पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर जगातील अव्वल इलेक्ट्रिक-वाहन निर्माता कंपनी टेस्लाने भारतात नोकरभरती सुरू केली आहे. टेस्लाच्या भारतात प्रवेश करण्याच्या योजनांचे हे संकेत मानले जात आहेत. चीनच्या तुलनेत भारतातील ईव्ही बाजारपेठ अजूनही बाल्यावस्थेत आहे. दुसरीकडे, टेस्लाने एका दशकाहून अधिक काळातील ईव्ही विक्रीत पहिली वार्षिक घट नोंदवली आहे. विक्रीत होणारी ही घट रोखण्यासाठी आता ते भारतासारख्या महत्त्वाच्या मार्केटमध्ये संधी शोधत आहेत.
टेस्लाने सोमवारी लिंक्डइन पेजवर भारतात 13 पदे भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. यात कस्टमर केअर आणि बॅक-एंड पदांचा समावेश आहे. यात सर्व्हिस टेक्निशियन आणि विविध सल्लागार भूमिकांसह किमान पाच पदे मुंबईसह दिल्लीत भरली जाणार आहेत, तर ग्राहक सहभाग व्यवस्थापक आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ यासारखी उर्वरित पदे मुंबईसाठी आहेत. टेस्ला इंकॉर्पोरेशनने मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतात नोकरभरतीची जाहिरात आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यातून अनेकांना हे निश्चित वाटतेय की, टेस्ला लवकरच पूर्ण क्षमतेने भारतीय बाजारात प्रवेश करण्याची योजना आखत आहे.

टेस्ला आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून सतत एकमेकांशी संवाद साधत आहेत. परंतु उच्च आयातशुल्काच्या चिंतेमुळे ही आघाडीची कारनिर्माता कंपनी भारतासारख्या महत्त्वाच्या दक्षिण आशियाई राष्ट्रापासून दूर राहिली होती. भारताने आता 40,000 डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या उच्च दर्जाच्या कारवरील मूलभूत सीमाशुल्क 110 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्यामुळे टेस्लाचा भारतीय बाजारातील प्रवेश सुकर झाला आहे. चीनच्या तुलनेत भारतातील ईव्ही बाजारपेठ अजूनही फारशा प्रगत स्थितीत पोहोचलेली नाही. गेल्या वर्षी भारतात अवघ्या एक लाख इलेक्ट्रिक कारची विक्री झाली. त्या तुलनेत चीनमध्ये मात्र 110 पट अधिक म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख कारची विक्री नोंदविली गेली.
गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये मोदी आणि मस्क यांच्यात झालेल्या भेटीनंतर अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. मस्क हे ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे सदस्य असले तरी, या टेक अब्जाधीशाने खासगी कंपनीचे सीईओ म्हणून मोदींची भेट घेतली होती की ते DOGE टीममधील भूमिकेत होते हे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी किंवा मोदींनीही जाहीर केलेले नाही. ट्रम्प सरकारमधील मस्क यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या व्यवसाय आणि राजकीय हितसंबंधांमधील रेषा अस्पष्ट झाली आहे. गेल्या महिन्यात, इटली सरकारने सुरक्षित दूरसंचार प्रदान करण्याच्या करारासाठी मस्क यांच्या स्पेसएक्सशी चर्चा झाल्याची पुष्टी केली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी फ्लोरिडामध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी भेट घेतल्यानंतर हे सारे घडले होते. आता भारतातील टेस्लाबाबतच्या घडामोडीही ट्रम्प यांच्या मध्यस्थीने मोदी-मस्क भेटीनंतर गतिमान होत आहेत.