महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे उद्या २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी “कुसुमाग्रज साहित्य जागर” मांडला जाईल.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत “कुसुमाग्रज साहित्य जागर” या कार्यक्रमाचे संयोजन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.
“कुसुमाग्रज साहित्य जागर” कार्यक्रमात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, विधानमंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार कुसुमाग्रजांची एक आवडती कविता किंवा त्यांच्या साहित्यांतील लेखाचा सारांश, नाट्यसंवाद यापैकी एक आणि एक स्वरचित कविता सादर करणार आहेत. “कुसुमाग्रज साहित्य जागर” कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.