संरक्षण मंत्रालयाच्या रिसेटलमेंट झोनने (दक्षिण कमांड) अलीकडेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी (आरओ) म्हणजेच माजी सैनिकांना नवोन्मेष आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापनावरील रिसेटलमेंट अभ्यासक्रम नुकताच सुरू केला आहे. 23 डिसेंबर 2024ला सुरू झालेला हा अभ्यासक्रम येत्या 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना कृषीव्यवसाय आणि उद्योजकता क्षेत्रात विनाखंड संक्रमण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि अंतर्दृष्टी प्रदान करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना केली आहे. पुण्यामध्ये वाम्नीकॉम येथे या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला ब्रिगेडियर रोहित मेहता, एडीजी, डीआरझेड (सदर्न कमांड) आणि वाम्नीकॉमच्या संचालक हेमा यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
लष्करी सेवेदरम्यान विकसित केलेले नेतृत्त्व, शिस्त आणि धोरणात्मक विचारकौशल्ये वापरण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सहभागींना कृषीव्यवसायात उत्कृष्ट कामगिरी करता येईल. तज्ज्ञांच्या नेतृत्त्वाखालील व्याख्याने, परस्परसंवादांचा समावेश असलेल्या कार्यशाळा आणि व्यावहारिक केसस्टडीजद्वारे, हा कार्यक्रम शेती ते बाजारपेठ पुरवठासाखळी, कृषीतंत्रज्ञानातील नवोन्मेष, आर्थिक व्यवस्थापन आणि कृषीव्यवसाय उपक्रमांसाठी उद्योजकीय धोरणे यासारख्या आवश्यक विषयांना समाविष्ट करेल.

आपल्या देशाच्या रक्षकांना भारताच्या शाश्वत विकासात योगदान देत कृषीव्यवसायात प्रभावी कारकीर्द घडवून आणण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणारा हा कार्यक्रम आहे. रिसेटलमेंट महासंचालनालय, माजी सैनिक कल्याण विभाग (संरक्षण मंत्रालय) यांनी नामांकित केलेल्या या देशव्यापी प्रशिक्षण कार्यक्रमात लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे एकूण 46 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात वाम्नीकॉमने सरंक्षण दलाचे जेसीओ आणि लष्कराच्या इतर श्रेणीच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी दोन तुकड्यांची व्यवस्था केली आहे. 2022-23 आणि 2023-24 या आर्थिक वर्षात वाम्निकॉमने दोन तुकड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
डीजीआरविषयी थोडेसे..
डीजीआर अर्थात रिसेटलमेंट महासंचालनालय थेट माजी सैनिक कल्याण विभागाच्या (संरक्षण मंत्रालय) अंतर्गत थेट काम करणारी आंतर संरक्षण सेवा संघटना आहे. संरक्षण दलाचे युवा स्वरुप कायम राखण्यासाठी दरवर्षी सुमारे 60,000 संरक्षण कर्मचारी तुलनेने तरुण वयात निवृत्त/मुक्त होतात. निवृत्तीच्या वेळी संरक्षण दलातील अनेक कर्मचाऱ्यांच्या अंगावर अनेक जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा रोजगार मिळवावा लागतो. अशा निवृत्त संरक्षण सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आणि सध्या उदयाला येत असलेल्या कॉर्पोरेट आणि उद्योगविश्वाच्या गरजांनुसार अतिरिक्त कौशल्ये प्रदान करण्याचे काम करतात, ज्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा करियर सुरू करता येते.