन स्थानिक पातळीवर तरुण बरेच प्रयत्न करीत आहेत. आता कोकणात फक्त एसटी नाही, मोटारीपण आल्या आहेत. मातीच्या घरांच्या जागी सिमेंटची घरे येत आहेत. बुद्धिमत्ता तर कोकणाला देणगीच आहे. नव्या पिढ्या चांगल्या आहेत. पण तरीही जुनी घरे आणखी जुनी होत आहेत. कवी केशवसूत यांचे रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथे असलेले जुन्या पद्धतीचे घर आता संग्रहालय आहे. लोकांचा वावर आहे. अजूनही सीझनमध्ये टपकन् पुढ्यात अर्धा पिका नाहीतर खारीने अर्धवट खाल्लेला आंबा पडतो. ते अंगण मला साद घालते. पण आम्ही आता झालो शहरी, प्रदूषण झेलीत जगणारे… आम्हाला इथे बसून तिथली रिकामी घरे दिसतात. तिथल्या लोकांना दिसत असणारच. पण एक काळ येणार आहे. या घरांमध्ये पूर्वी होता तसा गोंगाट दिसेल. कदाचित आधीच्या पिढ्या इथे नव्याने जन्माला येतील.. घर शाकारण्यासाठी आणि पावसाळ्यात माजघरात पाणी ठिपकू नये म्हणून…

संपर्क- 99604 88738

Continue reading

थोरल्या पवारांच्या विसाव्यामुळे अजितदादांचे फावले!

चार वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे असे अजित पवार यांना वाटणे स्वाभाविक आहे. पण राजकारण हे कोणाची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी नाही हे विसरता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात चाळीस वर्षे कार्यरत असलेले अजित पवार यांचा...

मराठीचा मुद्दा म्हणजे नेमके काय?

निवडणूक जाहीरनामा म्हणजे विनोदाचा एक प्रकार असतो. जाहीरनामा या संकल्पनेला कायदेशीर आधार काही नाही. आश्वासन पाळले नाही म्हणून कोणत्या राजकीय पक्षावर आजवर कारवाई झालेली नाही. तसाच प्रकार वेगवेगळ्या मुद्यांच्या संदर्भातदेखील आहे. महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार आहे....

उंचावत चाललेल्या इमारती आणि आकसणारे अंगण!

माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!, या माझ्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या सकारात्मक अशा होत्या. गरजेनुसार जीवनशैली बदलत जाते. प्राधान्यक्रम बदलत जातात. नव्या पिढीला आवश्यक ते बदल होतात. या बदलांना सामोरे जात आयुष्य सुखावह कसे करता येईल एवढे बघितले...
Skip to content