Homeटॉप स्टोरीदर तासाला एक...

दर तासाला एक शेतकरी करतो भारतात आत्महत्त्या!

भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्त्या करत असल्याचे वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातूनच  समोर आले आहे. आत्महत्त्या करणाऱ्यांपैकी सर्वाधिक 38.5% शेतकरी महाराष्ट्रातील असून, त्यानंतर कर्नाटक (22.5%), आंध्र प्रदेश (8.6%), मध्य प्रदेश (7.2%) आणि तामिळनाडू (5.9%) या राज्यांचा क्रमांक लागतो. एकेकाळी समृद्ध कृषी वारशावर भरभराटीला आलेले, परंतु आता नैराश्य आणि यातनांनी व्यापलेले हे प्रदेश आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2023मध्ये, शेती क्षेत्रात काम करणारा किमान एक व्यक्ती दर तासाला आत्महत्त्या करून मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे शेती करणाऱ्या कुटुंबावर असलेल्या वाढत्या आर्थिक ताणावर अधिक प्रकाश पडतो.

आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी, उर्वरित शेतमजूर

2023मध्ये, शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण 10,786 व्यक्तींचा मृत्यू झाला, जो देशातील एकूण 1,71,418 आत्महत्त्याग्रस्तांपैकी 6.3% होता. तथापि, मागील वर्षाच्या, 2022च्या तुलनेत आत्महत्त्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. परंतु तीव्रता आणि कारणे तीच राहिली आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, एकूण आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी आहेत, तर उर्वरित शेतमजूर आहेत. एकूण 4,690 शेतकरी आणि 6,096 शेतमजूरांनी आत्महत्त्या केल्या. आत्महत्त्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 4,553 पुरुष आणि 137 महिला होत्या.

पश्चिम बंगाल, ईशान्येसह काही राज्यं आत्महत्त्यामुक्त

दुसरीकडे, काही प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये आत्महत्त्येचे प्रमाण शून्य झाल्याचे अहवालातून दिसत आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप राज्यांनी ही किमया साधली आहे. 2022मध्ये, उत्तराखंडमध्ये आत्महत्त्यांची संख्या शून्य होती, परंतु 2023मध्ये, तिथे आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली. तथापि, यावर्षी झारखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकही आत्महत्त्या नोंदवली गेली नाही, तर गेल्या वर्षी, त्यात वाढ झाली होती.

देशातील एकूण आत्महत्त्यांमध्ये वाढ

2022मध्ये, शेती क्षेत्रातील आत्महत्त्यांची संख्या तुलनेने जास्त होती. त्यावर्षी शेतीशी संबंधित एकूण 11,290 व्यक्तींनी आत्महत्त्या केल्या. त्यात 5,207 शेतकरी आणि 6,063 शेतमजूर होते. एकूण 5,207 शेतकरी आत्महत्त्यांपैकी एकूण 4,999 पुरुष आणि 208 महिला होत्या. त्याचप्रमाणे, 2022मध्ये शेती कामगारांनी केलेल्या 6,083 आत्महत्त्यांपैकी 5,472 पुरुष आणि 611 महिला होत्या. दरम्यान, एनसीआरबीने 2023मध्ये देशात एकूण 1,71,418 आत्महत्त्या झाल्याची नोंद केली आहे, जी 2022च्या तुलनेत 0.3% वाढ दर्शवते.

नैराश्याच्या स्थितीत “इथे” तत्काळ संपर्क करा

कुणाच्याही मनात आत्महत्त्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा भावनिक आधाराची आवश्यकता असेल, तर MANAS सल्लागारांना फोन करा. क्रमांक: 14416 किंवा 18008914416 (टोल फ्री). येथे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 24 तास समुपदेशक उपलब्ध आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content