Thursday, December 26, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजआता कळले शिवसेना...

आता कळले शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कोणाचा?

राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय! महाविकास आघाडीचा सुपडासाफ. राज्य विधानसभा निवडणुकीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली असून भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीला दणदणीत यश प्राप्त झालेलं आहे. या दणदणीत विजयाबाबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्रभाऊ फडणवीस व अजितदादा पवार यांचे मनापासून अभिनंदन. विशेषतः मुख्यमंत्री यांना या गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत ज्या कडवट आणि अश्लाघ्य टिकेला सामोरे जावे लागूनसुद्धा त्यांनी ५८ आमदार निवडून आणून दाखवल्याने आता एका अर्थी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे, यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखेच आहे.

एका वेगळ्या अर्थाने त्यांनी शिवसेनेची जुनी कात टाकून नवीन रूप धारण केले आहे असे वाटते. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत छगन भुजबळ, नारायण राणे आदी नेत्यांना शिवसेना सोडल्यानंतर लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. छगन भुजबळ यांना तर मुंबई सोडून इतरत्र निवडणूक लढवावी लागली होती. नारायणरावांचा तर दोनवेळा पराभव झाला होता. मात्र यावेळी एकनाथरावांनी इतिहासाचे काटे उलटे फिरवले. इतकेच नाही तर शिवसेना पक्ष हा वेळ, काळ न पाहता सर्वांसाठी खुला केला. तसेच ते सर्वदूर प्रचार करून आम जनतेत मिसळत होते. त्यातून साहजिकच जनसंपर्क वाढत होता. त्यांच्या आजूबाजूलाही ‘चौकडी’ होतीच. पण त्या ‘चौकडी’ला त्यांनी आपल्यावर हावी होऊ दिले नाही. शिवसेनेची एकूण परंपरा पाहता ते पोलिसांच्या नेहमीच्या सुरक्षेसह जनतेला भेटत होते, सभा-मोर्चांना सामोरे जात होते. कितीही गर्दीत असले तरी समोर येणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी करून संबंधित यंत्रणेकडे पाठवीत होते. तिच गोष्ट थोडाफार फरकाने देवेंद्रभाऊ व अजितदादा यांच्याबाबत होती. सरकार आपल्या दारी व लाडकी बहीण या योजना जाहीर झाल्यानंतर प्रारंभी याबाबत समन्वय म्हणावा तसा नव्हता. उलटसुलट बातम्या येत होत्या. हे लक्षात येताच या तिघांनीही वेळ न दवडता यात सुसूत्रता आणली व त्याची त्वरेने कारवाई केली.

शिवसेना

महायुतीच्या या प्रचंड विजयात उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊंचाही मोठा हात आहे. एकनाथराव व अजितदादांच्या उमेदवारांना सोडलेल्या जागांवरून निष्ठावंत भाजप नेत्यांना समजावणे सोपं काम नव्हतं. ते काम त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हाती घेऊन यशस्वीरीत्या पार पाडले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचे प्रचारदौरे चातुर्याने पार पाडले. आता पुन्हा एकदा देवेंद्रभाऊंची कसोटी लागणार आहे यात शंका नाही. स्वबळावर (युती असली तरी) भाजपच्या आमदारांचे संख्याबळ १३२च्या आसपास गेल्याने आमचाच मुख्यमंत्री हवा हा घोषा भाजप करणारच यात शंका नाही आणि येथेच देवेंद्रभाऊंची कसोटी लागणार आहे. कारण त्यांना युतीचा धर्म सांभाळायचा आहे. याबाबत एकनाथराव, देवेंद्रभाऊ अजितदादा व भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय देतील तो आम्ही मान्य करू हे या तिघांनी याआधीच मान्य केलेले असले तरी प्रत्यक्ष चर्चेत काय होते त्यावरच सर्व अलंसबून आहे.

आता महायुतीचे सरकार विराजमान होणार यात शंकाच नाही. फक्त काही दिवसांचा अवधी आहे. मजबूत बहुमत असल्याने राज्यकारभार करण्यात काही अडचण येऊ नये हीच अपेक्षा! सरकारच्या अनेक गोष्टी वा निर्णय उगाचच गुप्त ठेवले जातात. काहीवेळा ते आवश्यक असेलही. पण नेहमीच असे गुप्त ठेवल्याने ‘पतंगबाजी’ सुरु होते. “Everything secret degenerates, even the administration of justice. Nothing is safe that does not show it can be discussion and publicity” हेही राज्याकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

शिवसेना

आज येथे कुठल्याच राजकीय वादात पडायचे नाही वा वाद ही घालायचा नाही. आज महायुतीचा दिवस आहे, त्यांच्या विजयाचा दिवस आहे. मात्र जाताजाता एक लक्षात घेतले पाहिजे की, जुन्या पिढीचे नेतृत्त्व काही प्रमाणात का होईना मतदारांनी नाकारलेले आहे. राज्याच्या राजकारणतले मुरब्बी समजले जाणारे वयोवृद्ध नेते शरद पवार यांनाही या निवडणुकीत पराभव पाहावा लागला आहे. तिच गोष्ट काही फरकाने उद्धव ठाकरे यांनाही लागू आहे. पुन्हा येथे पवार व ठाकरे यांच्यात बराच मोठा फरक आहे. पवार यांचे जमिनीशी नाते आहे. ठाकरे यांचे तसे नाही. त्यांचा फक्त त्यांच्या सल्लगार चौकडीवर विश्वास आहे आणि ही चौकडी जमिनीपासून कित्येक किलोमीटर्स दूर आहे. शेवटी एक लक्षात घेतले पाहिजे की पक्षाच्या मुख्य कार्यालयातील सरचिटणीस आणि चिटणीसांच्या जीवावर पक्ष चालवता येत नाही. हे जरी त्यांच्या लक्षात आले तरी बरेच काम झाले असे म्हणता येईल.

महागाई कमी करणे, बेरोजगारांना नोकऱ्या देणे, विविध शहरांमधील गर्दी कमी करणे, ग्रामीण तसेच मोठ्या शहराच्या जवळ असलेल्या गावात सततचा वीजपुरवठा देणे, शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना नीट राबवली जाते की नाही, शेत मालाला योग्य भाव, मोठ्या शहरातील घरांच्या किमती आटोक्यात ठेवणे, प्रवासी वाहतुकीसाठी एसटीला अर्थसहाय्य करणे, आदी अनेक समस्याना हे नवीन सरकार कसे सामोरे जाते यावरच आज मिळालेले हे यश कायम राहील. नाहीतर जनआंदोलनाला सामोरे जावे लागेनच.

छायाचित्रः प्रवीण वराडकर

Continue reading

मुख्यमंत्री म्हणतात, मतदानयंत्राबाबत शंका हा तर देशद्रोहच!

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानयंत्राबाबत शंका उपस्थित करणे हा एकप्रकारे देशद्रोहच आहे असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे लॉजिक मांडले. खरंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळातील भाषणावर आधीच लिहिणार होतो. पण मुद्दामच...

मुख्यमंत्री फडणवीससाहेब.. एक नजर इधर भी…

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोर केलेले भाषण खरोखरच वाखाणण्यासारखे आहे, यात संशय नाही. मंत्रालयात अभ्यागतांची गर्दी नको तसेच काम कुठल्या स्तरावर आहे याची चौकशी करण्यासाठी नागरिकांचा जत्था मंत्रालयात येतो हे टाळायला हवे असे निक्षून सांगितल्याबद्दल खरंतर...

प्रचारसभा की बाराखडीतल्या प्रत्येक अक्षरावर आधारीत अपशब्दांची मालिका?

येत्या बुधवारी आपल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होऊ घातले आहे.अवघ्या चार-पाच दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकांवर काय लिहिणार हा खरं तर यक्षप्रश्न आहे. सुमारे दहा-बारा प्रमुख राजकीय पक्ष गेले तीन-चार महिने राज्य घुसळून काढत आहेत. प्रत्येकाचे जाहीरनामे वेगळे, वचननामे वेगळे....
Skip to content