Wednesday, March 12, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजकृत्रिम बुद्धिमत्ता नाही...

कृत्रिम बुद्धिमत्ता नाही तर माणूसच पळवणार आपल्या नोकऱ्या..

नवीन वर्षात आणि त्यानंतर होणार असलेल्या बदलांबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याच वर्षीच्या सुरुवातीला अनेक विज्ञान नियतकालिकांनी २०२५मध्ये काय-काय होऊ शकते याचे भविष्य मांडले. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि माणसाच्या जीवनाशी निगडित असलेली एक चर्चा आहे ती अशी की कृत्रिम बुद्धिमत्ता अतिशय वेगाने वाढते आहे. त्याचाच भाग म्हणून जगभरातील नोकऱ्यांना ग्रहण लागणार आहे. अधिकाधिक कामे कृत्रिम बुद्धिमत्ता हाती घेईल आणि त्यामुळे कंपन्याना आर्थिक फायद्यासाठी कर्मचारीकपात करावी लागेल. ही बाब धक्कादायक असणार आहे हे निश्चित.

२०२२च्या अखेरीला चॅटजीपीटी या नावाने आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान त्यावेळी काहीसे मजेशीर वाटले. ते तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असे आणि त्यासोबतच ही उत्तरे खरीच असतील याची खात्री नाही असेही सांगत असत. पण प्रत्यक्षात या तंत्रज्ञानाने जबाबदार मंडळीसुद्धा चकित झाली. यापूर्वी रोबो किंवा टर्मिनेटर असे काही परदेशी चित्रपट जादुई वाटतील अशा गोष्टी दाखवीत असत. त्या सगळ्या काल्पनिक किंवा विज्ञानकथांवर आधारित वाटत असत. परंतु चॅटजीपीटीने यात वास्तव आणले आणि मनातली भीती होती ती प्रत्यक्षात येऊ शकेल अशी चिन्हे दिसू लागली. मला जर संगणक फारसा समजत नसेल तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता माझी नोकरी घेणार कशी असेही विचारले गेले. त्यातच हुशार लोकांनी चॅटजीपीटीमधील काही त्रुटी समोर आणल्या. परंतु या शक्तिमान तंत्रज्ञानापुढे त्या टिकल्या नाहीत. उलट कृत्रिम बुद्धिमत्ता आता अतिशय वेगाने प्रगती करू लागली. यावेळी अगोदर जी भ्रामक कल्पना होती ती नोकरी जाण्याची भीती खऱ्या अर्थाने समोर आली. या भीतीत वाढ करण्याचे काम काही जाणकार मंडळींनीदेखील केले.

कृत्रिम

आज कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दलची काळजी जरी काहीशी कमी झाली असली तरी चॅटबॉट नावाच्या माणसाच्या वेषात आलेल्या आभासी ‘गप्पिष्ट’ प्रतिमांमुळे अगदी अर्थशास्त्रीसुद्धा चकित झाली आहेत, कारण असे काही निष्पन्न होईल अशी त्यांचीही कल्पना नसावी. माणूस हा नेहमीच स्वत:ला श्रेष्ठ मानत आला आहे. त्यामुळे अशा ‘गप्पिष्ट’ प्रतिमांबद्दल लिहिले गेले. “तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका, आणि आमच्यासाठी हे जग संपणार आहे असेही सांगू नका..” असे कृत्रिम बुद्धिमत्तेला बजावून माणसे पुन्हा एकदा आपल्या कामात गर्क झाली. त्यांच्यावर फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. धोका जवळ आल्याचे तर दिसत होते पण अजून त्याचा नेमका परिणाम कसा आणि कुणावर होईल हे नक्की समजत नव्हते. आता काही काळ गेल्यानंतर हे कळते आहे की भविष्यकाळात आपली नोकरी कुणी डिजिटल आभासी व्यक्ती पळवणार नाही तर ही व्यक्ती कुणीतरी खराखुरा माणूसच असण्याची शक्यता आहे.

आता तसे बघायला गेलो तर ही बाब आपल्या अंगवळणी पडलेली आहे. आपल्या जागी उद्या कुणीतरी वेगळा असू शकेल हे समजूनच आपण नोकरी स्वीकारतो. येथे निदान आजतरी आपल्यापैकी फारशा कुणाला नोकरीच्या बाबतीत धक्का दिल्याचे वरकरणी दिसत नाही. मात्र ही उद्यासाठी एक आगाऊ सूचना असू शकते. माणूस आणि तंत्रज्ञान यात काही महत्त्वाच्या बाबी आहेत. यातली पहिली अशी की, आपल्याला कुणीतरी नोकरीत धक्का देईल असे वाटत असेल तर तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर शिकावा लागेल. मग याबाबतीत अशिक्षित माणसाची नोकरी तुम्ही घालवू शकता. तंत्रज्ञान सहवासाने संपन्न होते. माणसांमध्ये वाद होऊ शकतात. तंत्रज्ञान निदान आजतरी वाद करू शकत नाही. त्यामुळे मैत्री करावी हे चांगले.

माणसाची आणखी एक प्रवृत्ती असते. कोणत्याही नव्या गोष्टीला नावे ठेवणे सामान्य असते. येथे एक बाब लक्षात घ्या की, माणसाने या तंत्रज्ञानाला कितीही हिणवले तरी तो अखेर शरण जातो. साध्या मोबाईल वापरावरून याच प्रत्यय येऊ शकेल. पाळण्यातील बालकापासून तो आजोबांपर्यंत कितीही नाही म्हटले तरीही आपण त्याच्या आहारी गेलो आहोत हे मान्यच करावे लागेल. “कच्चे धागे से बंधे चले आयेंगे, सरकार मेरे..” यानुसार आपल्याही नोकऱ्या आपणच पळवणार आहोत.. बघा पटते का?

Continue reading

आई-बाबा आणि मुलांमधला संवाद संपत चाललाय का?

समाज एकसारखा राहत नाही. त्यात बदल होत असतो आणि हा बदल अनेकदा त्यावेळी पालक असलेल्या लोकांच्या लक्षात येतो तेव्हा ते सर्वात अगोदर कुणाची काळजी करीत असतील तर आपल्या मुलांची. हे तर जागतिक सत्य म्हणावे लागेल. आज जरी आई आणि...

श्वासाचा संबंध बुबुळांशीही…

श्वासाचा संबंध शरीरातील कोणत्या गोष्टीशी असतो असा प्रश्न असेल तर उत्तरे प्रत्येकाच्या आकलनानुसार असतील. कुणी म्हणेल शरीरासाठी प्राणवायू आवश्यक. तो श्वासातून मिळतो. कुणी म्हणेल की ठसका लागून क्षणभर जरी श्वासाला त्रास झाला तर आपण हडबडतोच, पण आपल्यासमोर जे कुणी...

सावधान! शहरांतले उंदीर वाढताहेत…

शहरांचे उष्णतामान वाढते आहे आणि त्यासोबतच ग्रामीण भागातून आणि इतर ठिकाणांहून लोक शहरात काम मिळवण्यासाठी येतच राहणार. ताजे संशोधन असे सांगते की, यामधून शहरातील उंदरांची संख्या वाढत राहणार आहे. कुणी म्हणेल की यात नवीन ते काय सांगितले? शहराची लोकसंख्या...
Skip to content