देशातला सर्वात मोठा जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क मुंबईत उभा राहतोय, असे सांगून सूरतच्या डायमंड मार्केटमुळे मुंबईतला एकही हिरेविषयक उद्योग गुजरातला गेलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये विधानसभेत स्पष्ट केले.
सूरतमध्ये हिरे उत्पादन २०१३पासून आहे आणि त्यात आता एक नवी इमारत उभारली आहे. महाराष्ट्रातील एकही हिरेविषयक उद्योग तेथे गेलेला नाही. मुंबईतून हिरे निर्यातीचे काम मोठे आहे. त्यामुळे मुंबईचे उद्योग बाहेर जात आहेत, यात काहीही तथ्य नाही. मलबार गोल्डज ही सर्वात मोठी कंपनी आपल्याकडे १७०० कोटी गुंतवणूक करत आलेली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, अशी ग्वाही देत फडणवीस म्हणाले की, मुंबईचा हिरे व्यापारातला वाटा ७५ टक्क्यांचा आहे आणि गुजरातचा त्यामानाने खूप कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सरकारच्या उत्तरानंतर विरोधकांचा सभात्याग
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर न देता उलटा चोर कोतवाल को डाटे, असे वर्तन केले आहे, असा आरोप करत विधानसभेतून बहिर्गमन केले. त्यांच्यासह विरोधी पक्षांमधील सर्व सदस्य सभागृहातून कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर गेले. विरोधकांचे हे नक्राश्रू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी यानंतर केली.
त्याआधी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाबद्दल एक ओळ टाकली म्हणजे विदर्भाचे प्रश्न होत नाहीत, असे सांगितले होते तसेच, विरोधकांना संधी असूनही त्यांनी विदर्भाचे प्रश्न मांडले नाहीत, याकडेही लक्ष वेधले.